थॉट ऑफ द वीक : पूर्वग्रह व पालकत्व 

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच 
Friday, 26 June 2020

पूर्वग्रहाबरोबरच चूक-बरोबरच्या व्याख्यांमुळे आत्मसात करतात, त्यामुळे संदर्भ न लावता एका भ्रमात राहत असतात. हा भ्रम ज्या वेळी तुटतो त्या वेळी अधिक मानसिक त्रास होतो व त्यामधून बाहेर पडणे अवघड जाते. 

मानसी, एका खासगी संस्थेमध्ये चांगल्या पदावर काम करीत होती. नवरा व मुलगी अवनी असे तिचे कुटुंब होते. अवनीच्या नजरेत आई-वडील आराध्यस्थानी होते. अवनीचा दहावा वाढदिवस आला. नेहमीप्रमाणे आपल्याला भेटवस्तू मिळणार म्हणून अवनी उत्सुक होती. मानसीने स्वतः लिहिलेली एक डायरी भेट दिली. अवनीने लगेच वाचायला घेतली. पहिल्या पानावर लिहिले होते ‘जे मला जमले नाही ते तू कर.’ त्याखाली यादी होती. मानसीला नृत्य, पर्यटन, नाट्य इ. खूप आवडायचे. पण तिला ते कधी जमले नाही. दुसरे पान, ‘तुझी कधीही चूक नसते.’ तिसरे पान ‘उच्चशिक्षित असतात तेच चांगले असतात.’ चौथे पान ‘कायम दुसऱ्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकायचे, आयुष्यात जिंकणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’ पाचवे पान ‘यश हाच प्रेम मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे.’ त्या डायरीमध्ये असेच संदेश होते. अवनीच्या वडिलांना ते पटले नाही. ते मानसीला समजावू लागले की, असे संदेश तिच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतील. मात्र मानसी ‘मी कधीच चुकत नाही’ या विचाराने आंधळी झाली होती, त्यामुळे तिने हा उपदेश ऐकून सोडून दिला. 

डायरीमधून अवनीला आपल्याला आयुष्याची व यशाची गुरुकिल्ली मिळाली, असे वाटले. डायरीमधील प्रत्येक संदेश आहे तसा अमलात आणायचे तिने ठरविले. कारण आई तसेच वागत होती आणि अवनीच्या नजरेत ‘ते योग्यच होते.’ ‘मी कधीच चुकत नाही,’ हा संदेश आत्मसात केल्याने अवनीचे कोणाशीच पटले नाही. अशीच अनेक वर्षं गेली, आज अवनीचा २८ वा वाढदिवस. मात्र, आज अवनी एका भ्रमाने व्यापलेले आयुष्य जगत आहे. उत्तम शिक्षण व नोकरी आहे, परंतु तिचा सहवास टाळला जातो. ‘कायम मीच बरोबर’ असे धोरण असल्याने कोणीही तिला समजावायला जात नाही. तिच्या स्वभावाने अनेक नाती दुरावली. काही लोकांनी मानसीला अवनीबद्दल आजही समजविण्याचा प्रयत्न केला, पण ‘माझी मुलगी कधीच चुकत नाही,’ हे धोरण आजही कायम आहे. मानसी व अवनीसारखे अनेक जण अशा भ्रमात जगत आहेत. लहानपणापासून प्रेमाचा प्रकाश देताना पालकांकडून कळत नकळत मानसीसारखे अंधःकारमय संदेशही संक्रमित होत असतात. हे संदेश आहेत तसे आत्मसात केल्याने पूर्वग्रह बनतात. पूर्वग्रह पालकत्वावर कसा परिणाम करतात ते पाहू. 

हेही वाचा : एक क्षण - स्व-जागरूकतेचा 

१. पूर्वग्रह आत्मसात केल्याने मुलांचे स्वतःचे विचार जन्म घेत नाहीत. विचार आले तरी वैचारिक विकास होत नाही. वेगळा विचार म्हणजे चुकीचा विचार असे मुलांना वाटते. 

२. पूर्वग्रहाबरोबरच चूक-बरोबरच्या व्याख्यांमुळे आत्मसात करतात, त्यामुळे संदर्भ न लावता एका भ्रमात राहत असतात. हा भ्रम ज्या वेळी तुटतो त्या वेळी अधिक मानसिक त्रास होतो व त्यामधून बाहेर पडणे अवघड जाते. उदा. प्रेम ही एक निरपेक्ष भावना आहे, हे लक्षात येत नाही; कारण पूर्वग्रह सांगतो, ‘प्रेम मिळविण्यासाठी काहीतरी साध्य करणे आवश्यक आहे.’ असे पूर्वग्रह बाळगल्यास आपण निरपेक्ष प्रेमाला मुकतो. न ते आपल्याला मिळते न आपण दुसऱ्यांना निरपेक्ष प्रेम देऊ शकतो. 

३. आपले पालक ज्या दृष्टिकोनातून इतर लोकांकडे किंवा एखाद्या घटनेकडे बघतात तोच दृष्टिकोन आपण पूर्वग्रहामुळे आत्मसात करतो. उदा. पालक एखाद्या व्यक्तीला विनाकारण महत्त्व देऊन प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करीत राहिल्यास ‘कायम दुसऱ्यांनीच आपल्या आयुष्याचा निर्णय घ्यावा,’ असा पूर्वग्रह मुलांमध्ये तयार होतो. 

४. पूर्वग्रहातून अनेकदा भीती निर्माण होते व ती आपल्या मुलांमध्येदेखील संक्रमित होते. उदा. पालक कायम ‘लोक काय म्हणतील’ या भीतीने वागत असतील तर मुलेसुद्धा हीच भीती घेऊन वागत राहतात, परिणामी कायम लोकांना समोर ठेवून वागल्यामुळे मुले दुसऱ्यांच्या मतावर आपला आत्मविश्‍वास अवलंबून ठेवतात. 

पूर्वग्रहाचा परिणाम आपल्याला दैनंदिन आयुष्याबरोबरच भावनिक विश्वावर होतो. आपण जे पूर्वग्रह आपल्या पालकांकडून कळत नकळत आत्मसात करतो, ते आपण पुढच्या पिढीलाही देत असतो. यामध्ये गरज असते ती ही साखळी तोडण्याची व पूर्वग्रहविरहित आयुष्य जगण्याची. हे कसे करायचे ते आपण आगामी लेखमालेत पाहू. 

लक्षात ठेवा, पूर्वग्रहाचा परिणाम पालकत्वावर प्रथम होतो, त्यामुळे पुढच्या पिढीचे भविष्य तुमच्या हातात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya pujari thought week article about prejudice and guardianship

Tags
टॉपिकस
Topic Tags: