esakal | ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : भांड्यांची परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

tadition

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : भांड्यांची परंपरा

sakal_logo
By
मधुरा पेठे

भारतात अनेक प्रकारची भांडी वापरात आहेत. हजारो वर्षांपासून प्रचलित थाळीचे घाट आपण आजही वापरत आहोत. गुजरात येथील ढोलविरा येथे झालेल्या उत्खननात पाच हजार वर्षे जुनी स्वयंपाकाची अनेक भांडी उत्तम स्थितीत सापडली आहेत. यात धातूचे अतिशय सुरेख तवे, कळशी, ताट, थाळी, डाव, गडवे सापडले आहेत. काही भांड्यांवर ठोक्यांची सुरेख नक्षी आहे, तर मातीच्या भांड्यावर कलाकुसर केलेली आहे.

त्या सुबक भांड्यांसमोर आपण आज वापरत असलेली भांडी अगदी साधी वाटू लागतात. त्या काळातील गुळगुळीत सुबक तव्यांचे खास करून कौतुक वाटते. या भांड्यांवरून त्या काळात काय पदार्थ तयार केले जात असावेत याचाही अंदाज येतो. राजस्थानमधील उत्खननात एका मडक्यात मिश्र धान्याचे मोठे लाडू मिळाले, जे आजही सुस्थितीत आहेत. ते पिंडदानाकरता असावेत असा कयास आहे. हे पाहिल्यानंतर आपण अशा गौरवशाली संस्कृतीचे भाग आहोत याचा मोठा अभिमान वाटतो.

जगभरात जेव्हा इतर संस्कृतींचा विकास होत होता, त्याच वेळेस भारतात मात्र पूर्ण विकसित नागरी व्यवस्था प्रचलित होती.  याच पार्श्वभूमीवर युरोपात मात्र सतराव्या शतकापर्यंत जेवण्यासाठी ताट किंवा थाळीसारखी कोणतीही भांडी वापरात नव्हती. त्या काळात श्रीमंत ट्रेंचर ब्रेडवर मांस किंवा भाज्या वाढून जेवत असत. श्रीमंतांच्या घरी टेबलवर एक टेबलक्लॉथ टाकले जाई आणि ट्रेंचर ब्रेडवर पदार्थ वाढले जाई. सोबत सूपसदृश पदार्थ बाऊलमध्ये वाढला जात असे. शिळ्या ट्रेंचर ब्रेडवर वाढलेल्या पदार्थातील रस ब्रेड शोषून घेत असे आणि पदार्थ खाऊन झाला, की खालचा ब्रेड गरिबांना वाटला जाई किंवा कुत्र्यांना खाऊ घालत.

सतराव्या शतकात ट्रेंचर ब्रेडऐवजी लाकडाच्या सपाट प्लेट वापरात आल्या. त्यातच मीठ ठेवण्यासाठी एक खळगा असे. आज हेच लाकडाचे ट्रेंचर्स चीजसारखे कोरडे पदार्थ सर्व्ह करण्यासाठी वापरले जातात. पुढे प्युटर नावाची मिश्र धातूची खोलगट प्लेट वापरली जाऊ लागली. तरीही याचा वापर श्रीमंत लोकांपर्यंत सीमित होता. प्युटर प्लेट्सवर प्रत्येकाचे नाव कोरलेले असे आणि शक्यतो घरातील कमावत्या व्यक्तीकडे हे प्युटर्स असत. प्रत्येकाच्या जवळ आयुष्यभर एकच प्युटर प्लेट असे जी तो जीवापाड जपे. घराबाहेर जाताना आवर्जून प्लेट आणि सुरी सोबत नेले जात. युरोपमध्ये अधूनमधून प्युटर प्लेट्स ठिकठिकाणी वारपल्या गेल्या; परंतु ट्रेंचर ब्रेड हे सर्वांत जास्त प्रसिद्ध आणि सोयीचे होते. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला काही ठिकाणी प्युटर प्लेट्स वापरल्या गेल्या; परंतु त्यात लीड धातू असल्याने आंबट पदार्थाशी प्रक्रिया होऊन विषबाधेच्या अनेक घटना घडत असत. याच कारणाने टोमॅटो विषारी असल्याचा गैरसमज पसरला.

गरिबांना मात्र प्युटर प्लेट्स परवडत नसल्याने काही वेळेस लाकडी प्लेट्स वापरात येत असत. परंतु, दिवसभरातील दोन जेवणांनंतर लाकडी ट्रेंचर्स न धुतल्याने त्यात बॅक्टेरिया आणि अळ्या होत असत आणि त्यामुळे त्यांना तोंडाचे विकार होत, ज्यांना ट्रेंच माऊथ असे म्हटले जाई. काही गर्भश्रीमंतांकडे सोन्या-रुप्याच्या प्लेट्स असत; परंतु याचा उपयोग जेवणाकरता न करता डायनिंग एरियात भिंतीवर श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याकरिता लावले जाई आणि क्वचित मोठ्या समारंभात यजमान त्यात जेवण वाढून घेई. अठराव्या शतकात इतर धातू, पोर्सेलीन, इंपोर्टेड चायनाचे टेबलवेअर चलनात आले; परंतु तेही श्रीमंत वर्गापुरेसे सीमित राहिले. सतराव्या शतकाच्या शेवटापर्यंत ट्रेंचर ब्रेड, लाकडी ट्रेंचर्स किंवा प्युटर्स प्रचलित होते. खासकरून चांदीची भांडी ही सर्वांत महागडी संपत्ती असे. जागतिकीकरणाने यात बदल होऊन अनेक प्रकारच्या प्लेट्स चलनात आल्या. 

आज आपण भारतीय लोक घरगुती समारंभात खास सिरॅमिक डिनरवेअरमध्ये जेवण वाढतो; परंतु आपल्या पारंपरिक पितळी थाळी, चांदीचे ताट, केळीचे पान, पळसाच्या पत्रावळी, फणसाची पान, याचा पाच हजार वर्षांपेक्षा जुना इतिहास आणि परंपरा लक्षात घेता आपण केवळ भारतीय डीनरवेअरला प्राधान्य दिले पाहिजे.

loading image
go to top