esakal | रंग अमुचा वेगळा 
sakal

बोलून बातमी शोधा

रंग अमुचा वेगळा 

आशुतोष आणि रेश्मा यांची पहिली भेट झाली शूटिंगच्या दिवशीच.रेश्मानं आशुतोषचं ‘तुला पाहते रे’ मालिकेतील काम पाहिलं होतं.आशुतोष म्हणतो,‘माझी एखाद्याशी ओळख व्हायला थोडा वेळ लागतो.'

रंग अमुचा वेगळा 

sakal_logo
By
आशुतोष गोखले, रेश्मा शिंदे

दूरचित्रवाणीवरील काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात की, त्यातील व्यक्तिरेखा त्या कलाकारांची ओळखच बनते. ‘स्टार प्रवाह’वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील लोकप्रिय जोडी म्हणजे डॉक्टर कार्तिक आणि दीपा, म्हणजे आशुतोष गोखले आणि रेश्मा शिंदे. आशुतोष आणि रेश्मा यांची पहिली भेट झाली शूटिंगच्या दिवशीच. रेश्मानं आशुतोषचं ‘तुला पाहते रे’ मालिकेतील काम पाहिलं होतं. आशुतोष म्हणतो, ‘माझी एखाद्याशी ओळख व्हायला थोडा वेळ लागतो. पहिल्या भेटीत मी एकदम मोकळेपणानं बोलत नाही.’ यावर रेश्मा म्हणाली, ‘पण आशुतोष एखाद्याला आपलं मानतो, तेव्हा त्या व्यक्तीला त्यानं गुणदोषांसकट स्वीकारलेलं असतं, हा त्याच्या स्वभावातील चांगला गुण आहे.’ 

आपल्या भूमिकेबद्दल आशुतोष म्हणतो, ‘डॉक्टर कार्तिक खूप शांत आहे, तो एखाद्या गोष्टीचा खूप विचार करतो आणि या गोष्टी त्याच्या देहबोलीतून व्यक्त करायच्या आहेत, हे समजून घेणं फार गरजेचं होतं. डॉक्टर कार्तिकची चालण्याची पद्धत, देहबोलीही बारकाईनं समजून घेणं महत्त्वाचं होतं.’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दीपा या भूमिकेविषयी रेश्मा म्हणते, ‘दीपा समजूतदार, संवेदनशील आहे, मात्र सहनशील नाही. या तीन शब्दांत फरक  आहे. माझ्या आयुष्यात मी अशा मैत्रिणी पाहिल्या आहेत, ज्या कुटुंबासाठी त्याग करतात, समजूतदार असतात.’ लॉकडाउनच्या काळात आशुतोष एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत होता. अन्नाची गरज असलेले, स्थलांतरित मजूर विशेष रेल्वेने आपल्या गावाला जात होते, त्यांना फूड पॅकेट्स देण्याच्या कार्यात सीएसएमटी, कुर्ला, वांद्रे टर्मिनस या ठिकाणी तो सहभागी झाला होता. रेश्माही लॉकडाउनच्या काळात इमारतीतील मुलांना चित्रकला, योगा शिकवणं, मेडिटेशन या गोष्टीत व्यग्र होती. 

रेश्मा उत्तम अभिनेत्री असून, दिग्दर्शकाला अपेक्षित पद्धतीनं ती व्यक्तिरेखा मांडणं, हा तिच्या व्यक्तिमत्वातील उत्तम गुण असल्याचं आशुतोषनं सांगितले. आपल्या चाहत्यांच्या आठवणीबाबत आशुतोष म्हणाला, ‘लॉकडाउनच्या काळात कार्य करताना काही पोलिसांबरोबर ओळख झाली होती. मला काम करताना पाहून एका महिला पोलिसाला आश्‍चर्य वाटलं. मी खरंच डॉक्टर आहे, असं त्यांना वाटलं आणि मी हॉस्पिटलमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. मी मालिकेत ‘डॉक्टर’ असल्याचा अभिनय करतो, हे मला पटवून द्यावं लागलं. यावरून लोकांमध्ये मालिकेची किती लोकप्रियता आहे, हे लक्षात येतं.’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेश्मा म्हणाली, ‘जालन्यातील दोघं आमच्या सेटवर आले होते. ती मुलगी प्रथम मुलगा काळा आहे, म्हणून नकार देत होती, मात्र आमची मालिका बघून तिचा विचार बदलला. तिनं त्या मुलाला होकार दिला आणि ते दोघंही आमच्या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यावर सेटवर आले. तो क्षण खूप महत्त्वाचा होता.’ अभिनयाव्यतिरिक्त आशुतोषला क्रिकेट, तर रेश्माला नृत्य करायला आवडते. ‘आत्तापर्यंत अनेक उत्तम कलाकारांबरोबर काम करता आले, असंच पुढंही घडावं,’ असं आशुतोषला वाटतं. आपल्या भूमिकांमुळं आपल्या नावाला एक ओळख मिळावी आणि ती कायम टिकावी, असं रेश्माला वाटतं. 

(शब्दांकन - गणेश आचवल) 

loading image
go to top