दिल तो बच्चा है ! : खेळ नजरांचा!!!

नितीन थोरात
बुधवार, 8 जानेवारी 2020

हडपसरमधून शिवाजीनगरला निघालेलो. पुण्यातल्या स्मार्टबसमध्ये एसी आउटलेटखालच्या शिटावर बसलो. अगदी निवांत. खिशातून मोबाईल काढला आणि फेसबुक सुरू केलं. दोन चार वैचारिक पोस्ट वाचल्या, पण कंटाळा आला. तोच एका मैत्रिणीनं फोटोंचा अल्बम शेअर केलेला दिसला. मैत्रीण म्हणजे फक्त फेसबुकवरची मैत्रीण. कधी बोलणं नाही की मॅसेज नाही.

हडपसरमधून शिवाजीनगरला निघालेलो. पुण्यातल्या स्मार्टबसमध्ये एसी आउटलेटखालच्या शिटावर बसलो. अगदी निवांत. खिशातून मोबाईल काढला आणि फेसबुक सुरू केलं. दोन चार वैचारिक पोस्ट वाचल्या, पण कंटाळा आला. तोच एका मैत्रिणीनं फोटोंचा अल्बम शेअर केलेला दिसला. मैत्रीण म्हणजे फक्त फेसबुकवरची मैत्रीण. कधी बोलणं नाही की मॅसेज नाही. फक्त दिसायला चिकणी म्हणून यादीमध्ये टिकलेली. २४ फोटो होते. पहिला फोटो पाहिला. दुसरा पाहिला. सगळे फोटो एकसे बढकर एक. पाहतच सुटलो. मला राहवलंच नाही. ती कुठतरी ट्रिपला गेली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या ड्रेसवरचे आणि वेगवेगळ्या पोझमधले तिचे फोटो. शॉर्ट कपड्यांमधले फोटो आले, तसे मी ते झूम करून पाहू लागलो. हातावरची मेंदी, पायावरचा टॅटू, गळ्यातलं पेंडंट असं काहीतरी पाहण्याच्या नावाखाली मी माझं मन तृप्त करत सुटलो. 

डोक्‍यावर एसी सुरू होता, पण सदऱ्याच्या आतमध्ये घाम फुटलेला. अल्बममधले फोटो पाहून झाल्यावर मी आजूबाजूला नजर टाकली. कुणी आपल्या मोबाईलमध्ये डोकवत तर नाही, याची खात्री केली आणि तिच्या अकाउंटवर गेलो. मग काय, फोटोंचा खजिनाच सापडला. अधाशासारखे आणखी फोटो पाहू लागलो. कितीतरी फोटो झूम करून पाहिले. धुंद होऊन, नशा चढल्यासारखे पाहतच सुटलो. इतक्‍यात बसमध्ये भांडणं सुरू झाली. माझं लक्ष तिकडं गेलं. तिशीतली एक बाई कॉलेजच्या पोराला शिव्या देत होती. ‘तुझ्या घरी आयाबहिणी नाहीत का रे? कसा बघतोय मेला. मघापासून बघतेय, लाळ गाळत कुत्र्यासारखी नजर फिरवतोय माझ्या अंगावरून. गावाकडून आले म्हणून काय झालं? तुला काय वाटलं, अडाणीहेका मी? मला काय कायदा माहिती नाय काय? नजर खाली घे कुत्र्या, नायतर विनयभंगाची केस ठोकील तुझ्यावर... सांगून ठेवते...’ त्या महिलेचं शेवटचं वाक्‍य संपलं तसा बसमध्ये एकदम सन्नाटा पसरला.

कॉलेजच्या पोराची नजर झुकली होती. महिलेच्या डोळ्यात जाळ होता. काळजात आग पेटल्यासारखी ती त्याच्याकडं पाहत होती. तिचा तो रुद्रावतार पाहून आवंढा गिळत मी कपाळावरचा घाम पुसला. मोबाईलमध्ये पाहिलं. मोबाईलमधल्या त्या हॉट पोरीचा फोटो पटकन बंद केला आणि बसच्या बाहेर पाहू लागलो. ‘बाई आपली आई असते, बहीण असते मग तिच्याकडं कसं काय घाणेरड्या नजरेनं लोक पाहतात,’ असं शेजारच्या काकू बोलत होत्या.मी त्यावर होकारार्थी मान डुलवली आणि त्या पोराकडं तिरस्कारानं पाहू लागलो. इतरांसारखंच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nitin thorat