esakal | विशेष : मित्रांनो, दारूबंदीला विरोध करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra-Chunarkar

युवक म्हणून माझी तयारी आहे की एकवेळ जेवण करून राहील; पण दारूच्या पैशातून माझ्या जिल्ह्याचा विकास मला नको! या विकासात महिलांचा आक्रोश आहे, दारूमुळं अनाथ झालेल्या निरागस मुलांचे केविलवाणे चेहरे आहेत. सोबत शिकलेला मित्र दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन मरतो व पाठीशी तीन महिन्यांची मुलगी व २०-२१ वर्षाच्या पत्नीला ठेवून जातो, तेव्हा या दुःखाची आपण कल्पनाच करू शकत नाही...

विशेष : मित्रांनो, दारूबंदीला विरोध करणार?

sakal_logo
By
रवींद्र चुनारकर

युवक म्हणून माझी तयारी आहे की एकवेळ जेवण करून राहील; पण दारूच्या पैशातून माझ्या जिल्ह्याचा विकास मला नको! या विकासात महिलांचा आक्रोश आहे, दारूमुळं अनाथ झालेल्या निरागस मुलांचे केविलवाणे चेहरे आहेत. सोबत शिकलेला मित्र दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन मरतो व पाठीशी तीन महिन्यांची मुलगी व २०-२१ वर्षाच्या पत्नीला ठेवून जातो, तेव्हा या दुःखाची आपण कल्पनाच करू शकत नाही...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यासाठी काही हालचाली सुरू झाल्या आहेत. संपूर्ण जनतेचा दारूबंदीला विरोध आहे, असा संभ्रम पसरवून दिशाभूल केली जात आहे. त्यावर बोलणं गरजेचं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये १९९३ पासून दारूबंदी आहे. म्हणजेच, माझ्या जन्मापासून मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये खुलेआम उघडी दारूची दुकाने, बिअर बार ह्या गोष्टी कधीच बघितल्या नाहीत. सामाजिक क्षेत्रात काम करावं, असं ठरवल्यावर गावातील युवकांना एकत्र करून काय केलं जाऊ शकतं; ज्यामुळं गावात शांतता व समृद्धता नांदेल, असा विचार केला. सर्व तरुणाईचं एकमत झालं, की गावातील अवैध दारूविक्री बंद व्हावी. पार्श्वभूमी सांगण्याचं कारण, गडचिरोलीतील दारू ही फार मोठी समस्या आहे. मुळात दारूचा सर्वांत मोठा परिणाम महिलांवर व घरातील लहान मुलांवर होतो. दारू पिणाऱ्या पुरुषांकडून त्यांना प्रचंड शारिरिक व मानसिक त्रास होता. दारूबंदी उठवावी, असे जे म्हणतात, त्यांना आपल्या घरच्या महिलांकडून पाठिंबा असेल का, हा प्रश्नच आहे.

दारूबंदी उठवावी, असा सूर लावणारे महिलांवर  होणाऱ्या अत्याचार, शारीरिक आणि मानसिक छळाला समर्थन देणारे आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्या मुलीचं किंवा आपल्या बहिणीचं लग्न जुळवताना आपला एक प्रश्न ठरलेला असतो, ‘मुलगा दारू पितो का?’ दारूच्या समस्येला संपविल्याशिवाय विकास होणार नाही, कुटुंबात शांतता नांदणार नाही, पैसा टिकणार नाही. अनेक लोक दारू पिऊन अपघातात मरतात. अशा लोकांना खांदा देणारे दारूचं समर्थन करतील का? स्थानिक लोकप्रतिनिधी दारूबंदी ही जनतेची मागणी आहे, असं म्हणतात. लोकांना एकदा कळू द्या, ही जनता म्हणजे नेमकं कोण? तुमच्याच पक्षाच्या टोप्या व मफलर घालून हिंडणाऱ्या भाडोत्री कार्यकर्त्यांना तुम्ही  जनता म्हणत असाल, तर ते चुकीचं आहे.

आता राहिली गोष्ट अवैध दारूची. मुळात कायदा-सुव्यवस्था राखणं ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मग नेमकं कोणी कोणाला दारूबंदी फसवी आहे, असं म्हणावं हा प्रश्नच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी भाजप सत्तेत असताना झाली. आत्ताचं सरकार म्हणतं, चंद्रपूरची दारूबंदी फसवी आहे. मग तुमच्याकडं आता संधी आहे, फसव्या दारूबंदीला यशस्वी दारूबंदी करून दाखवणं, दारूबंदी उठवणं नाही. आपल्या नेतृत्वगुणांचा वापर करून दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी माझी युवक म्हणून विनंती आहे. गडचिरोलीतील ग्रामीण व आदिवासी भागात काम करताना लक्षात आलं आहे, की प्रत्येक सभा आणि ग्रामसभांमध्ये महिला, युवा आणि बालकांकडून दारूबंदी व्हावी, हीच मागणी असते. व्यसनाधीन तरुण देशाचं, गावाचं किंवा कुटुंबाचं भवितव्य ठरवू शकत नाही. आता सरकारनं हे ठरवायला पाहिजे, त्यांना देश घडविणारे युवक पाहिजेत की नशेत बुडालेले, गटारीत लोळणारे तरुण.

तथाकथित आदिवासी नेत्यांना एक सामन्य व सजग तरुण म्हणून विनंती आहे की, हे दारूबंदी उठविण्याचं थोतांड बाजूला ठेवून गडचिरोली जिल्ह्यातील ज्वलंत समस्या सोडवाव्यात. अनेक आदिवासी लोकांकडं जातीची प्रमाणपत्रं नाहीत, त्यामुळं ते अनेक योजनांपासून व परिणामी शिक्षण व नोकरीपासून वंचित आहेत. वनहक्क कायदा येऊन १४ वर्षं झालीत, अजूनही आदिवासींकडं वैयक्तिक जमिनीचं अधिकारपत्र नाही, सामूहिक वनाचा पट्टा नाही. यावर लक्ष केंद्रित करून गडचिरोली जिल्ह्याच्या उज्ज्वल व निर्व्यसनी भविष्याकडं लक्ष देण्यात यावं. दारूचा महसूल बुडतो म्हणून गडचिरोलीचा विकास थांबला आहे, असं म्हणणाऱ्यांनी या महसुलाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. युवक म्हणून माझी तयारी आहे की एकवेळ जेवण करून राहील; पण अशा पैशातून माझ्या जिल्ह्याचा विकास मला नको! या विकासात महिलांचा आक्रोश आहे, दारूमुळं अनाथ झालेल्या निरागस मुलांचे केविलवाणे चेहरे  आहेत. सोबत शिकलेला मित्र दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन मरतो व पाठीशी तीन महिन्यांची मुलगी व २०-२१ वर्षांच्या पत्नीला ठेवून जातो, तेव्हा या दुःखाची आपण कल्पनाच करू शकत नाही... प्रत्येकाच्याच आयुष्यात असं एक तरी उदाहरण आहेच. या परिस्थितीत आपण दारूबंदी उठवण्याचं समर्थन करणार का? प्रत्येकानं याचा विचार करावा. 

हे बघा मित्रांनो, आपलं योग्य नेतृत्व करतील व आपल्या भागातील विकासाला चालना देतील म्हणून आपणच त्या नेत्यांना निवडून दिलं आहे; ते चुकत असल्यास मूकपणे त्यांच्यासोबत न जाता आपल्याला विरोध करावाच लागेल. दारूबंदी उठविण्यास माझा सत्याग्रही मार्गानं कठोर विरोध राहील. 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top