टिवटिवाट : प्रतिक्रियावादी आभासी जग

Sakal-Media
Sakal-Media

सुशांतसिंह राजपूत पडद्यावर धीराचा संदेश देणारा, स्वप्नं सोशल मीडियावर जाहीर करून ती पूर्ण करण्याची पावलं टाकणारा. सुशांतची आत्महत्या पिळवटून टाकणारी आहे. त्याचवेळी, आत्महत्येवरून सोशल मीडियावर सुरू असलेला प्रतिक्रियावादी सूर उथळ आणि उद्विग्न करणारा आहे. एखाद्याच्या मृत्यूबद्दल दुःख होणं, श्रद्धांजली वाहणं ही मानवी भावना आहे. सुशांतचा मृत्यू अकाली आणि आत्महत्येनं झाला असल्यानं मत-मतांतरंही मान्य आहेत; तथापि मतं मांडण्याच्या मोहापोटी मृत्यूसारख्या संवेदनशील आणि कुटुंबाशी घट्ट संबंधित विषयाचे किती धिंडवडे काढावेत, याला सीमा राहत नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर सुरू झालेली चर्चा प्रगल्भ मार्गानं जाण्याऐवजी प्रतिक्रियावादी बनली, ट्रोलिंगपलीकडं त्या चर्चेला महत्त्व उरलं नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पडद्यावरचं आयुष्य फक्त पडद्यापुरतं असतं आणि वास्तव जीवनात तसं काही असेल, असं नसतं. सोशल मीडियाबाबतीतही आता हेच म्हणावं लागतं आहे. सोशल मीडियावर सल्लागाराचं आयुष्य जगणारे, प्रतिक्रियांचा पाऊस पाडणारे वैयक्तिक आयुष्यात किती परफेक्ट असतील, याचा काही अभ्यास अजून समोर आलेला नाही. एखादा विषय ट्रेंडमध्ये आहे म्हटल्यावर आपण प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, अशी एकप्रकारची ‘कंपल्सिव्ह डिसऑर्डर’ आता वारंवार दिसू लागली आहे. सोशल मीडियावर बनविलेल्या स्वतःच्या प्रोफाइलच्या मोहात स्वतःच पडायला झाल्याची ही परिणिती आहे.

घराणेशाहीचा मुद्दा मांडणारं एक प्रोफाइल पाहण्यात आलं. एकूण रचना पाहता, प्रोफाइल फेक असण्याच्याच सर्व शक्यता. या प्रोफाइलवरून बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर भाष्य करण्यात आलं. फोटोंचा कोलाज बनवून शेअर करण्यात आला.

पाहता पाहता घराणेशाहीविरोधात ट्रेंडही सुरू झाला. या ट्रेंडच्या निमित्तानं घराणेशाहीवर चर्चा होण्याऐवजी भरकटून चाहत्यांनी आपल्या नावडत्या कलाकाराला ट्रोलिंग सुरू केलं आणि मुद्दा कुठच्या कुठं वाहून गेला. घराणेशाहीबद्दल हिरिरीनं ट्रोलिंग करणारे स्वतःच्याच प्रतिमेच्या मोहात अडकून राहिल्याचं भाषेवरून दिसलं. 

सोशल मीडियावर प्रतिक्रियावादी, कंपल्सिव्ह बनणं आणि अकाली निर्णयाला पोचण्याची घाई करणं टाळता यायला हवं. सुशांतची आत्महत्या असो किंवा राजकीय घडामोडी; प्रत्येक ठिकाणी निर्णयाची घाई झाली आहे. आकलन राहिलं दूर, विषय नीटपणानं पचलेलाही नसताना वरवरच्या माहिती-अपमाहितीवर आधारित निर्णय घेतले जातात, असं बहुसंख्य ट्विट सांगतात. ही घाई कदाचित आजच्या काळाशी सुसंगत राहण्यातून येत असावी. काळ झपाट्यानं बदलतो आहे, असं वारंवार कानावर आदळल्यानं, वाचल्यानं आपणही वेग वाढवला पाहिजे, असं वाटू शकतं. फक्त वेग वाढवून बदल होत नसतो; भोवतालच्या आकलनातून होत असतो. आकलन न होताच वाढवलेला वेग अपघाताच्या वाटेवर घेऊन जातो. हे भान सोशल मीडियात गमावलं जाण्याचा सर्वाधिक धोका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com