दिल तो बच्चा है! : माझे पप्पा भांडी घासतात !

Indian-Kitchen
Indian-Kitchen

‘अय्या, तुझे पप्पा भांडी घासतात? आमचे पप्पा नाही पकुबाईसारखी भांडी घासत. यज्ञचे पप्पा भांडी घासतात. यज्ञचे पप्पा भांडी घासतात...’ असा गलका झाला आणि पोरगा रडवेल्या तोंडानं सगळ्यांकडं पाहू लागला. भर दुपारी किचनमध्ये मी भांडी घासत होतो. लेकाच्या मैत्रीणी त्याच्यासोबत खेळायला घरात आलेल्या. त्यांनी मला पाहिलं आणि एकमेकींकडं पाहून तोंडावर हात ठेवत हसू लागल्या. या पोरी नक्कीच लेकाला चिडवणार याचा अंदाज आला होता आणि तसंच झालं. संध्याकाळी लेक खेळण्यासाठी गेला आणि पोरी त्याच्यावर हसू लागल्या. मी गॅलरीत थांबून हे पाहतच होतो. लेकानं शरमेनं मान खाली झुकवली होती. 

यात ना त्याचा काही दोष होता ना त्याला चिडवणाऱ्या पोरींचा. आपल्याकडं भांडी घासणं हे काम बाईचंच आहे किंवा दुय्यम आहे हे कमालीच्या रुढार्थाने रुजवलंय गेलयं. त्यामुळं ते कुठल्या पुरुषानं करणं सहजासहजी रुचतच नाही. त्या पोरांनाही रुजणार नव्हतंच. क्षणभरानं त्यांचा विषय बदलला आणि खेळू लागले.

रात्री जेवण झाल्यावर मी चहासाठीचं पातेलं धुवून ठेवत होतो तोच लेक आला आणि म्हणाला, ‘पप्पा, तुम्ही भांडी नका ना घासत जाऊ. माझे फ्रेंडस्‌ मला चिडवतात.’ मी होकार दिला आणि पातेलं ठेऊन दिलं. काहीतरी लॉजिक सांगून त्याला स्त्री पुरुष समानता पटवून द्यावी एवढ्या वयाचा तो नव्हताच. दुसऱ्या दिवशी सकाळी कचऱ्याची गाडी आली. नेहमीप्रमाणे मी कचरा टाकायला गेलो. तिथही बाया होत्याच. लेक गॅलरीतून पाहत होता. हे पण काम बायांचं आहे आणि मी करतोय असं लेकाच्या डोक्‍यात आलं असेल असा विचार करत मी मान खाली घातली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नऊ वाजता लेकाला घेऊन भाजीपाला आणायला गेलो. मंडईत गर्दी होती. लेकाला म्हणालो, ‘कुणाकडून भाजी घ्यायची? तो बाबा विकतोय त्याच्याकडून घ्यायची, की ती बाई विकतीये तिच्याकडून घ्यायची?’ गोंधळलेल्या चेहऱ्यानं लेक पाहू लागला. म्हणाला, ‘‘ज्याच्याकडं चांगली असेल त्याच्याकडून घ्या.’’ मी होकार दिला. तिथून पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल भरण्यासाठी काही ठिकाणी बाया होत्या, काही ठिकाणी पुरुष. तिथं लेकाला विचारलं, ‘‘कुणाकडून पेट्रोल घ्यायचं ? बाईकडून की बाबाकडून?’’ पोरगा विचारात पडला. काहीच बोलला नाही. मी बाईकडून पेट्रोल घेतलं. तिथून पोस्टात गेलो, कुरियरच्या ऑफिसमध्ये गेलो आणि नंतर बॅंकेतपण गेलो. 

प्रत्येक ठिकाणी त्याला मी नेहमीचा प्रश्‍न विचारत होतो. ‘‘बाईकडं जायचं की बाबाकडं?’’ तो काही उत्तर देत नव्हता आणि मी बाईकडे जाऊन काम करुन घेत होतो. बाया आणि पुरुष सारखेच असून प्रत्येक ठिकाणी बाया बिनधास्त काम करू शकतात, हे त्याला दाखवून देत होतो. त्यामुळं मी भांडी घासत असलो तरी त्यात दुय्यम असं काहीच नाही, हे पटवून देण्यासाठी मी पद्धतशीर डोकं लावलं होतं. लेकाला बोलून दाखवण्यापेक्षा मी कृतीतून पटवून दिलय याचा अभिमान वाटत होता. घरी येऊन मी हे बायकोला सांगणार तोच लेक म्हणाला, ‘‘मम्मी तुला माहितीये. पप्पा सगळी कामं बायांकडूनच करुन घेत्यात. तिथं बाबा असला तरी कोणत्याच बाबाकडं जात नाहीत. फक्त बायांकडच जात्यात.’’ 

बायको भुवयांचा आकडा करुन माझ्याकडं पाहू लागली. मी काही न बोलता आवंढा गिळला आणि बेसिनमध्ये ठेवलेल्या भांड्याच्या ढिगाकडं गेलो. बायको लॅपटॉपवर काम करत होती. लेक मोबाईलवर गेम खेळत होता. अव्यक्त स्त्री पुरुष समानता माझ्या घरात नांदत होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com