esakal | लग्नाची गोष्ट : संसाराचं ‘मोहित’ करणारं ‘चॅलेंज’!
sakal

बोलून बातमी शोधा

Nikhil and Mayuri Raut

लग्नाची गोष्ट : संसाराचं ‘मोहित’ करणारं ‘चॅलेंज’!

sakal_logo
By
प्रशांत पाटील

निखिल व मयूरी राऊत

मराठी मनोरंजन सृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांचा अभिनयाचा प्रवास खलनायक, सहायक व्यक्तिरेखेपासून सुरू होऊन आता प्रमुख भूमिकेपर्यंत येऊन पोहोचला आहे. असाच एक अभिनेता म्हणजे निखिल राऊत. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याला मोलाची साथ लाभली त्याची पत्नी मयूरी राऊत हिची. मयूरी एका प्रतिष्ठित कंपनीत मोठ्या पदावर काम करते. अभिनय क्षेत्रात काम करताना सुरुवातीला निखिलचा अभिनयासोबतच डेकोरेटर्सचाही व्यवसाय होता. याच व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशानं निखिल दुसऱ्या डेकोरेटर्सशी पार्टनरशिप करायला गेला असताना तिथं त्याला मयूरी भेटली. त्यावेळी निखिल हा अभिनेताही आहे हे मयुरीला माहीत नव्हतं, पण मयुरीच्या बोलक्या डोळ्यांवर आणि तिच्या हास्यावर निखिल ‘मोहित’ झाला आणि तिथून पुढं त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. सहा महिने एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि सात वर्षांपूर्वी मयूरी ही निखिलची बायको म्हणून राऊतांच्या घरी नांदायला आली.

निखिल म्हणाला, ‘‘मयूरी स्वभावानं अत्यंत चांगली मुलगी आहे. ती कायम हसतमुख असते. तिचा स्वभाव हा खूप मनमिळाऊ आहे. तिच्या या मनमिळाऊ स्वभावानं तिनं माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला पटकन आपलंस केलं आहे. ती सर्वांना सांभाळून घेते. तिला सगळ्यांशी तितक्याच चांगल्या प्रकारे गप्पा मारू शकते. ती माझी खरी समीक्षक आहे. माझ्या प्रत्येक कामाबद्दल ती खरी-खरी प्रतिक्रिया देते. एखादी गोष्ट आवडली, तर ती त्याचं कौतुक करतेच करते, पण तसंच कधी काही नाही आवडलं तेही स्पष्टपणे सांगते. मी शूटिंगनिमित्त बाहेरगावी असलो, की माझ्या पाठीमागं आमचं घर, माझे आई-बाबा यांना ती उत्तमरीत्या सांभाळते. मुंबईत भाड्याच्या घरात राहण्यापासून ते याच मायानगरीत स्वतःचं घर घेण्यापर्यंतचा प्रवास आम्ही एकत्र केला आहे. माझ्या आयुष्यात पावलोपावली तिनं मला साथ दिली आहे.’’

मयुरीच्या मते निखिल हा परफेक्ट माणूस आहे. तिनं निखिलचं तोंडभरून कौतुक केलं. ती म्हणाली, ‘‘आम्ही नवरा बायको असलो, तरी आमच्यातलं नातं मैत्रीचंच आहे. निखिल खूप समंजस, मनमिळाऊ मुलगा आहे. तो नेहमीच आनंदी आणि उत्साहानं भरलेला असतो. तो आयुष्याकडं कायम सकारात्मक दृष्टिकोनातून बघत आला आहे. तो अत्यंत समजूतदार आहे. निखिल ही माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती आहे, ज्याच्याशी मी छोट्यातली छोटी गोष्टही शेअर करते. माझी अशी कुठलीही गोष्ट नाही जी त्याला माहिती नाही. माझं प्रत्येक म्हणणं तो शांतपणे ऐकून घेतो. कामाच्या बाबतीत असो किंवा रोजच्या आयुष्यात; त्याला प्रत्येक गोष्ट नीटनेटकीच लागते. कामाच्या बाबतीत तो अत्यंत पॅशनेट आहे. तो त्याचं दोनशे टक्के देऊन काम करतो. वेळेच्या बाबतीत तो प्रचंड पर्टिक्युलर आहे. ठरलेल्या वेळात ठरलेली गोष्ट तो करतोच करतो. लग्नानंतर आमच्या दोघांच्याही स्वभावात काही बदल झालेला नाही. लग्नापूर्वी आम्ही एकमेकांशी जसे वागायचो, एकमेकांची थट्टा मस्करी करायचो तितकीच आजही करतो.’’

मयूरी निखिलची बायको आहेच तशीच ती त्याची पहिली चाहती आहे. तिनं निखिलची सगळीच कामं पाहिली आहेत. निखिलची स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका असलेल्या ‘चॅलेंज’ या नाटकाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. हे नाटक तर मयुरीनं कित्येक वेळा पाहिलं आहे. निखिलनं ‘फर्जंद’ या चित्रपटात आणि ‘चॅलेंज’ या नाटकात साकारलेली भूमिका मयुरीला विशेष आवडली आहे. निखिल सध्या झी मराठीवरील ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेत ‘मोहित’ हे पात्र साकारत आहे. या मालिकेतल्या मोहितला पाहून ‘तू का त्या स्वीटूला त्रास देतोस? नको वागूस असा...’ अशी मयुरीची प्रतिक्रिया असते असं निखिलनं गमतीत सांगितलं. पण अशी प्रतिक्रिया सगळ्यांकडून मिळत असल्यानं हीच त्याच्या कामाची पोचपावती आहे, असं निखिल म्हणाला. ‘मोहित’ ही एक वृत्ती आहे. आपण आपल्या आयुष्यात कसं वागू नये हे मोहितला बघितल्यावर शिकायला मिळतं. तसंच खऱ्या आयुष्यात निखिल हा मोहित या पात्राच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा मुलगा आहे असेही त्यानं स्पष्ट केलं.(शब्दांकन : राजसी वैद्य)

loading image