esakal | खाद्यभ्रमंती : शेळके मामांचा शेवगा मसाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Shevaga Masala

खाद्यभ्रमंती : शेळके मामांचा शेवगा मसाला...

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

पुण्यामध्ये उगाचच महागड्या असलेल्या एका रेस्तराँमध्ये कोणाबरोबर तरी शेवगा मसाला खाल्ला आणि शेवगा मसाल्याच्या स्वादापेक्षा फसवलो गेल्याची बोचच अधिक मनात राहिली. एका मित्राला हा किस्सा सांगितल्यानंतर त्यानं मला औरंगाबादजवळच्या शेळके मामांच्या ढाब्याचं नाव सांगितलं. कधी जाणं झालं त्या बाजूला तर तिथं शेवगा खा आणि मग सांग...

देव अनेकदा काहीही न मागता देत असतो. अशीच एक स्वादिष्ट संधी मला मिळाली. महागड्या रेस्तराँच्या बोचऱ्या अनुभवानंतर काहीच दिवसांनी मी, धीरज, आनंद, कौस्तुभ आणि विजय शिर्डीला गेलो. येताना वाट वाकडी करून भद्रा मारुतीचं दर्शन करून येऊ, असं ठरलं. भद्रा मारुतीचं दर्शन पार पडल्यानंतर मग शेळके मामांच्या ढाब्यावर आवर्जून थांवणारच होतो. ते सर्व प्रेमात पडलेले आणि मी पडणार होतो. देवगिरीचा किल्ला मागे टाकल्यानंतर दौलताबाद टी पॉइंटजवळ शेळके मामांचा ढाबा लागतो. आनंद, कौस्तुभ आणि विजय वगैरे मंडळी अनुभवलेली होती. त्यामुळं ऑर्डर काय द्यायची, हा विचार करण्यात फार वेळ नाही गेला. काही मिनिटांतच शेवगा मसाला आणि सोयाबीन मसाला आमच्यासमोर पेश झाला. काळ्या मसाल्यात सजलेला शेवगा आणि सोयाबीन खाताना आम्ही अक्षरशः स्वर्गसुख अनुभवत होतो. प्लेटमधून शेंगा बाहेर पडतात की काय, असं वाटावं इतकी भरगच्च भरलेली प्लेट नि आजूबाजूला भरपूर काळा मसाला. शेळके मामांना धन्यवाद देत आणि पुण्यातील त्या महागड्या रेस्तराँला शिव्या हासडत शेवग्याच्या शेंगांचा फडशा पाडत होतो.

सोयाबीन पण एकदम झक्कास. सोयाबीन खाताना अनेकदा वातड किंवा चामट वाटतो, पण इथला सोयाबीनही एकदम नाजूक. मसालाही एकदम आतपर्यंत मुरलेला. सोयाबीन दही किंवा ताकात भिजविला होता का, माहिती नाही. पण खाताना झणझणीतपणा बरोबरच एक हलकी आंबट चव जाणवत होती. त्यामुळं आपली एक शंका. दोन्ही स्टार्टर्स इतके झक्कास होते, की सोयाबीन कधी संपले आणि शेवग्याची प्लेट रिकामी होऊन शेजारी सालींची प्लेट कधी तयार झाली कळलंही नाही.

स्टार्टर्समध्येच आम्ही तुडुंब होण्याच्या मार्गावर होतो, पण सकाळपासून फार काही खाणं झालं नव्हतं आणि पुण्यापर्यंत परत थांबायचं नव्हतं म्हणून जेवणही मागवलं. जेवणात शेवभाजी, भेंडी फ्राय आणि मच्छी फ्रायची ऑर्डर दिली. तिन्हीमध्ये मी भेंडीच्या प्रेमात पडलो. भेंडी आणि मिरची हे एकमेकांमध्ये इतके बेमालूमपणे मिसळून गेले होते, की विचारू नका. भेंडी कुरकुरीत आणि मिरची कुरकुरीतबरोबर झणझणीतही. त्यामुळं कोणीही भेंडीच्या प्रेमात पडलं असतं...

आजही आमटीमध्ये किंवा सांबारात कधी शेवग्याची शेंग आली, भाजीवाल्याकडे शेवग्याच्या शेंगा दिसल्या किंवा ‘त्या’ महागड्या रेस्तराँवरून गेलो, तर पहिल्यांदा डोळ्यासमोर शेळके मामांच्या ढाब्यावरची शेवगा मसालाची प्लेट येते... ही आहे शेळके मामांच्या शेवगा मसाल्याची जादू... कधी गेलात तर नक्की प्रेमात पडा...

loading image