दिवाळी आरोग्याची Healthy Diwali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali

दिवाळी आरोग्याची

sakal_logo
By
टीम YIN युवा

प्रा. गायत्री बुलाख - दीपावली अर्थात दिवाळी या शब्दाची निर्मिती ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणी ‘आवली’ म्हणजे ‘ओळ’ अर्थात दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजे ‘दिवाळी’ . प्रभू श्रीराम जेव्हा चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्या नगरीत परत आले तेव्हा तिथल्या प्रजेने दीपोत्सव साजरा केला अशी कथा सांगितली जाते. नवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते.दिवाळी म्हटलं की झगमगते दिवे, दारावर लावलेले आकाशकंदील, फटाके असे दृश्य डोळ्यांसमोर येते. नवीन कपडे, अन्नपदार्थाची रेलचेल, भरपूर फटाके, दिव्यांची आरास इत्यादी अनेक गोष्टींमुळे दिवाळी हा मोठा सण असतोच, पण खूप मोठी आनंदाची पर्वणी असते.

दिवाळीत वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते आणि पचनशक्ती वाढू लागते. भूक वाढू लागते. पोषण होण्यासाठीचा हा उत्तम काळ असतो.पचविण्याची शक्ती चांगली असल्याने जड अन्नपदार्थ पण चांगले पचवले जातात. खूप सारे पदार्थ दिवाळीत बनविले जातात. करंजी, चकली, लाडू, शंकरपाळी, चिवडा…..प्रत्येक पदार्थ वेगळा असतो चवीसाठी आणी त्यातील घटक पदार्थासाठी. या फराळाद्वारे खूप प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले जातात. खाण्यात खूप वैविध्य येते आणि त्यामुळे भरपूर जीवनसत्व शरीराला मिळतात.

या पदार्थामध्ये प्रामुख्याने कार्बोदके व चरबीयुक्त पदार्थ जास्त असतात. प्रथिने असलेले पदार्थ पण आहेत. उदाहरणार्थ चकली. बरेचसे पदार्थ तळून किंवा साखरेच्या पाकात तयार केले जातात. तूप बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आपण हे पदार्थ बनवितो,त्यात फार काही बदल झाले नाहीत. मिळणारी ऊर्जा भरपूर असते, पण एका गोष्टीत मोठा बदल झाला आहे, ती म्हणजे आपली जीवनशैली.पूर्वीच्या लोकांना भरपूर शारीरिक कष्ट होते आता बैठी जीवनशैली आहे. ऊर्जा खर्च होण्याचे प्रमाण कित्येक पटींनी कमी झाले आहे. म्हणजेच मिळणारी ऊर्जा तेवढीच किंबहुना वाढत गेली पण खर्च होण्याचे प्रमाण घटले आणि त्यातूनच स्थूलत्व , मधुमेह हे आजार उदयास आले. म्हणून दिवाळी जरूर साजरी करा; पण डोळसपणे. जसे आपण आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काळाप्रमाणे बदल केले तसेच हे पदार्थ बनविण्याच्या पद्धतीमध्ये केले तर दिवाळी आरोग्यदायीसुद्धा होईल.

अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस ह्या दिवशी गोमातेची पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये गाईला गोमाता असे म्हणले आहे कारण गाईच्या माध्यमातून जे लाभ होतात त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही पशु बरोबर होऊ शकत नाही. आज देशात हजारो गोहत्या होत आहेत ,त्यासाठी सर्व स्तरातून देशात होणारी गोहत्या रोखण्यासाठी काही प्रयत्न होयला पाहिजेत.

अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी , अर्थात दिवाळीचा दुसरा दिवस ह्या दिवशी श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. ह्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच धनत्रयोदशी म्हणजे देवतांचा वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती. वैद्य मंडळी ह्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून कडुनिंब व खडीसाखर असा प्रसाद देतात. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे , रोज तीन ते चार पाने कडुनिंबाची पाने खाल्याने आरोग्य प्राप्त होते व कुठलीही व्याधी होण्याची शक्यता राहत नाही .

आज करोना सारख्या महामारिचा वाढत संसर्ग पाहता हिंदू संस्कृती मध्ये सणांच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेतली आहे हे अगदी ठळकपणे जाणवते.

अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरकचतुर्दशी. ह्या दिवशी नरकासुर राक्षसाचा वध केला त्या प्रित्यर्थ साजरा केला जाणारा दिवाळीतला दिवस. या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते.लवकर उठण्याचे फायदे सर्वांना माहित आहेतच. भारतीय संस्कृती आणी आयुर्वेदशास्त्र यांची सांगड प्रत्येक बाबतीत अनुभवायला मिळते.. दिवाळीत केले जाणारे फराळाचे पदार्थ व हिवाळ्यात आयुर्वेदानुसार खायला सांगितलेले पदार्थ सारखेच आहेत. तसेच दिवाळीमधले अभ्यंगस्नान हे त्वचेसाठी उपयुक्त म्हणजेच आरोग्याचा किती विचार पूर्वी पासून झाला आहे हे स्पष्ट दिसते.

नरकचतुर्दशी नंतर असते अमावस्या म्हणजेच लक्ष्मी पूजनाचा दिवस. ह्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले व त्या नंतर सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले असे पारंपरिक कथा सांगते. प्रातः काळी मंगलस्नान व देवपूजा करून, आप्तेष्टांबरोबर भोजनाचा आस्वाद घयावा. प्रदोषकाळी सुशोभित केलेल्या मंडपात श्री लक्ष्मी श्री विष्णू आणि कुबेर यांची पूजा हा लक्ष्मी पूजेचा विधी. ह्या दिवशी लक्ष्मीतत्व कार्यरत असते व त्याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी यथासांग पूजा करावी. दिवाळी हा सण मांगल्याचा ,पावित्र्याचा आनंदाचा आहे पण त्या दिवशी लक्ष्मी देवीचे फोटो असलेले फटाके फोडले जातात त्या चित्रांचे तुकडे फटाके फुटल्यावर इतरत्र फेकले जातात , एका प्रकारे हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे तसेच फटाक्यांमुळे वायू व ध्वनी प्रदूषण पण खूप प्रमाणात होते. ह्या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात केल्या तर आनंद द्विगुणित करता येऊ शकेल.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. श्री विष्णूने हि तिथी बलीराजाच्या नावाने केली म्हणून बलिप्रतिपदा असे नाव. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक ज्या दिवशी अभ्यंगस्नाना नंतर नवीन वस्त्र परिधान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात व मिष्टान्न भोजन करून आनंद साजरा करतात.

कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस म्हणजे भाऊबीज. ह्या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्याकडे जेवायला गेला म्हणून यमद्वितीया असेही एक नाव. ह्या दिवशी भावाने आपल्या बहिणीकडे जावे व बहिणीने त्याचे औक्षण करावे अशी पद्धत.

सध्या कितीतरी भगिनींवर अत्याचार होताना दिसतात तर असे सुचवावेसे वाटते कि अशा बहिणींना स्वयंरक्षणाचे धडे द्यायला पाहिजेत व त्यांना आत्मनिर्भर होण्यात प्रोत्साहित करायला पाहिजे.

उत्साह आणि जल्लोषच्या वातावरणात आपण आपल्या आरोग्याकडे, सुरक्षिततेकडे आणि पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करतो. दिवाळी साजरी करताना आपल्याला आसपासच्या लोकांचा विरस पडू नये. दिवाळीतील फराळ खाताना आपल्या आरोग्याचाही विचार केला पाहिजे. दिवे लावताना सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. दिवाळी साजरी करताना आपल्यामुळे निर्सगाला हानी पोहचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

प्रा. गायत्री बुलाख -श्रोत्रीय

सहायक प्राध्यापक ,

रसायनशास्त्र विभाग ,

मॉडर्न कॉलेज ,गणेशखिंड ,पुणे

मोबाईल: ८३९०७१८४९६

loading image
go to top