गोष्ट मैत्रीची : आम्ही मैत्र जिवाचे...

Devyani-Khare-Gondhalekar
Devyani-Khare-Gondhalekar

मैत्री कोणाशीही, कधीही आणि कुठंही होऊ शकते. स्वभाव जुळले की मने जुळतात आणि मैत्री होते. मैत्रीच्या बाबतीत मी अगदी गर्भश्रीमंत आहे! मला जिवाला जीव लावणाऱ्या आणि अगदी जिवलग अशा खूप मैत्रिणी आहेत. आजची माझी गोष्ट आहे एका शाळेपासूनच्या मैत्रिणीची. तिचे नाव स्मिता दीक्षित-पांगारकर. एका संस्कार वर्गासाठी गेले असताना मी तिला पहिल्यांदा पाहिले, पण आमच्यात काही बोलणे झाले नाही. तिचा उंची पोशाख आणि अबोल स्वभाव पाहून मला ती काहीशी शिष्टच वाटली. मात्र, काही दिवसांनी ती मला माझ्या शाळेत आणि मग वर्गात दिसल्यानंतर मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. पुढे आमची छान मैत्री झाली. आम्ही शाळेव्यतिरिक्तही अनेकदा सोबत असायचो आणि एकमेकींकडे राहायलाही जायचो. याच काळात आमची मैत्री अधिक दृढ झाली आणि स्वभाव उलगडत गेले.

मैत्रीची खरी पारख कठीण काळातच होते, असे म्हणतात. शाळेचे दिवस संपले आणि आम्ही कॉलेजला गेलो. वाटा वेगळ्या झाल्या, मात्र मैत्री कायम राहिली. आमच्या शाळेची रि-युनिअन पार्टी चार वर्षांनी ठरली, तेव्हा मी येऊ न शकण्याची वेगवेगळी कारणे सांगितली. मात्र, माझ्या या मैत्रिणीने मला चांगलीच ताकीद दिली आणि प्रसंगी महत्त्व कशाला द्यायचे हेही लक्षात आणून दिले. त्यामुळे मी रि-युनियनला हजर राहिले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढे आम्ही लग्न होऊन एकाच शहरात आलो आणि लवकरच या मैत्रीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. मी खूप आजारी पडले. योगायोगाने स्मिता जवळच्याच कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती. तिला माझी अवस्था कळताच केवळ माझ्यासाठी जेवणाच्या सुट्टीत ती थेट माझ्या घरी यायची. मला डॉक्टरकडे घेऊन जाणे, माझ्यासाठी पथ्याच्या गोष्टी बनवून देणे, औषधे देणे हे सर्व तिने स्वतःचा व्याप सांभाळून केले. एखाद्याला आपले मानले, की त्यासाठी काही करताना किती आनंद होते हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले. आमची मैत्री आजही कायम असल्याचे खूप आनंद होतो...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com