एकलव्य कथा

एकलव्य कथा

- प्रा.रघुनाथ कडाकणे

हस्तिनापूरजवळच्या निबीड अरण्यात लहानगा एकलव्य एका झाडावर चढून त्याची फळं यथेच्छ खात होता. त्या झाडाच्या समीपच हरणांचा एक कळप स्वच्छंदपणे हुंदडत होता. इतक्यात कुठूनतरी एक भला मोठा वाघ आला आणि त्यानं एका हरिणाच्या पिलावर जोराची झडप घातली. ते पिल्लू अतीव वेदनेनं कळवळलं पण त्याची कोवळी लुसलुशीत मान त्या वाघाच्या जबड्यात सापडली असल्यानं कसलाही बोभाटा न करता त्यानं जीव सोडला. एकलव्यानं हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहिलं. ते विचित्र चित्र पाहून तो कोवळा पोर कमालीचा अस्वस्थ झाला. त्या क्रूर वाघाची पारध करण्यासाठी म्हणून धनुर्विद्या शिकायचं त्यानं त्याक्षणीच ठरवलं.

तसं बघायला गेलं तर, त्याचं घराणंच शिकाऱ्याचं होतं. परंतु ही विद्या त्याला काही पोटापाण्यासाठी शिकावयाची नव्हती. तर त्या अरण्यातील सर्व असहाय जीवांचं संरक्षण करण्याची युध्दनीती म्हणून ती त्याला आत्मसात करावयाची होती. त्याकरिता त्याला एका निष्णात गुरुची गरज होती. म्हणून तो गुरु द्रोणाचार्यांकडे गेला. पण तो शुद्र असल्याने गुरु द्रोणाचार्यांनी त्याला आपल्या गुरुकुलात प्रवेश नाकारला. परंतु त्यावर एकलव्य निराश झाला नाही. त्याची शिकण्याची इच्छा इतकी प्रबळ होती, इतकी अनावर होती की त्याकरिता त्यानं स्वतःचंच एक मुक्त गुरुकुल उभारलं. तिथं गुरु म्हणून द्रोणाचार्यांची चिखलमातीची एक मूर्ती त्यानं बसविली आणि तिच्या साक्षीनं विद्यार्जनास प्रारंभ केला. आपल्या ठायी असणारी अजोड जिद्द, असीम चिकाटी आणि अथांग स्वयंप्रेरणा यांच्या बळावर अल्पावधीतच तो धनुर्विद्येत निपुण झाला.

एकलव्य कथा
खडकवासला प्रकल्पात 4 दिवसांत 3 महिन्यांचा पाणीसाठा

एके दिवशी प्रभातप्रहरी तो आपला सराव करीत असताना जवळच कुठेतरी एक कुत्रा सारखा भुंकून त्याचा चित्तभेद करीत होता. म्हणून त्या आवाजाच्या दिशेनं लागोपाठ सात बाण त्यानं अलगद सोडले. तसा तो भुंकण्याचा आवाज पुरता थंडावला. तो कुत्रा कमालीचा भेदरून गेला आणि सैरावैरा धावत सुटला. काही वेळातच तो गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुकुलाजवळ पोहोचला. द्रोणाचार्यांची नजर त्या धापा टाकणाऱ्या श्वानावर पडली. त्याच्या मुखात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सात बाण घुसलेले होते. आणि आश्चर्य म्हणजे तरीदेखील त्या श्वानमुखातून रक्ताचा एकही थेंब ओघळत नव्हता. अर्थात, त्याला यत्किंचितही ईजा पोहोचली नव्हती. असा कोण सव्यसाची धनुर्धर या धरणीवर अवतरला आहे याचा शोध घेण्यासाठी गुरु द्रोणाचार्य चौफेर धावत सुटले. घटकाभरातच त्याना आढळून आले की, त्यांचा एक बहि:स्थ (बहिष्कृत) शिष्य एकलव्य हा एकमेवाद्वितीय एकाग्रतेने धनूर्विद्येचा सराव करतो आहे. त्या श्वानाला जराही जखमी न करता त्याच्या मुखात सात बाण मारण्याचे कौशल्य याचेच असणार हे त्यानी मनोमन ताडले. अशी ही असामान्य विद्या देणारे तुझे गुरु तरी कोण आहेत बरे अशी त्यांनी त्यास पृच्छा केली. तेव्हा एकलव्याने जवळच असलेल्या एका मूर्तीकडे अंगुलीनिर्देश केला. पाहतात तर काय, ती मूर्ती हुबेहुब त्यांचीच होती. या मुलाची अतीव ज्ञानलालसा आणि असीम गुरुभक्ती पाहून क्षणभर त्यांचे हृदय द्रवले. परंतु आपली राजदरबारातील नोकरी आणि आपल्या राजशिष्यांच्या मातब्बरीस असणारा संभाव्य धोका त्यांना नजरेआड करता आला नाही. त्यामुळे मोठ्या धूर्तपणाने त्यांनी एकलव्याकडे त्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरूदक्षिणा म्हणून मागितला.

एकलव्य कथा
पुणे रेल्वे स्थानक झालं ९७ वर्षांचे

वस्तुतः द्रोणाचार्यांनी आपल्याकडे गुरुदक्षिणा मागणे म्हणजे आपण आता धनुर्विद्येत संपूर्णत: पारंगत झालो आहोत हे मान्य करणे होय. आणि दुसरे म्हणजे, आडपडद्याने का होईना द्रोणाचार्यांनी आपले शिष्यत्व आता पत्करले आहे, असे एकलव्यास वाटले. त्यामुळे एकलव्य सदगदीत झाला. आणि क्षणाचाही विलंब न करता तो त्याच्या मागच्या बाजूस वळला. तेथे त्याने आणखी एक मूर्ती बनवून ठेवलेली होती. अर्थात, ती त्याची स्वतःचीच होती. डोळ्याची पापणी लवण्याच्या आत त्याने त्या मूर्तीच्या उजव्या हाताचा अंगठा छाटला आणि तो द्रोणाचार्यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. त्या कृत्याने द्रोणाचार्य पुरते स्तंभित झाले. पण काही क्षणात स्वतःला सावरत ते म्हणाले, “अरे एकलव्या, हे काय? मी तर तुला तुझा खरा अंगठा मागितला आणि तू मला हा मातीचा अंगठा अर्पण करतो आहेस, असे का बरे?”. त्यावर नम्रपणे पण तितक्याच ठामपणे तो उत्तरला, “गुरुजी, वास्तविक पाहता, प्रत्यक्ष आपण नव्हे तर आपल्या या मातीच्या प्रतिकृतीने मला माझ्या विद्यार्जनात सदैव मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे माझा हा मातीचा अंगठा मी मोठ्या मनोभावे आपणास अर्पण करीत आहे. त्याचा आपण उदार अंत:करणाने स्वीकार करावा”. यावर द्रोणाचार्य अक्षरशः अवाक् झाले आणि चित् -भ्रम होऊन तिथून माघारी परतले. त्यांच्या हातात तो एकलव्याचा मातीचा अंगठा तसाच होता. पण आश्चर्य म्हणजे त्यातून संततधार रक्त सांडत होते. ते दृश्य पाहून साक्षात सूर्याचे डोळे भरून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली.

एकलव्याने बनविलेली गुरु द्रोणाचार्यांची ती मातीची प्रतिकृती बघताबघता विरघळून गेली. पण महदाश्चर्य म्हणजे द्रोणाचार्यांच्या हातातील तो मातीचा अंगठा मात्र अजूनही जसाच्या तसाच आहे!

तात्पर्य: ज्याचे त्याचे जे ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com