esakal | लग्नाची गोष्ट : ‘स्वर’संसाराचे ‘प्रियारंग’!
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Barve and Sarang Kulkarni

लग्नाची गोष्ट : ‘स्वर’संसाराचे ‘प्रियारंग’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगीत क्षेत्रातील एक लोकप्रिय तरुण जोडी म्हणजे प्रियांका बर्वे आणि सारंग कुलकर्णी. प्रियांका आघाडीची गायिका, तर सारंग लोकप्रिय सरोद वादक. प्रियांका आणि सारंग या दोघांनाही त्यांच्या घरातूनच संगीताचा वारसा लाभला आहे. प्रियांकाच्या आजी मालती पांडे या प्रख्यात गायिका, वडील राजीव बर्वे गायक-संगीतकार व आई संगीता बर्वे कवयित्री, तर सारंगचे वडील पं. राजन कुलकर्णी ख्यातनाम सरोद वादक. दोघांच्याही घरीच संगीत असल्यानं एका क्षणी त्यांनी ठरवलं, की आपण संगीतातच करिअर करायचं. संगीताबद्दल असलेल्या याच ओढीनं त्यांची भेट झाली. प्रियांका पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती, तर सारंग बीएमसीसीमध्ये शिक्षण घेत होता. विविध स्पर्धा आणि कला क्षेत्रातील काही मित्रांमुळं त्यांची ओळख झाली. २००७मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात त्यांची पहिली भेट झाली. पुढं ही ओळख वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सारंगला प्रियांका पाहता क्षणीच ती आवडली होती. आता त्यांच्या लग्नाला सहा वर्षं झाली आहेत.

प्रियांका आणि सारंग या दोघांचे स्वभाव अगदी विरुद्ध आहेत. प्रियांकानं सांगितलं, ‘‘सारंग अतिशय शांत, समंजस, समजूतदार, मितभाषी आहे, पण तितकाच तो खोडकरही आहे. मितभाषी स्वभाव असल्यानं तो पटकन व्यक्त होत नाही. कोणत्याही गोष्टीवर रिअॅक्ट करताना तो आधी संपूर्ण विचार करतो. जवळजवळ गेली १४ वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतो, त्यामुळं त्याचे हे गुण काही अंशी माझ्यात आले आहेत. तो नेहमी स्वतःचा विचार करण्याआधी दुसऱ्यांचा विचार करतो. त्याला शक्य होईल तितकी मदत सगळ्यांना करतो. कामाच्या बाबतीतही तो खूप पॅशनेट आहे. अत्यंत मन लावून आणि मेहनत घेऊन तो त्याचं काम करतो. मलाही त्यानं आतापर्यंत वेळोवेळी सपोर्ट केला आहे.’’

सारंग प्रियांकाच्या स्वभावाबद्दल सांगताना म्हणाला, ‘‘प्रियांका अतिशय बिनधास्त आणि चुलबुली मुलगी आहे. मुळात ती जशी आहे तशी पहिल्याच भेटीत ती समोरच्याला सामोरी जाते. तिच्या मनात एक आणि बोलण्यात दुसरं, असं कधीही नसतं. तिच्यातला हा खरेपणा मला खूप आवडतो. ती खूप गप्पिष्ट आहे. तिचा स्वभाव मनमिळाऊ आहे. ती नेहमी हसतमुख आणि सकारात्मक असते. आमच्यात बऱ्याच वेळा संगीताची देवाणघेवाण होत असते. एखादी नवीन चाल ऐकली, गाणं ऐकलं की लगेच आम्ही ते एकमेकांना सांगतो. अशाप्रकारे आम्ही ऐकमेकांना उत्तमरीत्या कॉम्प्लिमेंट करतो, असं मला वाटतं.’’

सारंग आणि प्रियांका यांनी एकत्र मिळून बरीच कामं केली आहेत आणि करतही आहेत. त्या दोघांच्या ‘प्रियारंग’ या यू-ट्यूब प्रोजेक्टला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामार्फत ते वेगवेगळी भावपूर्ण गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. ही त्यांची गाणी भरपूर लोकप्रिय होत आहेत. या प्रोजेक्टमधील ‘बन ठन नार’ हे प्रियांकानं गायलेलं गाणं सारंगला विशेष आवडतं. बहुप्रतिक्षित ‘मी वसंतराव’ आणि ‘कारखानीसांची वारी’ या मराठी चित्रपटांमध्ये आणि एका हिंदी चित्रपटामध्ये आपल्याला सारंगचं सरोद वादन ऐकायला मिळणार आहे. तर भविष्यात सरोद वाद्याचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना धडे देऊन या वाद्याचा आणखीन प्रसार करण्याचाही सारंगचा मानस आहे. प्रियांका आणि सारंग यांच्या घरी गेल्याच वर्षी चिमुकल्याचं आगमन झालं. संगीत क्षेत्रात काम करत असल्यानं कशाचीही वेळ निश्चित नसते, पण त्यांचा मुलगा युवानच्या येण्यानं प्रियांकाचा एक ठराविक दिनक्रम लागला.

आयुष्यात एक स्थिरता आली असं प्रियांका म्हणाली. तर यात तिला सारंगचीही पावलोपावली साथ लाभत आहे. ‘‘वडील या नात्याबरोबर ज्या ज्या गोष्टी येतात त्या सारंग मनापासून करतो. वडील म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तो उत्तम पार पडतो. त्याच्या बिझी शेड्युलमधून तो आमच्यासाठी आवर्जून वेळ काढतो,’’ असं प्रियांकानं सांगितलं. तर ‘‘प्रियांका ही खूप चांगली आई आहे. युवानचा दिनक्रम तिनं व्यवस्थित लावला आहे, त्यामुळं तो नेहमी फ्रेश आणि उत्साही असतो. तिला सतत त्याच्यासाठी काहीतरी नवीन करायचं असतं. काम आणि घर हे ती छान सांभाळते आहे,’’ असं सारंगनं सांगितलं. प्रियांका आणि सारंग हे ‘प्रियारंग’ या नावाप्रमाणंच एकरूप होत एक ‘मेड फॉर इच अदर कपल’ बनलं आहेत.

- प्रियांका बर्वे, सारंग कुलकर्णी

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image