कडवट गुलाबजाम

कडवट गुलाबजाम

लग्नसोहळा म्हणजे आनंदाचा क्षण. त्यात मित्राचं लग्न म्हणजे धिंगाणाच की. दीड तोळ्याची चेन, अडीच हजारांचा गॉगल. साडेचार हजारांची शेरवानी, अठराशे रुपयांची मोजडी, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या असा रुबाब करून मी लग्नात दाखल झालो. काहीजणांच्या अंगावर माझ्यापेक्षा महागडे कपडे होते, म्हणून मला थोडं वाईट वाटलं. पण, मी ज्यांच्या अंगावर सोनं नसलेल्या लोकांकडं पाहून समाधान मानत होतो. 

मित्राच्या सासऱ्यांनी लग्नात पैशांचा चुराडाच केला होता. म्हणजे जेवणासाठी कमीत कमी पन्नास पदार्थ असावेत. भूक लागली म्हणून मी सरळ ताट घेऊन टेबलाजवळ गेलो. घरी खात नाही, असे पदार्थ ताटात भरू लागलो. इतक्‍यात गुलाबजामचं पातेलं दिसलं आणि तिथं जाऊन थांबलो. गुलाबजाम वाढायला एक सावळी पोरगी होती. मी तिच्यासमोर थांबलो तर तिनं माझ्या ताटातल्या वाटीत दोन गुलाबजाम ठेवले आणि समोर पाहू लागली. तिच्याशेजारी एक वयस्कर बाई होत्या. मला दोन गुलाबजाम दिल्यावर त्यांचा असा अंदाज, की मी आता निघून जाईल. पण मी त्यांच्यासमोरच दोन गुलाबजाम संपवले आणि पुन्हा वाटी समोर केली. पण त्या पोरीचं माझ्याकडं लक्षच नव्हतं. त्या दोघीही पाहुण्यारावळ्यातल्या घोळक्‍याकडं पाहत होत्या. पोरगी म्हणत होती, 

‘अगं, ती लाल घागऱ्यावाली नाय, तिच्यापलीकडं बघ ना ती मोरपंखी घागऱ्यावाली दिसती ना, ती म्हणतीय मी.’

पण मला त्यांच्या चर्चेत रस नव्हता. मी त्यात व्यत्यय आणत अजून गुलाबजाम मागितले, तर त्या पोरीनं पुन्हा दोनच गुलाबजाम दिले आणि शेजारच्या वयस्कर बाईसोबत बोलू लागली, 

‘मी तर मगाशी दाखवला तोच घागरा किती छान होता. गुलाबी रंगाचा.’

तशी ती वयस्कर बाई बोलू लागली, 

‘तुला काय बाई सोन्याच्या शिलाईचाबी आवडेल. पण आपल्याला परवडणारहे का?’

तसं मी त्यांच्या चर्चेत शिरलो आणि म्हणालो,

‘तुमची घागऱ्यांची चर्चा झाली असेल, तर मला एकदम चार गुलाबजाम देता का? तू फक्त दोनच गुलाबजाम देतीय ना, म्हणून मला इथं थांबून तुमचं बोलणं ऐकावं लागतयं.’

तशी ती वयस्कर बाई भेदरली. घाबरल्या चेहऱ्यावर बळजबरी स्मित आणत म्हणाली,

‘माफ करा साहेब, माझी लेक जरा अडाणीहे. परवादिवशी तिचंबी लग्नहेना, म्हणून लोकांच कापडं पाहतीये. घ्या गुलाबजाम.’

तिच्या या वाक्‍यावर मात्र मला तोंडातला गुलाबजाम कडवटच वाटू लागला. काळजात सुई टोचल्यासारखंच झालं. क्षणात त्या मायलेकींची कीव आली. म्हणालो,

‘परवा दिवशी लग्नहे आणि तुम्ही आज इथं काम करताय?’

तशी ती बाई म्हणाली,

‘हा मंग, आम्हा दोघींना सहाशे रुपये मिळत्यान ना आज. तेवढाच हातभार.’

आता मात्र तोंडातला गुलाबजाम गरगर फिरू लागला. गळ्यातली दीड तोळ्याची चेन आपला गळा आवळतीये की काय असंच वाटू लागलं. लाखो रुपयांचा चुराडा, लग्नातली आतषबाजी, नवरीच्या अंगावरचं सोनं आणि महागडा घागरा पाहून त्या पोरीला काय वाटत असेल हा विचार मनात आला आणि तोंडच कडवट झालं. पण, कुणाला त्या पोरीच्या आणि त्या पोरीच्या आईच्या मनाचं काहीच देणंघेणं नव्हतं. सगळेजण माझ्यासारखे गुलाबजामच्या वाट्यावर वाट्या संपवतच होते. मीही काही समाजसेवा वगेरै करण्याच्या फंदात पडलो नाही.

दोन महिने झाले त्या गोष्टीला. पण, आजही गुलाबजाम समोर आली, की त्या मायलेकी डोळ्यासमोर येतात. तोंड कडवट करतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com