गुंठामंत्री येती घरा... 

गुंठामंत्री येती घरा... 

‘पप्पा तुमच्या फ्रेंडनं बांगड्या का घातल्यात?’ 
लेकानं असा प्रश्‍न विचारला आणि मला घामच फुटला. काय बोलावं तेच कळेना. हातातला ग्लास थरथर कापायला लागला. तसाच थरथरत्या हातानं घरी आलेल्या गुंठामंत्र्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला अन् मीही पटकन दुसरा ग्लास तोंडाला लावला. दोन घोट घशात ढकलून मोठा श्‍वास घेतला अन् लेकाला बाहेर खेळायला पाठवलं. 

घरमालकाकडं येणाऱ्या एका गुंठांमंत्र्याची अशीच ओळख झालेली. रोज येता जाता तो हात करत होता. म्हणून मीही हात करू लागलो. चौकात भेटला की ओळख द्यायचा. चहा प्या म्हणायचा. मोठ्या लोकांची ओळख असलेली बरी, म्हणून मग मीही कधी-मधी त्याच्यासोबत चहा घ्यायचो. त्याच्यासोबत चहा पेताना उगीचच आपणही मोठ्या बापाचे आहोत, असं वाटायचं. त्याच्या गळ्यात वीस पंचवीस तोळ्याचा गोफ, दोन्ही हातातल्या सातआठ बोटात पाच पाच तोळ्याच्या अंगठ्या. मनगटावर चार-पाच इंचाचं ब्रेसलेट. एवढंच कमी का काय, त्याच्या गॉगलची फ्रेमही सोन्याची. त्याला फिरायला फॉर्च्युनर, त्याचा बूट बॅंडेड, त्याचे कपडे ब्रॅंडेड. सगळं कसं एकदम रुबाबात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वडिलांनी घाम गाळून कमावलेल्या दहा एकरातली एक एकर विकून त्यानं हा रुबाब अंगावर चढवला होता. परंतु, ते काही का असेना, आत्ताच्या घडीला भाऊचा नाद कुणीच करायचा नव्हता. भाऊ चौकात आला की किमान वीस जणांना चहा पाजत होता. त्याच्यासोबत नेहमी पाच सहा टाळकी असतात. रात्रीच्या टायमाला जो भाऊसोबत फिरेल त्याला चिकन बिर्याणी आणि दारू ठरलेली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण कष्टानं कमावलेला पैसा पोरगा पाण्यासारखा उडवतोय याची बापाला तळतळ वाटत असेल, मात्र भाऊ आमच्या परिसरातला वाघ झाला होता. नेमकं सकाळी सकाळी मी पाणी भरत असताना हा वाघ घरमालकाच्या ऑफिसमधी आला अन् मला दिसला. नमस्कार चमत्कार झाला. मी म्हणालो, ‘भाऊ, या की एकदा गरिबाच्या घरी चहाला.’ भाऊ म्हणाला, ‘शून्य मिंटात हितलं काम उराकतो अन्‌ तुमच्याकडं येतो.’ मी पटकन पाण्याचे दोन हांडे डोक्‍यावर घेतले अन्‌ घरात गेलो. पटापट घर झाडलं. बायकोला चहा ठेवायला लावला. तोच भाऊ दारात हजर. 

लेक म्हणाला, ‘पप्पा हे तुमचे फ्रेंड आहेत का?’ मी होकार दिला. भाऊ खुर्चीवर बसले. लेकाला भाऊंच्या अवताराचं मोठं नवलं वाटलं. इथं आपली मम्मी गळ्यात मंगळसूत्र घालत नाही अन्‌ भारदस्त मिशीवाल्या धिप्पाड काळ्या गडीमाणसानं गळ्यात काय घातलंय हे लेकाला समजत नव्हतं. नेमकी लेकाची नजर भाऊंच्या हातावर गेली अन् लेक म्हणाला, ‘पप्पा तुमच्या फ्रेंडनं बांगड्या का घातल्यात?’ ठसकाच लागला. काय बोलावं कळाना. भाऊंसोबत आलेल्या चार दोन टाळक्‍यातली दोघ तिघं गुपचूप हसली. मलाही हासू आलेलं, पण भाऊंसमोर कसं हसणार? मी लेकाला बाहेर खेळायला पाठवलं. तर लेकं दोन चार मित्रमैत्रिणी घेऊन आला अन् भाऊंच्या हातातल्या बांगड्या दाखवू लागला. चिलीपिली दात काढून हसत होती. तसा भाऊंनी खिशातला आयफोन कानाला लावला अन् ‘आलो दादा आलो, शून्य मिंटात चौकात आलो. तिथंच थांबा,’ असं म्हणत जागेवर उभे राहिले. ‘जाऊ का शेठ? आमदारसाहेब आल्यात चौकात,’ असं म्हणत भाऊंनी नमस्कार केला अन्‌ चहा न पेता कल्टी मारली. 

मी लेकाकडं पाहत होतो. लेक हसत होता. बायको हसत होती. लेकाचे मित्रमैत्रिणीही हसत होते. मी मात्र सुन्न झालेलो. भाऊ आता चौकातही ओळख देणार नाही याची खंत मनात सलत होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com