श्रीमंताना लायकी दाखवणारी माणसं ! 

Bunglow
Bunglow

एक बागायतदार जोडीदार आहे. महागड्या गाड्या, मोठा बंगला, सोनं-नाणं मजबूत. त्याच्या घरी गप्पा मारत बसलेलो. घरात नोकराचाकरांची वर्दळ होतीच. एक म्हातारा गडी त्याच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावरच्या काचा पुसत होता. काचा पुसून झाल्यावर तो पायऱ्यांनी खाली आला आणि दरवाजाबाहेरच्या ओसरीवर कोपऱ्यात बसला. ‘संगीता, तात्यांना चहा दे गं,’ जोडीदारानी बायकोला असा आवाज दिला तसा त्याच्या बायकोनं जुन्या कपात चहा आणून त्या तात्यांना दिला. आमच्या हातात काचेचा उंची कप. त्या गड्याच्या हातात कानतुटका जुनाट कप. तरीही वाफाळत्या चहाचा तो निवांत आनंद घेत होता. डोळे झाकून चहा पेत होता. प्रत्येक घोटातलं सुख तो गळ्याखाली रिचवत होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गोष्टीला आता महिना झाला असेल. काल मित्र त्याची महागडी गाडी घेऊन घराखाली आला आणि म्हणाला, ‘‘चल कोंबडा खायला जायचयं.’’ मला वाटलं कुठल्यातरी हॉटेलला जायचं असेल. मी आवरून सावरुन गाडीत येऊन बसलो. तर तो म्हणाला, ‘आमच्या घरी एक गडीहे. त्याच्या नातीच्या जावळाचा कार्यक्रमहे. त्यांच्यात कोंबडा कापत्यात. लय आग्रह करत होता जेवायला या. मग म्हणलं जावा तुला घेऊन.’ मी होकारार्थी मान डुलवली. आम्ही त्या गड्याच्या घरी पोचलो. पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. आम्हाला बघताच त्यानं दोन्ही हात जोडत नमस्कार केला. हे तेच तात्या होते जे दारात बसून जुन्या कपात चहा पेत होते. आज इस्त्री केलेले कपडे घालून प्रसन्न हसत होते. 

आम्ही दोघंही पत्र्याच्या शेडमध्ये गेलो. आम्हाला बसायला नवी कोरी चटई टाकलेली. सारं घर जुनाट वस्तूंनी भरलेलं. त्यात ही नवीकोरी चटई म्हणजे म्हाताऱ्या बाईनं टिकली लावल्यासारखं वाटत होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो, तोच समोर स्टीलची चकचकीत ताटं आली. आमच्या दोघांच्या समोर नवीकोरी ताटं ठेवली होती. ताटांच्या मधोमध गोलगोल लाल स्टिकरही होतं. त्यावरुन लगेच समजलं की, या तात्यानं आमच्यासाठी नवीकोरी ताटं विकत आणली होती. काळजावरच काटा आला. रोज जुनाट कपामध्ये चहा पेणारा, मालकाची जुनी कपडे वापरणारा, घरातलं शिळं-पाकं जेवणासाठी नेणारा तात्या आज आम्ही येणार म्हणून नवीकोरी ताटं घेऊन आला होता. 

नावाला माझा मित्र तात्याचा मालक होता. बागायतदार होता, सोन्या-नाण्यानं मढलेला होता. पण, खऱ्या अर्थानं श्रीमंत तर तात्या होता. अवघ्या पाच मिनिटांत त्यानं आम्हाला आमची लायकी दाखवली होती....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com