कुणाच्या बापाला भेत नाय, पण... 

नितीन थोरात 
Wednesday, 21 October 2020

जो माणूस लोकांकडून पैशे वसूल करतो, ज्याच्यासमोर लोक हात जोडतात. तोच माणूस मला पैसे देत होता, माझ्यासमोर हात जोडत होता. कुणाच्या बापाला न घाबरणाऱ्या त्या गुंडाला त्याच्या आईनं जाग्यावर आणलं होता.

‘हाफ मर्डरची केसहे त्याच्यावर. आणि तू त्याला पैशे मागणार?’ 

‘त्याला काय झालं तवा? फुकटचे पैशे कुठं मागतोय तवा मी वाढदिवसाला वाटायला माझ्याकडून त्यानी दोनशे पुस्तकं नेल्यात, त्याचे पैशे मागणारहे.’ 

‘अरे पण तो गुन्हेगारहे? तुला वाटतं तो पैशे देईल? कुणाच्या बापाला नाय भेत असली माणसं.’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मित्रासोबत सातारा रोडवरच्या टोलनाक्‍यावर निघालो होतो. मध्यंतरी एका युवा नेत्यानं माझ्याकडून दोनशे पुस्तकं नेलेली. वाढदिवसानिमित्त त्यानं पुस्तकं वाटली. त्याचे पैसे दिले नव्हते. त्याला फोन केला तर त्यानं टोलनाक्‍यावर बोलवलं. मित्राला घेऊन त्याच्याकडं निघालेलो. मित्राला नेत्याचं नावं सांगितलं तर त्याचं अवसानच गेलं. कारण त्यानं दोन-तीन हार्फ मर्डर केले होते. पेपरला बातम्या आल्या होत्या. त्याच्या एरियात तो भाई म्हणून प्रसिद्ध होता. मीही पैसे सोडूनच दिले होते. पण, पैशांची गरज वाटली म्हणून फोन केला. तर युवा नेत्यानं हायवेला बोलवलं. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मित्र मला समजावत होता. ‘तो कुणाच्या बापाला भेत नाही, कुणाच्या बापाला भेत नाही,’ असा जप माझ्या कानात करत होता. जसजसा टोलनाक्‍यावर पोचलो तसंतसं माझंही अवसान जाऊ लागलं होतं. टोलनाक्‍यावर पोचलो आणि युवा नेत्याला फोन लावला. ‘ओ रायटर, थांबा तिथल्या टपरीवर. आलोच पाच मिंटात,’ असं म्हणत त्यानं फोन ठेवला. टपरीभोवती काळ्या काचेच्या सात आठ फोर व्हिलर उभ्या होत्या. दाढी आणि गॉगल घातलेली गॅंग होती. सगळे गुंडच वाटत होते. इतक्‍यात युवा नेते आले, सगळेजण त्यांना सलाम ठोकू लागले. मीही नमस्कार करत पुढं गेलो. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नेते म्हणाले, ‘ओ रायटर बोला की. लय दिवसांनी आठवण काढली.’ तसं मी बळच हसत म्हणालो, ‘अहो, नाय मागच्या वेळी पुस्तकं दिली होती ती घरच्यांनी वाचली का नाय विचारायचं होतं.’ तसा युवा नेता कौतुकानी म्हणालो, ‘आवं रायटर, तुमचं पुस्तक आमच्या आईला लय आवडलं बरका. म्हणत होती, लय भारी पुस्तकहे. तिला सांगितलं मी, आपल्या वळखीच्या रायटरनं लिहिलय.’ तसं मी म्हणालो, ‘व्हय का? लावाकी मग आईला फोन. आमालाबी कौतुक ऐकुद्या.’ ‘हा हा लावतो की,’ असं म्हणत त्यांनी आईला फोन लावला आणि माझ्याकडं दिला. त्याची आई भरभरुन कौतुक करत होती. तसं मी म्हणालो, ‘हा काकू आवं त्याच पुस्तकाचे पैशे द्यायचे होते दुकानदाराला, त्यासाठीच नेत्यांकडं आलो होतो.’ तशी त्याची आई म्हणाली, ‘त्यानी अजून तुमचे पैशे नाय दिले व्हय? द्या त्याच्याकडं फोन.’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तीन-चार मिनिटं आई युवा नेत्याचा बोलून बोलून मर्डर करत होती आणि मी शांतपणे बाजूला थांबलो होतो. 

नेत्यांनी फोन ठेवला आणि खिशातून नोटांचा बंडल काढून माझ्या हातात दिला. ‘सॉरी बरका रायटर. गडबडीत पैशे द्यायचचं लक्षात नव्हतं राहिलं.’ असं म्हणत तो हात जोडत होता आणि मी त्याचा हात पकडत ‘जाऊद्या हो, जाऊद्या नेते,’ असं म्हणत होतो. सगळे गुंड लांबून माझ्याकडं अवाक होऊन पाहत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जो माणूस लोकांकडून पैशे वसूल करतो, ज्याच्यासमोर लोक हात जोडतात. तोच माणूस मला पैसे देत होता, माझ्यासमोर हात जोडत होता. कुणाच्या बापाला न घाबरणाऱ्या त्या गुंडाला त्याच्या आईनं जाग्यावर आणलं होता. अवाक झालेला मित्र गाडीवर बसल्या बसल्या माझी पाठ थोपटत होता आणि मी मनातल्या मनात आई नावाच्या शब्दाचे आभार मानत होतो. स्वत:ला त्याच्यापेक्षा मोठा गुंड समजत होतो.... 

पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin thorat article about story of the criminal

Tags
टॉपिकस
Topic Tags: