CNG Gas
CNG GasSakal

झूम : परवडणारा, पर्यावरणस्नेही CNG

सध्या पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पूर्वीच्या तुलनेत आता अधिक कात्री बसत आहे.

सध्या पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पूर्वीच्या तुलनेत आता अधिक कात्री बसत आहे. त्यात जागतिक स्तरावर वाढते प्रदूषण हा देखील कळीचा मुद्दा आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. त्यामुळे जागरूक वाहनप्रेमी, विशेषतः कारप्रेमी पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधनाची वाहने घेण्याला प्राधान्य देत आहेत. यात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय असला, तरी या वाहनांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. या वाहनांमध्ये सध्या हवे तसे पर्यायही बाजारात उपलब्ध नाहीत. परिणामी लोक परवडणाऱ्या अशा ‘सीएनजी’ (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) वाहनांना प्राधान्य देत आहेत. याची सुरुवातही दशकापूर्वीपासूनच झाली आहे.

गरज कन्वहर्जन किटची

भारतात स्वदेशी आणि जगातील प्रसिद्ध कार कंपन्या विविध सीएनजी कार बाजारात आणल्या आहेत. मारुती सुझुकीच्या ऑल्टो के-१०, सेलेरिओ, ईको, वेगनार, एस-प्रेसो, इर्टिगा, ह्युंदाईच्या सँट्रो, ग्रँड आय-१०, फोर्डची एस्पायर आदी कार सीएनजीमध्ये उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडील उपलब्ध वाहनेही सीएनजीमध्ये रुपांतरीत केली जाऊ शकतात. म्हणजे ठिणगीने प्रज्वलित होणारी सर्व इंजिन सीएनजीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. यात इंधन रूपांतर प्रक्रियेसाठी ‘कन्व्हर्जन किट’ आवश्यक असते. या किटमध्ये कारच्या बूटमध्ये बसविण्यासाठी एक सिलिंडर आणि वायूचा प्रवाह इंजिनापर्यंत पोहोचू देण्यासाठी अन्य उपकरणे असतात. यासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. जेव्हा कारमधील सीएनजी संपतो तेव्हा एका स्वीचद्वारे ही वाहने पुन्हा पूर्व इंधनावर चालवता येतात.

...अशी आहे सुरक्षितता

सीएनजी हा हवेपेक्षा हलका आहे. गळती झाल्यास तो वातावरणात तत्काळ विरून जातो. पेट्रोलच्या ३६० अंशापेक्षा त्याचे ५४० अंश सेंटिग्रेडचे उच्च ऑटो-इग्निशन तापमान त्याला अधिक सुरक्षित इंधन बनविते. सीएनजीचा सिलिंडर एका खास स्टिलपासून बनवलेला असतो. त्यांची बांधणी जोडविरहित असते.त्यामुळे एखाद्या छोट्या कारमध्ये तो सिलिंडर सहजपणे ठेवता येतो. ५० लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या एका रिकाम्या सीएनजी सिलिंडरचे वजन सुमारे ४८ किलो असते. ते सुमारे ९ किलो सीएनजी वाहून नेऊ शकते.

सीएनजी सिलिंडरची निर्मिती विशिष्ट गरजांनुसार केली असल्याने ते सुरक्षित असतात. त्यानंतर चिफ कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोझीव्हद्वारे (सीसीओइ) त्याला मंजुरी दिली जाते. सिलिंडरवर एक प्रेशर रिलीज डिव्हाईस (पीआरडी) दिलेले असते, ज्यात एक ‘फ्युजिबल प्लग’ आणि ‘बर्स्ट डिस्क’ असते जी उच्च दाब आणि तापमानाच्या प्रसंगीच फुटते.

पैशांची बचत

पेट्रोल-डिझेलची दररोज होणारी भाववाढ पाहता ‘सीएनजी’ आताच्या दृष्टीने सर्वसामान्यांना परवडणारा इंधन प्रकार ठरतो. सीएनजी कार चालवणाऱ्यांची प्रतिकिलोमीटर पैशांची बचत मोठ्या प्रमाणावर होते. कारण ते मायलेज चांगले देते. सीएनजी हा स्वस्त असल्याने जेवढा त्याचा जास्त वापर होतो, तेवढा प्रवास खर्चात फायदेशीर ठरतो.

प्रदूषण कमी होते

केंद्र सरकारकडून देशात प्रदूषण विरहित वाहनांचे धोरण राबवले जात आहे. इंधनात सीएनजी हा स्वस्त, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही पर्याय आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या कारमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते, परंतु सीएनजीच्या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही. सीएनजीमधून कार्बन डाइऑक्साईड आणि जल वाष्प निर्माण होते. ज्यामुळे सीएनजी हानिकारक कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडचे हवेतील उत्सर्जन कमी करते.

अधिक प्रमाणात उपलब्ध

सीएनजी पंप ठराविक शहरांमध्येच उपलब्ध होते. त्यामुळे कारप्रेमी ही वाहने घेताना कचरत होती. परंतु, देशात, आपल्या राज्यात बहुतांश ठिकाणी सीएनजी पंप आता उभारले जात आहेत. भारतात सध्याच्या मागणीनुसार गॅसचा साठा हा पुढील २७ वर्षे पुरेल एवढा आहे. मात्र, कच्च्या तेलांचा हाच साठा ५.५ वर्ष पुरेल एवढाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com