झूम : आता पर्याय इलेक्ट्रिक वाहनांचाच!

प्रणीत पवार
Thursday, 18 February 2021

इंधनाचे दिवसेंदिवस वाढत जाणारे दर, प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेऊन आगामी काळात भारतीयांना इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) खरेदीशिवाय पर्याय नाही. किंबहुना पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे.

इंधनाचे दिवसेंदिवस वाढत जाणारे दर, प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेऊन आगामी काळात भारतीयांना इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) खरेदीशिवाय पर्याय नाही. किंबहुना पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. 2030 पर्यंत देशातील रस्त्यांवर पूर्णत: इलेक्ट्रिक वाहने उतरवण्याची योजना आहे. परंतु सद्यःस्थिती पाहता या वाहनांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

फायदे इलेक्ट्रिक वाहनांचे 
देखभालीचा कमी खर्च

पेट्रोल किंवा डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा दैनंदिन व दुरुस्तीचा खर्च खूप कमी म्हणजे सामान्य कारच्या तुलनेत सुमारे ५०% कमी असतो. इलेक्ट्रिक वाहने इंटर्नल कंबस्शन इंजिन (आयसीई) वाहनांच्या तुलनेत अधिक विश्वसनीय आहेत. इंधनावरील वाहनांचे काही मेकॅनिकल पार्ट्स नादुरुस्त होऊ शकतात, मात्र  इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही समस्या येत नाही.

शून्य उत्सर्जन
जगभरातील शहरे प्रदूषणाशी लढत असताना भारतही त्याला अपवाद नाही. इलेक्ट्रिक कार शून्य उत्सर्जन करतात, यामुळे कार्बन डायऑक्साईड तसेच इतर धोकादायक ग्रीनहाऊस वायू कमी होण्यास मदत होईल.

बदलता येणाऱ्या बॅटरीचे तंत्रज्ञान
इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी पूर्णत: चार्ज होण्यास खूप अवधी लागतो. त्यामुळे आपल्याला चार्जिंग स्टेशनवर चार्ज केलेल्या बॅटरीच्या बदल्यात डिस्चार्ज बॅटरी बदलून घेता येते. हे तंत्रज्ञान अद्याप विकसित होत असून, या तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर अवलंबन होईल, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांना कार खरेदीदारांकडून प्राधान्य दिले जाईल.

नव्या इलेक्ट्रिक कार
एमजी झेडएस ईव्ही 2021

भारतातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही म्हणून ''झेडएस ईव्ही'' ओळखली जाते. हिच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये 44.5 kWh ''अल्ट्रा हाय डेन्सिटी बॅटरी'' देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यावर 419 किमी धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तासांचा अवधी लागतो. झेडएस ईव्हीचे इंजिन 143 पीएस पॉवरसह 350 एनएम टॉर्क जनरेट करते. ऑटोमेटिक ट्रान्स्मिशनसह ही कार 0 ते 100  प्रतितासाचा वेग 8.5 सेकंदात घेते. या कारमध्ये पॅनोरमिक सनरुफ, 17 इंच डायमंडकट अॅलॉय व्हिल्स आणि 2.5 पीएम फिल्टर आदींचा समावेश आहे. कारमध्ये 448  मिलीमीटर बूटस्पेस देण्यात आला आहे. ही कार एक्साईट (किंमत 20.99 लाख) व एक्सक्लुझिव्ह (24.18 लाख) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

टाटा नेक्सॉन ईव्ही
टाटा कंपनीने पूर्णत: भारतीय बनावटीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील पहिली इलेक्ट्रिक कार ‘टाटा नेक्सॉन ईव्ही’ गेल्यावर्षी भारतीय बाजारात आणली. यामध्ये नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. नेक्सॉन ईव्हीमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार पूर्ण चार्ज केल्यानंतर 300 किलोमीटर अंतर पार करू शकेल. फास्ट चार्जरद्वारे या कारची बॅटरी एका तासात 80 टक्के चार्ज होईल, तर स्टँडर्ड एसी चार्जरद्वारे बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी जवळपास 8 तासांचा वेळ लागेल. यामधील इलेक्ट्रिक मोटर 129 पीएसची ऊर्जा आणि 245 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग 9.9 सेकंदात घेते. नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये नवीन स्लीक हेडलॅम्प, नवीन बंपर आणि रिवाइज्ड ग्रीलचा समावेश आहे. नेक्सॉन ईव्हीमध्ये तीन व्हेरिएंट असून, एक्सएम (XM) या बेस व्हेरिएंटची किंमत 13.99 लाख, एक्सझेड प्लस (XZ+)15.25 लाख आणि एक्सझेड प्लस लक्स (XZ+ LUX) ची किंमत 16.25 लाख ठेवण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranit Pawar Writes about Electric Vehicle