भवितव्य सोशल मीडियाचं...

socialmedia
socialmedia

सोशल मीडियासंबंधी सध्या चर्चेत असलेली एक बातमी म्हणजे व्हॉट्सॲपची बदललेली प्रायव्हसी पॉलिसी.  व्हॉट्सॲप आपला डेटा फेसबुकबरोबर शेअर करणार आहे. ही प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून सुरू होईल व तुमचा सध्यापेक्षा खूप अधिक डेटा शेअर होईल. हे तुम्हाला मान्य असेल, तरच तुम्हाला  व्हॉट्सॲप वापरता येईल, अन्यथा नाही. खरंतर आपला डेटा त्यांनी त्यांच्या पेरंट कंपनी किंवा इतर भागीदारांशी शेअर करायचा असल्यास आपली परवानगी घ्यायला हवी. ती असल्यासच डेटा शेअर करायला हवा, नसेल तर करू नये हा शिष्टाचार  व्हॉट्सॲप पाळत नाहीये, ही मुख्य त्रासदायक गोष्ट आहे.  

युरोपियन युनियनमध्ये, जिथं ग्राहकांच्या खासगी माहितीच्या शेअर करण्याविषयीचे कायदे अत्यंत कडक आहेत, तिथं  व्हॉट्सॲप हा प्रकार करणार नाही. ग्राहकांची परवानगी असेल, तरच त्यांचा व्यक्तिगत डेटा शेअर करणार आहे. भारतासारख्या देशांमध्ये असे कायदे नसल्यानं ग्राहकांच्या डेटाचं शेअरिंग होणार आहे. भारतात साधारण तीन वर्षांपूर्वी सरकारनं Personal Data Protection Bill आणलं आहे, मात्र त्याचं अद्याप कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाही. आपल्या देशात खासगी डेटाचं संरक्षण करणारा कायदा होईपर्यंत फेसबुक-व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया कंपन्या आपल्या डेटाबाबत काय वाट्टेल तशी मनमानी करू  शकणार आहेत. 

आपल्यापुढील पर्याय
आपली कमीत कमी व्यक्तिगत माहिती ऑनलाइन टाकणं. 
कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियाचा अजिबात वापर न करणं. 

आपल्या देशात Personal Data Protection Act होत नाही आणि त्याची कडक अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत वरील दोनच पर्याय आपल्यापुढं आहेत. थोडक्यात, ‘काय होईल ते होईल, बघू पुढं,’ असं म्हणून सोशल मीडियाच्या या झंझावातात स्वतःला मुक्त सोडून देणं किंवा, ‘नको रे बाबा, मी आपला सेफ राहातो,’ म्हणून सर्व सोशल मीडियापासून लांब राहाणं हे दोनच पर्याय आपल्यापुढं आहेत.

भविष्यात काय?
या प्रसंगामधून दोन गोष्टी घडतील असं दिसतं. सोशल मीडिया चालवणाऱ्या कंपन्यांवर ग्राहकांचा डेटा वापरण्यासंबंधीचे निर्बंध आणि कायदे अनेक देशांमध्ये तयार होतील. या कायद्यांमुळं सोशल मीडियाचं स्वरूप बदलत जाईल. त्याचबरोबर आपला डेटा कोणी आपल्या परवानगीशिवाय वापरू नये यासाठी खासगी कंपन्यांनी चालवलेल्या सोशल मीडियाऐवजी कुणाच्याच मालकीचा नसलेला ‘मुक्तस्रोत’ सोशल मीडिया अस्तित्वात येऊ शकेल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मॅस्टॉडॉन (Mastodon) हा असा एक मुक्तस्रोत सोशल मीडियाचा प्रयोग अलीकडेच सुरू झाला आहे. जगभरातील कोणतीही व्यक्ती अथवा समूह आपला स्वतःचा मॅस्टॉडॉन सर्व्हर सुरू करून इतर सर्व्हर्सशी जोडला जाऊ शकतो. हे सर्व्हर्स आणि त्यांच्या सदस्यांचं जाळं कोणाही एकाच्या मालकीचं राहात नाही आणि हे विखुरलेलं असल्यानं त्यावर कोणतंही सरकार बंदीही घालू शकत नाही. सध्याच्या सोशल मीडिया चालवणाऱ्या कंपन्यांची अरेरावी आणि ते करत असलेला आपल्या डेटाचा गैरवापर यावर जगभर विखुरलेलं, पण तरीही एकमेकांशी जोडलं गेलेलं आणि कोणा एकाच्या मालकीचं नसलेलं ‘सोशल मीडिया’ हा दूरगामी उपाय आणि हे सोशल  मीडियाचं भवितव्य असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com