गप्पा ‘पोष्टी’ : बॅड पॅच

प्रसाद शिरगावकर
Thursday, 18 February 2021

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. वरवर पाहता शांत सुरळीत सुरू असतं आयुष्य, पण अचानक करिअरमध्ये काहीतरी गंडतं किंवा नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं किंवा व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो किंवा पैशांची बेक्कार वाट लागते. आणि बहुधा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. वरवर पाहता शांत सुरळीत सुरू असतं आयुष्य, पण अचानक करिअरमध्ये काहीतरी गंडतं किंवा नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं किंवा व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो किंवा पैशांची बेक्कार वाट लागते. आणि बहुधा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! आयुष्यात अचानक नागमोडी वळणांचा अत्यंत अवघड घाट येतो. अचानक समोर येणाऱ्या ह्या काळाला आपण ‘बॅड पॅच’ असं नाव देऊन टाकतो. ‘बॅड पॅच’ आला, की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो. आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो, नको करून सोडतो. आपण कितीही नको म्हटलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा ‘बॅड पॅच’ येतोच. संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो अन् आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो. 

‘बॅड पॅच’चे काही विलक्षण फायदेही असतात!! यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे -

  • खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे ‘बॅड पॅच’ असतानाच कळतं. चांगल्या काळात आख्खी दुनिया सोबत असतेच, पण आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं राहतं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं राहतं हे फक्त बॅड पॅच असतानाच उमगतं!
  • आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होते. अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो, काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो हे आपलं आपल्याला समजू शकतं. आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येते!

अर्थात, बॅड पॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही. मात्र, आल्यावर त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, रिॲक्ट कसं करायचं हे आपल्या हातात असतं. आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत राहायचं आणि स्वतःचं नुकसान करत राहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!! जशी आगीतून तावून सुलाखून निघाल्यावर सोन्याला झळाळी येते, तसंच आपल्या आयुष्याच्या बाबतीत बॅड पॅचेसमुळं घडू शकतं, अर्थात, आपण तसं ठरवलं तर!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prasad Shirgaonkar writes about Bad Patch

Tags
टॉपिकस
Topic Tags: