गप्पा ‘पोष्टी’ : नावडता मार्च!

File-tax-Return
File-tax-Return

मार्च हा माझा सगळ्यांत जास्त नावडता महिनाआहे! तसं एकुणात आयुष्यावर प्रेम वगैरे असलेल्या लोकांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीनही ऋतू आवडतात. यातले सगळेच महिनेही आवडतात. पण या लाडक्या महिन्यांच्या यादीत मार्च मात्र माझा दोडका आहे!

शाळा सोडून पंचवीसहून जास्त वर्षं झाली असली तरी, मार्च महिना आला की उगाचच ‘परीक्षा जवळ आली आहे’ या विचारांनी अजूनही पोटात गोळा येतो! अठ्ठावीस फेब्रुवारी हा थंडीच्या महिन्यातला दिवस संपून एक मार्च सुरू झाला, की अचानक उन्हाळा आलाय असं वाटायचं. तहान तहान व्हायला लागलेली असायची, पण ‘परीक्षेत आजारी पडायचं नाहीये आपल्याला,’ असं म्हणून फ्रिजमधलं पाणी प्यायलाही बंदी असायची. याशिवाय रोजचं संध्याकाळचं बाहेर हुंदडणं बंद करून अभ्यासाला वाहून घ्यावं लागायचं या मार्च महिन्यात. अजूनही मार्च आला की हेच आठवतं अन पोटात गोळा येतो! मला तर, ज्या विषयाचा अभ्यास करून गेलो आहे तो सोडून भलत्याच विषयाचा पेपर आलाय, असं स्वप्नही मार्च महिना सुरु झाला की अजूनही पडतं!

पुढं नोकरी/धंद्याला लागल्यापासून मार्च महिन्यात टार्गेट्स आणि टॅक्स हे दोन टगे मागे लागायला लागले. काम म्हणून जे काही वर्षभरातलं ‘टार्गेट’ असतं, त्यातलं शिल्लक राहिलेलं सगळं या महिन्यात पूर्ण करून टाकायला लागतं. आणि वर्षभराच्या कमाईवरचं टॅक्सरूपी सरकारी देणंही याच महिन्यात भरून टाकायला लागतं. नोकरदारांना सर्वांत जास्त कष्ट करायला लावून सर्वांत कमी पैसे देणारा अत्यंत दुष्ट महिना आहे हा! त्यात साधारण पंधरा-वीस मार्चच्या सुमाराला माझ्यासारख्या अनेक आळशी लोकांना टॅक्स वाचवण्याची धडपड करावीशी वाटते. मग गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये काय स्लॅब होत्या, काय योजना होत्या या माहितीची जमवाजमव करणे आणि कमीत कमी टॅक्स कापला जाईल म्हणून बचत वर्षाच्या शेवटच्या दहा दिवसांत करायचा प्रयत्न करणे हे आमचं सुरू असतं! शाळा असो किंवा नोकरी/धंदा, मार्च हा एकुणातच साला तगमगीचा महिना. आधीचे अकरा महिने केलेल्या कामाची गोळाबेरीज करून त्याची बाकी आपल्या समोर मांडणारा. हा चित्रगुप्ताचा महिना असावा, याला तोंड देण्याशिवाय गत्यंतर नाही. जे काय केलं त्याचा हिशोब करूनच पुढं जायचं इथून! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षभर काही बरं केलं असेल तर रंगपंचमी नाहीतर मग शिमगा! आणि म्हणूनच बहुदा हे दोन्ही सण मार्चमध्येच येत असावेत!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com