esakal | गप्पा ‘पोष्टी’ : सकारात्मकतेचा स्वीच! 

बोलून बातमी शोधा

switch to positivity

गप्पा ‘पोष्टी’ : सकारात्मकतेचा स्वीच! 

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा, सकारात्मक वागा’ अशा सल्ल्यांचा आपल्यावर रोज भडिमार होतोय हल्ली. असे सल्ले ऐकल्यावर मला अनेक प्रश्न पडतात. सध्याच्या भीषण जागतिक महामारीच्या काळात आपण काय खुशीनं नकारात्मक विचार करतो आहोत का? आपल्या ओळखीतले, नात्यातले जिवलग आपला जीव गमावत असताना आपण काय आपल्या मर्जीनं नकारात्मक झालो आहोत का? ह्या अत्यंत अवघड काळात अफाट भीती वाटणं, भीषण काळजी वाटणं अन् प्रचंड अनिश्चितता वाटणं हे स्वाभाविकच आहे ना? मग, ह्या अत्यंत अवघड आणि  अनिश्चित काळातून जात असताना कोणीही कितीही कळकळीनं, ‘चला, आता आपण सकारात्मक राहूया,’ असं सांगितलं तर तसं राहणं खरंचच शक्य असतं का? एखादा दिवा चालू बंद करण्यासाठी जसं बटण किंवा स्वीच असतोस तसं नकारात्मकतेऐवजी सकारात्मक होण्याचा एखादा स्वीच असतो का?

त्याच बरोबर मला असाही प्रश्न पडतो की, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून ‘सगळं ओकेच सुरू आहेस’ किंवा ‘सगळं काही ठीक होणार आहेस’ असा विचार करणं म्हणजे सकारात्मकता का? आणि जर आपल्या भोवती पेटलेल्या भीषण वणव्याच्या मध्यभागी आपण बसलो असू, तरीही भीतीने गर्भगळित न होता सकारात्मक राहणं शक्य असतं का?

हो, हे शक्य असतं...

तर, असतं. अत्यंत भीषण परिस्थितीतही सकारात्मक राहणं शक्य असतं. मात्र त्याचा एकच एक स्वीच किंवा बटण नसतं. सकारात्मकता अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून सतत रुजवत राहावी लागते. सध्याच्या काळात सकारात्मकतेचही सुरुवात स्वतःच्या अन् आपल्या जिवलगांच्या जिवाची काळजी घेण्यानं करावी. ‘जान है तो जहान है’. यासाठी काय करायला हवं हे आपल्याला तोंडपाठ झालं आहे, पण तरीही ते न कंटाळता करत राहणं महत्त्वाचं आहे. कुठलाही एक बेसावध क्षण, एक बेफिकीर वर्तन आपल्याला संसर्गाच्या खाईत लोटू शकतो. त्यामुळं सतत सजग राहणं हा सकारात्मकतेचं पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे.

मानसिक आरोग्य जपा

स्वतःचं आणि आपल्या जिवलगांचं मानसिक आरोग्य जपणं हा सकारात्मकतेच्या स्वीचचा दुसरा महत्त्वाचा भाग. यासाठीचेही अनेक उपाय आपल्याला माहीत असतातच. मीडियामधून येणारी नकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचू न देण्यापासून ते कुटुंबातल्या लोकांनी एकत्र चांगला वेळ घालवण्यापर्यंत आणि छंद-कला जोपासण्यापासून ते प्राणायाम-ध्यान करण्यापर्यंत आपलं आणि आपल्या जिवलगांचं मानसिक आरोग्य सांभाळण्याचे अनेक उपाय आपल्याला माहीत असतात. त्यातले आपल्याला जे भावतात, जमतात ते तातडीनं करायला लागणं महत्त्वाचं आहे.

सकारात्मकतेचा एकच एक स्वीच नसतो, तर ती आपल्या मनातली अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी बनलेली एक क्लिष्ट व्यवस्था असते. नकारात्मकतेचा महापूर त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचू न देता अनेक वेगवेगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींनी आयुष्यातली सकारात्मकता तेवत ठेवणं हे आपल्या हातात असतं.

ज्या गोष्टी आपल्याला बदलता येतात त्या बदलण्याचं धैर्य, ज्या आपल्या हाताबाहेर आहेत त्यांचा स्वीकार आणि ह्या दोन्हीतला फरक समजण्याचं शहाणपण ही त्रिसूत्री आचरणात आणणं जमलं, की सकारात्मकतेचे अनेक छोटे छोटे स्वीचेस सापडायला लागतात!