esakal | टेक्नोहंट : डिजिटल ह्युमन ‘आयपेरा’!
sakal

बोलून बातमी शोधा

Robot Sophia

टेक्नोहंट : डिजिटल ह्युमन ‘आयपेरा’!

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

आतापर्यंत आपण चित्रपट, मालिकांमध्ये व्हीएफएक्स, रोबोटिक्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर झालेला पाहिला; मात्र आता चक्क रोबोही चित्रपटात दिसणार आहे. तुम्ही म्हणाल की यामध्ये नवे काय? आतापर्यंत एखाद-दुसऱ्या मशिनप्रमाणे रोबोचे काम मर्यादित होते. आता तुर्कीतील एका चित्रपटात चक्क रोबो मानवी हावभावाप्रमाणे अभिनय करणार आहे. एवढेच नव्हे, तर या रोबोने नुकतेच निर्मात्यांच्या उपस्थितीत चित्रपट साईन केला.

नवतंत्रज्ञानाचा वापर करत विविध क्षेत्रांमध्ये रोबोटिक्सचा वापर बराच वाढला आहे. यापूर्वी २०१६मध्ये हॉंगकॉंगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीने ‘सोफिया’ हा रोबो तयार केला होता. त्यावेळी सोफियाची बरीच चर्चाही झाली होती. त्यानंतर अनेकांनी अशाप्रकारच्या रोबोंबाबत संशोधनही केले. मध्यंतरी ‘इरिका’ नामक जपानी रोबो ‘बी’ या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर या क्षेत्रात अनेक संशोधनही पार पडले. आता तुर्की येथील चित्रपट निर्माते बिरोल गुव्हेन यांनी ‘डिजिटल ह्युमन’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यात ‘आयपेरा’ नावाची ह्युमनॉईड रोबोट महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नुकतेच, निर्माते बिरोल गुव्हेन यांच्या उपस्थितीत आयपेराने हा चित्रपट साईन केला. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, २०२२मध्ये हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.

इस्तंबूल येथे एक ते सहा जूनदरम्यान झालेल्या ‘कंटेम्पररी इस्तंबूल’ या आर्ट फेअरमध्ये ‘आयपेरा’चे लॉन्चिंग करण्यात आले. त्यावेळी ‘आयपेरा’ने छोटेखानी मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, ‘हाय, मी ‘आयपेरा’. मी डिजिटल ह्युमन. मला मानवजातीबाबत आदर आहे. माझे शरीर तुमच्यासारखे नसले तरी मी तुमच्यासारखा अभिनय करणार आहे. मला डिजिटल अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करायची आहे...’

तंत्रज्ञ बेगर अॅकबे, साय-फाय लेखक तेवफिक युवर, आणि अभियंता झेनेप सेझर यांनी आयपेराची निर्मिती केली आहे. अन्य रोबोंच्या कार्यप्रणालीच्या तुलनेत ‘आयपेरा’कडून अस्सल अभिनय करून घेणे आव्हानात्मक असल्याचे तंत्रज्ञांनी यावेळी सांगितले. कथानकानुसार ‘आयपेरा’चे हावभाव तसेच भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कथानकानुसार तांत्रिक तयारी करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स या दोन तंत्रज्ञानाची सांगड घालून ‘आयपेरा’ जन्माला घालण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या ‘आयपेरा’चा जन्म २६ ऑक्टोबर २०२० रोजी झाला असला तरी ‘डिजिटल ह्युमन’ या चित्रपटात तिचे वय २१ वर्षे असणार आहे. त्यामुळे या चित्रपटात ‘आयपेरा’ची नेमकी भूमिका कशी असणार आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

भविष्याची नांदी...

कोरोना महामारीचा फटका जगभरातील चित्रपटसृष्टींना बसला. परिणामी निर्मात्यांना कोट्यवधींचा फटका सहन करावा लागला. भविष्यात कोरोनासारख्या अन्य महामारीचा चित्रपटसृष्टीवर पुन्हा परिणाम होऊ नये म्हणून तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागत असल्याने आता माणसांऐवजी ‘आयपेरा’सारख्या ह्युमनॉईड रोबोचा वापर वाढल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.

loading image