
भाडेकरूला एक पैसा न भराव्या लागणाऱ्या खोलीलाही अदृश्य भाडं असतं.ते तुमच्या खासगी आयुष्याचा लिलाव करून मिळवलं जातं.
व्हॉटस्अॅपची आलेली नवी ‘प्रायव्हसी पॉलिसी’ ही अशा अदृश्य भाड्यासारखी आहे!
तुम्ही शहराच्या मध्यवर्ती भागात, रस्त्यापासून अगदी जवळ एक खोली घेतलीय. सहजपणे ये-जा करता यावं अशी जागा निवडलीय. घरमालक सांगतोय, की खोली फ्री आहे. ‘अजिबात भाडं मागणार नाही आणि तुमच्या खासगी आयुष्यात मी काही हस्तक्षेप करणार नाही,’ अशी त्याची हमी.
हा व्यवहार कसा काय चालेल, याची शंका तुमच्या मनात येऊन गेलीय. पण, ‘आहे फुकट तर घ्या वापरून,’ ही भावना शंकेवर मात करतेय. हा फुकटात खोली देतोय, म्हणजे काहीतरी गडबड असणार, असा अधूनमधून गाजावाजा होत राहतोय. पण, पुन्हा फुकटचा मोह काही सोडवत नाहीय. बरं घरमालक वरून हेही सांगतो, की तुमच्या खोलीचा दरवाजा मोकळा राहील; तिथं कुणाला एक बॅनरही चिकटवू देणार नाही.
प्रत्येक गोष्टीला पैसे भरायचे कुठं, हा प्रश्नही सतावत राहतो आणि खोली आता रोजच्या जगण्याचा स्वाभाविक भाग बनून जाते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
काल घरमालक दारात उभा राहिला. म्हणाला, ‘तुमची खोली तुमचीच आहे. तुमच्या खासगी गोष्टीत मी काही तोंड घालणार नाही. पण पाहा, की माझे नातेवाईक आणि सहकारी आहेत. त्यांना तेवढी तुम्ही कुणाशी गप्पा मारता याची माहिती हवी आहे. त्यांचे ते घेतील ती माहिती. मला काही लागणार नाही...’
पुढं म्हणाला, दुरुस्तीसाठी कोणी आला, तर त्याला तुमच्या खोलीची, तुमच्या बेडची लांबी-रुंदी, खोलीतल्या इतर वस्तू वगैरे त्याला दिसतील. तो ती माहिती नोंदवून घेईल. मला काही नको. त्याला लागेल तेवढी माहिती तो घेईल.’
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘‘तुम्ही खोलीत फुकट राहा,’’ असं पुन्हा बजावून घरमालक सांगतो, ‘‘तुम्ही काही खरेदी करून आणलं तरी माझी काहीच हरकत नाही. मी काही कोणाला सांगणार नाही. पण, माझे काही नातेवाईक तुमच्या खरेदीची त्यांना हवी तेवढी माहिती घेतील. तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही...’’
‘‘तुमची सारी माहिती खासगी आहे आणि हो, सुरक्षित आहे. तुमच्याकडं कोण आलं-गेलं, याची नोंद मी करत नाही. मध्यंतरी दुरुस्तीसाठी आलेला जो होता, त्यानं तुमच्या खोलीत सीसीटीव्ही बसवून ठेवला आहे. मी काही सीसीटीव्ही पाहाणार नाही. तो पाहील. आणि आमच्या काही नातेवाईकांना गरज पडेल, तसे तेही पाहतील. ते लाईटवाले, पाणी सोडणारे वगैरे लोकंही त्यांना हवी तेवढी माहिती ते घेतील. मला काही नको,’’ असं घरमालक सांगत राहिला.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- भाडेकरूला एक पैसा न भराव्या लागणाऱ्या खोलीलाही अदृश्य भाडं असतं. ते तुमच्या खासगी आयुष्याचा लिलाव करून मिळवलं जातं.
- व्हॉटस्अॅपची पाच जानेवारीला आलेली नवी ‘प्रायव्हसी पॉलिसी’ ही अशा अदृश्य भाड्यासारखी आहे!
सम्राट फडणीस (samrat.phadnis@esakal.com)