टिवटिवाट : अदानी, रोनाल्डो, एरिक्सन

सोशल मीडियावरच्या छोट्या-छोट्या पोस्ट व्यवहारात किती महत्त्वाच्या ठरताहेत, याची तीन उदाहरणं गेल्या आठवडाभरात दिसली.
Adani Ronaldo Eriksen
Adani Ronaldo EriksenSakal

सोशल मीडियावरच्या छोट्या-छोट्या पोस्ट व्यवहारात किती महत्त्वाच्या ठरताहेत, याची तीन उदाहरणं गेल्या आठवडाभरात दिसली. पहिलं, अदानी उद्योग समुहाबद्दलच्या उलट-सुलट पोस्टचं, दुसरं कोका कोलाच्या सॉफ्टड्रिंकच्या बाटल्या फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं बाजूला सारण्याच्या काही सेकंदांच्या व्हिडिओ क्लीपचं आणि तिसरं उदाहरण ख्रिस्तियन एरिक्सन नावाचा फुटबॉलपटू युरोचषक स्पर्धेत मैदानावरच कोसळल्यानंतर जगभरातून आलेल्या प्रतिसादाचं. ही तिन्ही उदाहरणं मोठ्या प्रमाणावर जनमानसावर परिणाम करणारी होती. कशी ते पाहूया.

दलालांचा ट्विट आणि अदानी

विख्यात पत्रकार सुचेता दलाल यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. एका मोठ्या कंपनीच्या शेअरचे भाव कृत्रिमरीत्या वाढवले जात असल्याचा संशय त्यांनी मांडला. दुसऱ्याच दिवशी अदानी उद्योग समुहाबद्दलची स्टोरी व्हायरल झाली आणि पाहता पाहता दलाल यांची पोस्ट, अदानी यांची कंपनी असा संदर्भ लावला जाऊन अदानी उद्योग समुहाच्या शेअरचे भाव दहा टक्क्यांनी गडगडले. एरवी शेअर ब्रोकरच्या स्क्रिनकडं डोळे लावून बसणारे गुंतवणूकदार, दलाल त्या दिवशी ट्विटरच्या ट्रेंडकडं वळले. नेमकं काय होतंय, हे कळायच्या आत शेअरच्या किमतींवर परिणाम झाला.

रोनाल्डो आणि कोका कोला

युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पत्रकार परिषदेवेळी रोनाल्डो यानं समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटल्या तुच्छपणानं बाजूला सारल्या आणि ‘फक्त पाणी प्या,’ असं तो कॅमेऱ्यासमोर खणखणीतपणे म्हणाला. ३६ वर्षे वयाच्या पोर्तुगालच्या रोनाल्डोच्या फिटनेस सल्ल्याचा परिणाम अमेरिकी शेअर बाजारावर झाला आणि कोका कोलाच्या शेअरचं बाजारभावाचं मूल्यांकन चार अब्ज डॉलरनं घसरलं. म्हणजे सुमारे २९३.४१ अब्ज रुपयांचं. रोनाल्डोच्या कृतीची क्लिप अवघ्या वीस सेकंदांची होती.

कोसळलेला एरिक्सन

एरिक्सन नावाचा डेन्मार्कचा फुटबॉलपटू हृदयविकारानं मैदानावर कोसळला. युरो चषक फुटबॉल स्पर्धा पाहणाऱ्या कोट्यवधी प्रेक्षकांना हा धक्का होता. काही क्षणातच २९ वर्षे वयाच्या एरिक्सनच्या तब्येतीसाठी प्रार्थनांचा महापूर आला. विषय वाढत कोविड लशींपर्यंत पोचला. त्यातून अपमाहिती फोफावली. कोविड लस घेतल्यानं एरिक्सनला हृदयविकाराचा झटका आल्याच्या अफवांचा बाजार पसरला. एरिक्सननं अजून लस घेतलेलीच नाही, ही माहिती पोहचेपर्यंत अपमाहितीनं अनेकांचं नुकसान केलं.

सोशल मीडियावरच्या पोस्ट, व्हिडिओ, ऑडिओ म्हणजे टाइमपास राहिलेलं नाही. तुमच्या खिशापर्यंत, तुमच्या आरोग्यापर्यंत या माहिती-अपमाहितीचे परिणाम थेट होत आहेत. रोनाल्डोला चांगल्या आरोग्यासाठी पाणी योग्य असल्याचा संदेश ठामपणे द्यायचा होता, हे मान्य केलं, तरी त्याच्या वीस सेकंदांनी कोका कोलाच्या समभागधारकांचं धाबं दणाणलं. अदानी-अंबानी-मोदी-शहा यांच्यातल्या कथित राजकीय संबंधांच्या मीम्स आणि पोस्ट वाचून भांबावलेल्या सामान्य भारतीय गुंतवणूकदारांच्या खिशाला चाट बसली. एरिक्सनच्या कोसळण्यानं लसीकरणाच्या मोहिमेला अकारण अडथळा आला.

अपमाहिती धक्का देणारी असते. खूप काही नवं सांगतो आहे, असा आव अपमाहितीभोवती असतो. माहिती प्रामुख्यानं निखळ असते आणि सरकारी यंत्रणा, संस्थात्मक माध्यमे, समाजातील प्रभावशाली व्यक्ती-संघटना-समुहांकडूनही तिचा प्रसार होत असतो. मात्र, निखळ माहिती नीरस वाटण्याची आपली स्वाभाविक प्रवृत्ती असते. परिणामी, अपमाहितीच्या धक्क्याच्या मोहाला बळी पडण्याची शक्यता वाढते. एखाद्या कृतीचा अनर्थ लावण्याचे काम अपमाहितीतून होत राहते.

एरवी गंमत म्हणून या गोष्टी खपून गेल्या असत्या; आता अदानी, रोनाल्डो आणि एरिक्सनने आठवडाभरात धडा दिलाय, की अनर्थ काढून सादर केलेली अपमाहिती खिशालाही हात घालू शकते आणि लशींबद्दल नसत्या शंका मनात रोवून ठेवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com