esakal | एक अटक; अनेक प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

m-s-dhoni

दुसऱ्याच्या आयुष्यात निरुपद्रवी ढवळाढवळही अमान्य असताना बलात्काराची धमकी देण्याइतका निर्ढावलेपणा इतक्या कमी वयात येणं म्हणूनच धक्कादायक आहे.सोशल मीडियावरून ही घटना घडण्याची चार मूलभूत कारणं दिसतात... 

एक अटक; अनेक प्रश्न

sakal_logo
By
सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग क्रिकेट संघ सुमार कामगिरी करत आहे. आपला आवडता स्टार सुमार कामगिरी करत असेल, तर चाहते नाराज होणं स्वाभाविक आहे. चाहत्यांनी नाराजी व्यक्त करणंही नैसर्गिक आहे. तथापि, धोनीच्या बाबतीत गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर जे काही घडलं, ते धक्कादायक आणि अस्वस्थ करणारं आहे.

एका चाहत्यानं सोशल मीडियावरून थेट धोनीची पत्नी साक्षी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर थेट बलात्काराच्याच धमक्या दिल्या. धोनीची अवघी सहा वर्षं वयाची मुलगी झिवा हिच्या बाबतीत या धमक्या होत्या. धमक्या देणारा मुलगा आहे अल्पवयीन. शिकतोय इयत्ता बारावीत. त्याला पोलिसांनी शोधून अटकही केली. मात्र, अटकेनं प्रश्न सुटणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अज्ञात राहून, बनावट नावांनी काहीही करता येतं, हा मोठ्ठा गैरसमज सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी निर्माण केला. खासगी आयुष्यात कुठल्याही सरकारनं डोकावू नये, याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. तथापि, आपला खासगीपणा जपून दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा अधिकारही कुणाला नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात निरुपद्रवी ढवळाढवळही अमान्य असताना बलात्काराची धमकी देण्याइतका निर्ढावलेपणा इतक्या कमी वयात येणं म्हणूनच धक्कादायक आहे. सोशल मीडियावरून ही घटना घडण्याची चार मूलभूत कारणं दिसतात... 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

1. आपण सोशल मीडिया समजून वापरण्यात कमी पडतो. त्याबद्दल आपलं सार्वजनिक आकलन कमी आहे.
2. लोकप्रतिनिधींनी कायदे बनवताना खासगीपणाचा राजकीय सोयीचा अर्थ लावला.
3. कायदा अस्तित्वात आहे, याची जाणीव करून देण्यात अंमलबजावणी यंत्रणा कमी पडते.
4. खासगीपणाच्या नावावर कंपन्यांनी चालवलेल्या नफेखोरीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा नाहीत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कारणांच्या तपशिलात गेलं, तर पुराव्यादाखल लांबलचक यादी देता येईल. अगदी थोडक्यात मांडण्यासाठी काही प्रश्न पुरेसे ठरतील -

एखाद्या व्यक्ती, संस्थेविषयी अपमाहिती (misinformation) आणि खोटी माहिती (fake information) पसरवणं हा गुन्हा आहे. गेल्या सात वर्षांत राजकारणाच्या सोयीसाठी अपमाहिती आणि खोटी माहिती पसरविणाऱ्या किती लोकांवर कारवाई झाली?

सार्वजनिकरीत्या शिवीगाळ करणं गुन्हा असेल; तर सोशल मीडियावर शिवीगाळ करणंही गुन्हाच आहे. या गुन्ह्याबद्दल किती लोकांवर कारवाई झाली?

सार्वजनिक अथवा खासगीतही अश्लील वर्तन करणं, असभ्य वागणं विनयभंगाचा गुन्हा ठरतो; सोशल मीडियावर अशा वर्तनासाठी किती लोकांवर विनयभंगाचे खटले दाखल झाले?

सोशल मीडिया कंपन्या नफेखोरीच्या मोहापोटी वापरकर्त्यांच्या ‘खासगीपणा’ची ढाल पुढे करतात. खासगीपणा हा वापरकर्त्यांच्या भल्यासाठी आहे की कंपन्यांच्या?

या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत व प्रश्न राज्यकर्त्यांना, कायदे बनविणाऱ्यांना विचारलेही पाहिजेत; अन्यथा झिवाबद्दल धमकी देणारी प्रवृत्ती आपल्या आसपासही आपण नकळत पोसत बसू.