esakal | लग्नाची गोष्ट : खेळ मांडला, रंगला!
sakal

बोलून बातमी शोधा

Viju and Anagha Mane

लग्नाची गोष्ट : खेळ मांडला, रंगला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विजू माने हे प्रत्येक चित्रपटप्रेमींना परिचित असलेले नाव आहे. ‘ती रात्र’, ‘शर्यत’, ‘खेळ मांडला’, ‘बायोस्कोप’ या चित्रपटातील ‘एक होता काऊ’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन विजू माने यांनी केलं आहे. या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नी अनघा माने यांची. हे दोघं काम करत असलेली क्षेत्रं अगदी वेगळी. विजू हे मनोरंजन क्षेत्रात तर, अनघा एका फार्मा कंपनीत क्लिनिकल डेटा मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पहिली भेट काही वर्षांपूर्वी ठाण्यातील बांदोडकर कॉलेजमध्ये झाली. विजू त्या कॉलेजच्या एका एकांकिकेचे दिग्दर्शन करत होते आणि अनघा या त्या एकांकिकेत काम करत होत्या. पुढं त्यांच्यात छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता लवकरच त्यांच्या लग्नाला 12 वर्षं पूर्ण होतील.

विजू यांनी पत्नी अनघाबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘अनघाचा स्वभाव शांत आणि मृदू आहे. ती खूप केअरिंग आहे आणि तिला सगळ्यांचीच काळजी असते. तिला जबाबदारी घेण्याची वेळ आली, की ती अत्यंत मॅच्युअर होते आणि हा तिच्यातला एक महत्त्वाचा गुण आहे. मी शूटिंगनिमित्त बाहेर गावी असलो, की माझ्या मागं ती सगळं छान सांभाळते, खूप धीरानं उभी राहते. मी खूप संवेदनशील आहे, त्यामुळं तिची मानसिक कणखरता मला आत्मसात करायला आवडेल. कामाच्या बाबतीतही ती मला प्रत्येक वेळी पाठिंबा देत आली आहे. मला नातेवाईक तसे कमी असल्यानं मी ‘फॅमिली मॅन’ कधीच नव्हतो. पण अनघामुळं मी नात्यांमध्ये रमू लागलो, नातेवाईकांशी होणारा संवाद आणखी वाढला. असे काही सकारात्क बदल अनघाच्या माझ्या आयुष्यात येण्यानं घडून आले आहेत.’’ अनघा विजू यांच्या स्वाभावाबद्दल म्हणाल्या, ‘‘विजू थोडासा चिडचिडा आहे, पण अत्यंत मनमिळाऊ आहे. त्याचा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे आणि त्यातल्या प्रत्येक मित्राचा त्याला विचार करायचा असतो. मला जशी सगळ्यांची काळजी वाटते, तशीच त्यालाही प्रत्येकाची काळजी असते. त्याच्यातला मला सगळ्यात जास्त भावणारा गुण म्हणजे, त्याचा मनमोकळा आणि मनमिळाऊ स्वभाव. त्याची कुणाशीही पटकन मैत्री होते. त्याला माणसं जोडायला प्रचंड आवडतं. खूप मित्र असणं हे त्याला श्रीमंतीचं लक्षण वाटतं. तसंच, तो समोरच्या व्यक्तीशी उत्तम प्रकारे संवाद साधू शकतो. मी त्याच्या इतकी गप्पिष्ट नसल्यानं सुरुवातीच्या काळात मला आश्चर्य वाटायचं, की कसं हा सगळ्यांशी इतक्या गप्पा मारू शकतो! पण आता इतके वर्ष त्याच्याबरोबर राहून त्याच्यातला हा एक चांगला गुणही माझ्यात काही अंशी आला आहे.’’

विजू माने यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अनघाही काही वेळा त्यांच्या सेटवर जातात. विजू दिग्दर्शक म्हणून सेटवरती कसे असतात असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, ‘‘विजू सेटवर खूप संयमी असतो. तो क्वचितच कोणावर चिडतो. अगदी स्पॉट बॉयपासून ते कलाकार, तंत्रज्ञांपर्यंत तो सर्वांची काळजी घेतो, सगळ्यांना सांभाळून घेतो. सगळ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देतो.’’ विजू माने यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी ‘गोजिरी’ आणि ‘खेळ मांडला’ हे दोन चित्रपट अनघा यांच्या विशेष आवडीचे आहेत.

विजू हे आतापर्यंत एक चांगला नवरा, मित्र, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका खूप चांगल्याप्रकारे बजावत आले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीन अशाच एका भूमिकेत ते खूप रमतात ते म्हणजे वडिलांची भूमिका. अनघा आणि विजू यांना एक गोड मुलगीही आहे; तिचं नाव गोजिरी. विजू आणि गोजिरी यांच्यात खूप खास नातं आहे. अनघा म्हणाल्या, ‘‘विजूचं जगात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल, तर ते आमच्या लेकीवर. तिला कधी काही लागलं, खुपलं तर त्याला खूप त्रास होतो. तिनं काहीतरी नवीन करावं यासाठी तो तिला कायम प्रोत्साहन देतो. लॉकडाउनमुळं घरी असल्यानं विजूला गोजिरीला जास्तीत जास्त वेळ देता येतोय. बाबा घरी असल्यानं तीही खूष आहे. मग या दिवसात पेंटिंग करणं, एखादा पदार्थ बनविणं असं दोघं मिळून काही ना काही नवीन करत आहेत.’’

विजू आणि अनघा यांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी एकमेकांची साथ दिली आहे. फक्त वैयक्तिकच नाही तर कामाच्या बाबतीतही त्यांना एकमेकांकडून खूप चांगला पाठिंबा मिळतो, असं ते दोघंही आवर्जून सांगतात. प्रत्येक निर्णय ते एकमेकांशी विचार विनिमय करून घेतात आणि हाच त्यांच्या सुखी संसाराचा मंत्र आहे.

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image