कृषी पदवीधर बनविताहेत ‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँड

Grapes-Agriculture
Grapes-Agriculture

कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता.

आमची दहा एकर शेती. माझे वडील बापूसाहेब यांनी मोठ्या कष्टाने विहीर, शेततळ्यातून पाणी व्यवस्थापन करीत पाच एकरावर द्राक्षबाग केली.

माणिक चमन, एसएसएन या जातींची लागवड केली आहे. पिकाने आर्थिक स्थैर्य दिले. यापुढे शेतीमध्ये नवीन तंत्र आणण्यासाठी आम्ही दोघे भाऊ कृषी पदवीधर झालो... कडवंचीमधील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे शेती आणि गावाचे चित्र सांगत होता.

बालासाहेब म्हणाला की, आमच्या जमिनी हलक्या, मध्यम स्वरूपाच्या. सोयाबीन, कापूस आणि काही प्रमाणात कडधान्ये लागवड करायचो. परंतु, वाढता खर्च, पडलेल्या दरामुळे जमा-खर्चाचा मेळ बसेना. साधारणपणे १९९५ च्या दरम्यान खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गावामध्ये जल, मृदसंधारणाची कामे सुरू झाली. कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पीकबदलाबाबत मार्गदर्शन केले. यादरम्यान काही शेतकरी नाशिक भागात गेले असताना त्यांनी सविस्तरपणे तेथील शेतकऱ्यांकडून द्राक्षशेतीचे तंत्र समजावून घेतले आणि गावात द्राक्षशेती रुजवली.

शेतकऱ्यांनी एकमेकांच्या साथीने द्राक्षबागा वाढविल्या. शेततळे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे गणित बसविले. नाशिक, सोलापूर, पुणे भागातील द्राक्षबागांना भेटी देऊन शेतकऱ्यांनी तंत्र समजावून घेतले. चुका दुरुस्त केल्या. दरवर्षी नाशिक, सोलापूर भागातील प्रयोगशील द्राक्ष बागायतदारांना गावात चर्चासत्रासाठी बोलाविले जाते. त्यांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापनात बदल करीत साधी सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका, कृष्णा, नाना पर्पल या जातींचे दर्जेदार उत्पादन घेतोय.

अनुकूल हवामानामुळे वाढली गोडी
हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनी, स्वच्छ कोरडे हवामान द्राक्षवाढीला पूरक ठरले. उपलब्ध पाण्याचे गणित मांडूनच द्राक्ष लागवड वाढली. जमिनीच्या सुपिकतेवरही भर दिला. प्रत्येक घरात किमान चार ते सहा जनावरे आहेत. उपलब्ध शेणखताचा शेतीमध्ये वापर होतो. काटेकोरपणे पाणी, विद्राव्य खतांचा वापर, मर्यादित फवारण्या, सेंद्रिय खत, पाचट आच्छादनावर भर दिला आहे. कोरड्या वातावरणामुळे इतर विभागापेक्षा आमच्या बुरशीनाशकच्या फवारण्या मर्यादित आहेत. द्राक्षबागांचे व्यवस्थापन तरुणांच्या हाती आले आहे. गेल्या पाच वर्षात कडवंची परिसरातील नंदापूर, धार कल्याण, नाव्हा, पीर कल्याण, वडगाव, वखारी, वरूड, बोरखेडी गावांत द्राक्षबागा उभ्या राहिल्या. सुमारे बारा हजार एकरावर द्राक्षबागांचा विस्तार झाला आहे.

व्यवसाय अन् तंत्रज्ञान प्रसारही...
बालासाहेब आणि त्याचा भाऊ रवींद्र दोघे कृषी पदवीधर. गावातील शेतकऱ्यांची गरज आणि व्यापाराची संधी लक्षात घेऊन दोघांनी कृषी सेवा केंद्राची सुरवात केली आहे. याबाबत बालासाहेब म्हणाला की, मी सध्या शेती क्षेत्रातील खासगी कंपनीत नोकरी करतोय. यामुळे विविध भागांत फिरून प्रयोगशील शेतकऱ्यांनी विविध पिकांबाबत चर्चा करता येते. त्याचा उपयोग शेती विकास तसेच गावातील शेतकऱ्यांसाठी करतो. योग्य सल्ला देतो. चर्चासत्र आयोजित करतो. आमची मोबाईलवर सल्ला सेवा आहे. 

मिळवली विदर्भ, मध्य प्रदेशची बाजारपेठ 
द्राक्षविक्रीबाबत बालासाहेब म्हणाला की, आमचे एकरी १२ ते १४ टन दर्जेदार द्राक्ष उत्पादन आहे. द्राक्षाला चांगली गोडी, रंगही आहे. आम्हाला विदर्भाची बाजारपेठ जवळ आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील व्यापारी बांधावर द्राक्षाची खरेदी करतात. बाजारपेठ आणि द्राक्षाच्या गुणवत्तेनुसार दर ठरविला जातो. स्वतः व्यापारी द्राक्षघडाची तोडणी, वाहतूक करतात. त्यामुळे शेतकऱ्याला काढणी, पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्च नाही. गेल्या पाच वर्षाचा विचार करता बांधावर सरासरी ३५ ते ४५ रुपये किलो दर मिळतो आहे. दर्जेदार द्राक्ष उत्पादकांना खर्च वजा जाता एकरी सरासरी दोन लाखांचा नफा मिळतो. हा पैसा शेती विकासामध्येच गुंतविला जातो.

शेती विकासाची दिशा
    गावामध्ये ६० टक्के द्राक्ष बागायतदार, डाळिंब, पपई, सीताफळ, पेरू लागवडीवरही भर.
    पाणी उपलब्धतेनुसार पालेभाजी, कोबी, वांगी, दुधी भोपळा, काकडी, कारले लागवड.
    प्रयोगशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी निविष्ठा कंपन्यांतर्फे चर्चासत्रांचे आयोजन.
    नाशिक, सोलापूर भागातील द्राक्ष बागायतदारांना भेटी, पीक व्यवस्थापनाबाबत चर्चा.
    बहुतांश बागायतदारांकडे विहिरी, शेततळे अत्याधुनिक फवारणी यंत्रे, मिनी ट्रॅक्टर, पिकअप गाड्या, टुमदार बंगल्यांची उभारणी.
    द्राक्ष बागायतदार कडवंची आणि कडवंची एक्स्प्रेस हे व्हॉट्सॲप ग्रुप. यावर माहितीची देवाणघेवाण. शेतकरी गटांच्या बरोबरीने शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना. 
    सासरी गेलेल्या मुली तसेच गावात सासरी आलेल्या मुलींनी माहेरी द्राक्षबागा उभारल्या.
    खरपुडी आणि नाव्हा येथील कृषी महाविद्यालयात गावातील विद्यार्थी घेतात शिक्षण.

बेदाणा निर्मितीच्या दिशेने...
कोरड्या हवामानामुळे कडवंचीमधील द्राक्षाला चांगली गोडी आणि रंगही आहे. याचा फायदा घेत द्राक्ष उत्पादकांना एकत्र करीत बालासाहेब आणि रवींद्र ‘कडवंची ग्रेप्स' ब्रॅंड विकसित करताहेत. भौगोलिक निर्देशांक (जी. आय.) घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकरी गटाच्या माध्यमातून बेदाणानिर्मिती उद्योग उभारणीसही वर्षभरात सुरवात होत आहे. त्यामुळे राज्य आणि परराज्यांत कडवंची द्राक्ष आणि बेदाण्याला वेगळी ओळख तयार होणार आहे.

यंदाचा दुष्काळ परीक्षा घेणारा
मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने विहिरीने तळ गाठला आहे. फेब्रुवारी, मार्चनंतर शेततळ्यातील पाणी वापरण्यास सुरवात होते. पण, यंदा डिसेंबरपासूनच पाणी वापरण्याची वेळ आली आहे. जूनअखेरपर्यंत हे पाणी पुरविण्याचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्याने केले असल्याने फक्त बागा जगविण्यावर भर आहे. यंदा रब्बी ज्वारी, भाजीपाल्याची लागवड नाही.

गावाकडे रुजवली द्राक्षबाग...
बालासाहेबबरोबर चर्चा करीत असताना प्रकाश दंदाले गप्पागोष्टीत सामील झाला. हा प्रकाश बुलडाणा जिल्ह्यातील खल्याळ गव्हाण गावचा. याची बहीण पार्वती क्षीरसागर या कडवंची गावात राहतात. प्रकाश नाव्हा येथील रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालयात बी. एस्सी (कृषी)च्या तिसऱ्या वर्षाला आहे. प्रकाशने कृषी शिक्षण घेतानाच गावाकडील शेतीमध्ये दोन वर्षांपूर्वी एक एकरावर द्राक्षबाग केली. त्या गाव परिसरातील हा पहिला द्राक्ष उत्पादक. 
द्राक्षशेतीबाबत प्रकाश दंदाले म्हणाला की, माझ्या बहिणीकडे द्राक्षातील बारकावे शिकत गेलो. दोन वर्षांपूर्वी माझ्या एक एकर शेतीत माणिक चमन जातीची लागवड केली. कडवंचीपासून ३५ किलोमीटरवर माझे गाव असल्याने शेतीच्या आखणीपासून ते अगदी पहिल्या तोड्यापर्यंत माझे भाऊजी बाबासाहेब यांचे मार्गदर्शन मिळाले. गरजेनुसार येथील मजूर घेऊन गावी जातो आणि द्राक्षशेतीतील कामे पूर्ण करतो. मोठा भाऊ सुभाष बागेचे व्यवस्थापन पहातो. गावाशेजारी धरण असल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे.  यंदाच्या पहिल्या हंगामात खर्च वजा जाता दीड लाखाचा नफा शिल्लक राहिला. द्राक्षबागेचे व्यवस्थापन काटेकोर करावे लागते. बाग उभारणीची गुंतवणूक मोठी आहे. परंतु सोयाबीन, कपाशीपेक्षा द्राक्षामध्ये नफा चांगला मिळत असल्याने यावरच जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

बालासाहेब अंबिलवादे - ९०४९९०३३३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com