काजूच्या टरफलापासून औद्योगिक तेलनिर्मिती

काजूच्या टरफलापासून औद्योगिक तेलनिर्मिती

जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून काजूच्या टरफलापासून तेलनिर्मिती केली आहे. रासायनिक उद्योगांना या तेलाची विक्री केली जात असून, त्यातून उपपदार्थ म्हणून मिळणाऱ्या केकलाही (पेंड) बॉयलर उद्योगाची बाजारपेठ मिळवून दिली आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे ‘ऑईल’ बनविणाऱ्या उद्योगांची संख्या कमी आहे. त्यात परांजपे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. 

रत्नागिरी जिल्ह्यात आडीवरे हे कृषी प्रक्रिया उद्योजक हृषीकेश परांजपे यांचे गाव. मुंबई-कल्याण येथे शिक्षण झालेल्या हृषीकेश यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील एका कंपनीत ‘फायनान्स’ विभागात नोकरी केली. नोकरीदरम्यान कॅनडाचा दौरा करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथे काजू उद्योग व त्यातील विविध संधी त्यांनी पाहिल्या. काजू हे कोकणाचे मुख्य पीक असल्याने त्यांना हा उद्योग अधिक जवळचा वाटला. याच विषयात काहीतरी भरीव करायचे, असे त्यांच्या मनाने ठरवले. 

मग २००९ मध्ये नोकरीचा राजीनामा देत त्यांनी आपले गाव आडीवरे गाठले. पत्नी सौ. समृद्धी यांना सोबत घेत ‘परांजपे अ‍ॅग्रो प्रॉडक्ट’ या कंपनीची स्थापना केली. या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान घेत, अधिक अभ्यास करीत प्रक्रिया निर्मितीसोबतच बाजारपेठेचाही सविस्तर अभ्यास केला. काजू प्रक्रिया उद्योगातून देशाची बाजारपेठ मिळवण्याबरोबरच अमेरिकेत काजू निर्यात करण्यापर्यंत मजल मारली.

काजू टरफलापासून तेलनिर्मिती संधी
कुशल उद्योजक तोच असतो जो एकाच उद्योगातून उत्पन्नाच्या विविध संधी शोधतो. परांजपे यांनी हेच केले. प्रतिदिन तीन टन काजू बीवर प्रक्रिया सुरू होती. त्याच वेळी काजूगर तयार होताना टरफले वाया जात होती. त्यांच्यापासून काही करता येईल का, असा विचार सुरू झाला. टरफलापासून तेल काढता येते, ही माहिती केलेल्या अभ्यासातून झाली होती. या तेलाला इंग्रजीत कॅश्यूनट शेल लिक्विड अर्थात सीएनएसएल असे संबोधले जाते. या तेलाचे औद्योगिक महत्त्‍व, बाजारपेठ व अर्थकारण यांचा अभ्यास केला. काजू बी प्रक्रियेनंतर उर्वरित मालाचा वापर करून त्यातून उत्पन्न मिळाले, तर त्याचा मूळ उद्योगाला नफा होतो, हे देखील त्यातून उमगले. त्यातून हा प्रकल्पही उभारण्याचे निश्‍चित केले.

प्रकल्प उभारणी व वाटचाल
परांजपे यांचे रत्नागिरी एमआयडीसी येथे प्रक्रिया युनिट आहे. स्वतःची जागा असल्यामुळे ७० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी  लागली. प्रतिदिन तीस टन टरफलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आजमितीला त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
यांत्रिक पाठबळ 
 काजूच्या टरफलांवर प्रक्रिया करण्यासाठी घाणा.
 क्रशिंग आणि प्रक्रिया झालेला टरफलांचा चोथा बाहेर काढण्यासाठी दोन कन्वेअर बेल्ट.
 तेल साठविण्यासाठी चार प्रकारचे टँक (पैकी एक भूमिगत टँक).
 तेल उकळण्यासाठी रिअ‍ॅक्टर, बॉयलर आणि कंडेन्सर. 

तेल काढण्याची प्रक्रिया
 सुरवातीला काजूगरापासून वेगळी केलेली टरफले यंत्राच्या कन्वेअर बेल्टवर टाकली जातात.
 बेल्टवरून ती घाण्यात जातात. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील तेल तयार होते. 
 हे ऑईल एका पाइपद्वारे वेगळे करून भूमिगत टँकमध्ये नेण्यात येते. 
 दुसऱ्या बाजूने ऑईलपासून वेगळा झालेला चोथा (केक) बाजूला काढण्यात येतो.
 भूमिगत टँकमध्ये तेलातील गाळ खाली बसतो. त्यानंतर हे तेल ग्रॅव्हटिी तंत्राद्वारे सेडिमेंटेशन 
टँकमध्ये आणले जाते. तिथे ते ४८ तास ठेवण्यात येते. 
 भूमिगत टॅंकमध्ये गाळ बाजूला करण्याच्या पहिल्या प्रक्रियेतील तेलात छोटे कण राहिलेले असतात. आता ते काढण्याची गरज असते.
पुढे हे तेल रिअ‍ॅक्टरमध्ये आणले जाते. तिथे हॉट प्रेस मेथडचा वापर करून तेल उकळले जाते.रिॲक्टरमध्ये फॅन बसवलेला असतो. त्याचे कारण म्हणजे त्याद्वारे ढवळण्याची प्रक्रिया होत राहिल्याने उकळलेले तेल वर येत नाही. 
उकळण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यातून वाफ तयार होत असते. याचाच अर्थ त्यात पाण्याचा अंश असतो. तिचे ‘कंडेन्शेसन’ केले जाते.
 वाफेचे द्रवीकरण झाल्यानंतर हे पाणी दुसऱ्या टँकमध्ये जमा केले जाते. त्याचा उपयोग झाडांसाठी किंवा खर्चाचे पाणी म्हणून केला जातो. 
 वाफ येणे बंद झाले म्हणजे टॅंकमध्ये केवळ तेलच आहे, हे समजते.
 हे तेल मोठ्या टँकमध्ये साठवले जाते. बॅरेल किंवा दहा ते वीस हजार लिटरच्या टँकरद्वारे ते संबंधित व्यावसायिकांपर्यंत पोचविण्यात येते.

तेलाचे होते वर्गीकरण 
साधारण एक हजार किलो टरफलांवर प्रक्रिया केल्यानंतर २०० किलो तेल, तर ७०० किलोपर्यंत केक (पेंड) मिळते. हे तेल साधारण कच्च्या स्वरूपाचे (क्रूड) असते. पुढे त्याचे तीन प्रकारांत वर्गीकरण होते. कार्डोनॉल, कार्डोल, फ्रिक्शन डस्ट, असे हे प्रकार असतात. 

तेलाचा वापर कुठे होतो? 
परांजपे म्हणाले की, या तेलाचा वापर इपॉक्सी पेंट म्हणून केला जातो. लोखंड गंजू नये, यासाठी या पेंटचा वापर केला जातो. मरीन प्लाय उद्योगातही त्याचा वापर होतो. तर, फ्रिक्शन डस्टचा वापर वाहन उद्योगात ब्रेक लायनिंग कोटिंगसाठी होतो. काजूच्या तेलाचा उपयोग पूर्वी घरांसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडांनाही व्हायचा. त्यातून लाकडाचे आयुष्य वाढायचे. त्याला कीड सहजा लागायची नाही. 

 तेलाची व केकची बाजारपेठ 
तयार झालेले तेल गोवा, मुंबई, पैठण, औरंगाबाद, गुजरातसह विविध भागांमध्ये पाठविले जाते. य उद्योगातील कंपन्या गुगलच्या साह्याने आपल्या ग्राहकांचा शोध घेतात व आमच्या सारख्यांकडून त्याची खरेदी करतात, असे परांजपे म्हणाले. तेलाचा दर प्रतिकिलो २५ रुपये असतो. तेलनिर्मितीतील उपपदार्थ म्हणजे पेंड (केक) बॉयलर उद्योगासाठी ज्वलन इंधन म्हणून उपयोगात येतो. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत त्याल बाजारपेठ असल्याचे परांजपे म्हणाले. केक किलोला साडेचार रुपयांनी विकला जातो. 

टरफलरूपी कच्च्या मालाची उपलब्धता
टरफलापासून तेलनिर्मितीचा हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असावा. राज्यातही असे प्रकल्प कमी संख्येनेच असावेत. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी काही माल परांजपे आपल्या कंपनीतून उपलब्ध करतात. कोकणातील अनेक व्यावसायिक काजू उद्योगात असल्याने उर्वरित कच्चा माल त्यांच्याकडून घेण्यात येतो. या टरफलांसाठी किलोला साडेसहा रुपये मोजावे लागतात. 

काजू बी प्रक्रिया उद्योगातूनच टरफलापासून तेलनिर्मितीची संधी शोधली. सुमारे चार ते पाच वर्षांपासून हा उद्योग सुरू आहे. देशभरातील काजू उत्पादक तसेच प्रक्रिया उद्योजकांना सरकारने विविध रूपाने पाठबळ देण्याची गरज आहे. तरच, असे उद्योग पूर्ण क्षमतेने व स्थिरतेने सुरू राहतील.
- हृषीकेश परांजपे

परांजपे यांचा काजू टरफल  तेल उद्योग दृष्टिक्षेपात 
 सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक.
 काजू बी प्रक्रिया उद्योगाला पूरक उद्योग.
 केलेली गुंतवणूक पुन्हा मिळण्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागतो. 
 प्रतिदिन तीस टन काजू टरफलावर प्रक्रिया करण्याची क्षमता.
 मात्र स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल होतो. 
 सुमारे पंधरा कामगारांना रोजगार.
 प्रति एक टन काजू बी टरफलांमागे साडेसहा हजार रुपये खर्च.
 एक टन प्रक्रियेनंतर २०० किलो तेल तयार होते.
 तेल व केक विक्री करून एकूण १० टक्क्यांपर्यंत नफा उरतो. 
 वीजबिल, कामगारांचा पगार यासह यंत्रांचा घसारा, वाहतूक या खर्चही महत्त्वाचा असतो. 

हृषीकेश परांजपे, ९१३००३६२०१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com