भारतातून 66 हजार मेट्रिक टन द्राक्षे युरोपला निर्यात

ज्ञानेश उगले
मंगळवार, 21 मार्च 2017

नाशिक : होळीनंतर देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांचा उठाव वाढला आहे. गतसप्ताहात देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांना प्रतिकिलोला 25 ते 70 व सरासरी 35 रुपये दर मिळाले. निर्यातक्षम द्राक्षांना 45 ते 70 व सरासरी 50 रुपये दर मिळाले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तसेच एप्रिल महिन्यात दरात किलोमागे 3 ते 5 रुपयांनी वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले. 

नाशिक : होळीनंतर देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांचा उठाव वाढला आहे. गतसप्ताहात देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांना प्रतिकिलोला 25 ते 70 व सरासरी 35 रुपये दर मिळाले. निर्यातक्षम द्राक्षांना 45 ते 70 व सरासरी 50 रुपये दर मिळाले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तसेच एप्रिल महिन्यात दरात किलोमागे 3 ते 5 रुपयांनी वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले. 

देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांच्या आवकेत 20 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीला देशांतर्गत बाजारात जाणाऱ्या द्राक्षांच्या आवकेची गती गतसप्ताहात मंदावली आहे. होळीनंतर आवकेत घट झाली असून, वाढत्या उन्हाळ्याबरोबरच गोड, रसाळ द्राक्षांना मागणी वाढली आहे. शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल, जम्बो सीडलेस या वाणांची द्राक्षे 95 टक्के आटोपली असून, 5 टक्केच शिल्लक आहेत.

कुरकुरीतपणा आणि चवीमुळे रंगीत द्राक्षांना देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर मिळाले. गतसप्ताहात जम्बो सीडलेस, नानासाहेब पर्पल या वाणांचे दर 70 रुपयांपर्यंत वाढले. नाशिक विभागातील रंगीत द्राक्षे कमी झाली असली, तरी पुणे विभागातील बोरी, इंदापूर भागातील रंगीत द्राक्ष वाण 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उपलब्ध आहेत. सांगली विभागातील लांब आकाराच्या वाणांना कर्नाटक राज्यातील व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी होत आहे. 

सोलापूर विभागात वादळी पाऊस आणि गारपिटीने द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले. यातून वाचलेला माल बाजारात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहेत. 
हिरव्या वाणांना यंदा बऱ्यापैकी थंडीचा फटका बसला आहे. या वाणातील साखर भरण्यास यंदा 15 दिवसांपर्यंत उशीर झाल्याने योग्य वेळी हे वाण बाजारात येऊ शकले नाही. येत्या काळात वाढत्या उन्हामुळे ही अडचण राहणार नसल्याने मागणी व दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत. 

द्राक्ष निर्यातीची गती कायम 
भारतातून सोमवार (ता. 20) पर्यंत 5055 कंटेनरमधून 66,836 मेट्रिक टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली आहेत. गतवर्षी याच दिवसांपर्यंत 4737 कंटेनर म्हणजेच 61,777 मेट्रिक टन द्राक्षे युरोपात निर्यात झाली होती. गतवर्षीपेक्षा 5 हजार मेट्रिक टनाने यंदाची निर्यात पुढे आहे. सर्वाधिक निर्यात नाशिक, सांगली, सातारा, पुणे, नगर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांतून झाली आहे. युरोपातील नेदरलॅंड, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, लिथुअनिया, पोलंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, आयर्लंड, इटली, लॅटविया, झेक गणराज्य, ऑस्ट्रिया, स्पेन, रोमानिया या देशांत निर्यात झाली आहे. 

देशांतर्गत बाजारपेठेतील द्राक्षाचे दर (प्रतिकिलोचे) 

द्राक्ष वाण किमान कमाल सरासरी
थॉमसन 25 35 30
सोनाका 45 55 50
जम्बो सीडलेस 60 70 65
नानासाहेब पर्पल 60 70 65

निर्यातक्षम द्राक्षांचे दर (प्रतिकिलोचे) 

द्राक्ष वाण किमान कमाल सरासरी
थॉमसन 45 65 55
सोनाका 45 55 50
जम्बो सीडलेस 60 70 65
नानासाहेब पर्पल 60 70 65

 

पूर्वप्रसिद्धी : अॅग्रोवन

Web Title: 66 Mt Grapes exported to Europe from India