टार्गेट एकरी १५१ टन ऊस उत्पादनाचे..!

Sanjiv Mane
Sanjiv Mane

मेहनत, प्रयोगशीलता जपत आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी संजीव गणपतराव माने यांनी ऊसशेती यशस्वी केली. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी एकरी सरासरी १०० टनांचे टार्गेट ठेऊन केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले आहे.

संजीव माने यांनी १९८८ मध्ये आष्ट्याजवळ पाच एकर मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये ऊस शेतीला सुरवात केली. पारंपरिक पद्धतीने शेती करताना उसाचे उत्पादन मिळाले एकरी २२ टन. त्यांनी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरूच ठेवले. पीक उत्पादनवाढीतील सातत्य याचबरोबरीने तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्थातील तज्ज्ञांच्या सल्ल्यातून त्यांनी गेल्या वीस वर्षांत एकरी १०० टनाच्यापुढे मजल मारली.

संजीव माने यांनी ऊस उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी १९९८ मध्ये शिंदे मळा शेतकरी विकास मंचाची स्थापना केली. या मंचातर्फे बाजार माहिती केंद्र तसेच कृषी वाचनालय मोफत चालविले जाते. राज्यासह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा  आदी राज्यांतील शेतकऱ्यांच्या पर्यंत त्यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे तंत्र पोचविण्यात माने यशस्वी झाले आहेत. माने यांनी ११९६ पासून सातत्याने एकरी शंभर टन किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादनात सातत्य ठेवले आहे.  गेल्या काही वर्षीपासून प्रयोगशील ऊस उत्पादकांच्या मदतीने त्यांनी ‘टार्गेट एकरी १५१ टनाचे` या प्रयोगाला गती दिली. सध्या काही शेतकरी एकरी १३९ ते १४६ टनांपर्यंत पोचले आहेत.

प्रयोगशीलतेतून ऊस उत्पादनवाढीचे ध्येय  
सध्या  माने यांची स्वतःची ३.५० हेक्टर आणि सहा हेक्टर भागाने अशी ९.५० हेक्टर जमीन आहे. या क्षेत्रावर माने सुधारित तंत्राने ऊस, केळी, हळद आणि भाजीपाला लागवड करतात.

जमिनीची सुपिकता, सेंद्रिय कर्ब वाढ,रूंद सरी पद्धतीने लागवड, दर्जेदार बेणे निवड, बेणे प्रक्रिया, शिफारशीत खत मात्रा, ठिबक सिंचन, सबसरफेस सिंचन पद्धतीचा वापर, तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार संजीवकाच्या फवारण्या यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करून त्यांनी एकरी १०० टनाचे टार्गेट गाठले.

शिंदेमळा शेतकरी विकास मंचाच्या माध्यमातून सुमारे ८५ हून अधिक मोफत चर्चासत्रांचे आयोजन.या मंचाचे सध्या ५५० शेतकरी सभासद आहेत. केवळ एक रुपया आजीव सभासद फी घेतली जाते. या मंचाच्या माध्यमातून संजीव माने यांनी एकरी १०० टन ऊस उत्पादनाची लखपती योजना जाहीर केली. शेतकऱ्यांनी ४२१ एकरांवर लागवड केली. यापैकी दोन शेतकरी १०० टनाच्या पुढे गेले. बरेच शेतकरी ६० ते ८० टनांपर्यंत पोचले. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला. गेल्या काही वर्षात या गटातील बहुतांश शेतकरी एकरी १०० टनाच्या पुढे गेले आहेत. यातील बऱ्याच शेतकऱ्यांना व्हीएसआय संस्थेचा ‘ऊस भूषण` पुरस्कारही मिळाला आहे.

माने यांच्या मार्गदर्शनानुसार कामेरी (जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी जगदीश पाटील यांनी २५ एकर शेतीवर संपूर्णपणे स्वयंचलीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करीत २,४९० टन ऊस उत्पादन मिळविले. दुसऱ्यावर्षी २५ एकर खोडवा आणि २९ एकरावरील लागणीतून ४,५०० टन उत्पादन मिळविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या प्रयोगाची खात्री पटल्याने आता बरेच शेतकरी स्वयंचलीत ठिबक सिंचनाकडे वळले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून माने यांनी एकरी १५१ टन ऊस उत्पादनाकडे प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सहकार्याने वाटचाल सुरू केली आहे. ऊस उत्पादक पट्यात माने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांच्यामध्ये एकरी १०० टन टार्गेट असलेले शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहेत. माने स्वतः सांगली जिल्ह्यातील शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष आहेत. सध्या या गटात ६० शेतकरी आहेत. या गटातील शेतकऱ्यांच्या बरोबरीने संबंधित गावातील हजारो शेतकरी नवीन तंत्रज्ञानाशी जोडले जात आहेत.

माने यांनी आजपर्यंत महाराष्ट, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यातील शेतकऱ्यांना १,५०० हून अधिक व्याख्यान्यांच्या माध्यमातून एकरी १०० टन उत्पादनाचे सूत्र समजाऊन सांगितले  आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर

  • मोबाईल तंत्रज्ञानाचा ऊस शेतीमधील नवीन तंत्रज्ञान तसेच शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाण घेवाण जलद गतीने होण्यासाठी संजीव माने यांनी २४ फेब्रुवारी, २०१४ मध्ये ‘ऊस संजीवनी -संजीव माने` हा व्हॉटसॲप ग्रुप  तयार केला.
  •  गटात राज्यभरातून ११,००० हून अधिक ऊस उत्पादक तसेच कृषी तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या गटातील चर्चेतून अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन वाढ साध्य केली. या गटातील शेतकऱ्यांना संजीव माने दररोज मार्गदर्शन करतात.
  •  जमीन सुपिकता, माती परीक्षण, पाण्याच्या वेळा, बेणे निवड, हवामानानुसार पीक व्यवस्थापन, पीक उत्पादन वाढ  आदी सल्ला गटाद्वारे दिला जातो. संपर्क साधणाऱ्यांसाठी एक वेबसाइट तयार करण्यात येत आहे.

ओबामा यांच्याशी थेट भेट

  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा २०१० मध्ये भारत दौऱ्यावर आले असताना एकरी २० टनांवरून १२० टन ऊस उत्पादनवाढ आणि त्यासाठी ठिबक सिंचनाचे महत्त्व ही यशोगाथा सांगण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिमतर्फे संजीव माने यांची निवड झाली होती. या चर्चेतून बराक ओबामा यांना संजीव माने यांनी ऊस उत्पादनवाढीचे प्रयोग सांगितले.
  •  नोव्हेंबर, २०१३ मध्ये अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठात त्यांना ‘पीएपीएसएसी` या शेतीविषयक कार्यशाळेत त्यांचे शेतीमधील अनुभव मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
  •  संजीव माने यांनी इस्त्राईल, इजिप्त, मॉरिशस,अमेरिका, इंग्लड या देशांचा अभ्यास दौरा करून तेथील शेतीतील नवीन तंत्र समजाऊन घेतले. त्याचबरोबरीने आपल्याकडील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी यातील तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पुढाकार घेतला आहे. 

पुरस्काराने गौरव

  •  २००० मध्ये वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार.
  • २०१२ मध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, राष्टीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स, सह्याद्री वाहिनीने संजीव माने यांना गौरविले आहे.  
  • सुमारे ४५ हून अधिक पुरस्कारांनी गौरव.
  •  विविध संस्थांवर तज्ज्ञ सल्लागार म्हणून संजीव माने कार्यरत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com