उस्मानाबादी शेळीला झाली सात करडे

हरी तुगावकर
रविवार, 16 जुलै 2017

लातूर - शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी, मजूरही शेळीपालन करतात. मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश शेतकरी उस्मानाबादी शेळीला पसंती देतात. आतापर्यंत उस्मानाबादी शेळीने एकावेळी चार-पाच करडांना जन्म दिल्याची नोंद आहे. पण पोहरेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील श्‍यामल दादाराव गायकवाड यांच्याकडील उस्मानाबादी शेळीने सात सशक्त करडांना जन्म दिला. 

लातूर - शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी, मजूरही शेळीपालन करतात. मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश शेतकरी उस्मानाबादी शेळीला पसंती देतात. आतापर्यंत उस्मानाबादी शेळीने एकावेळी चार-पाच करडांना जन्म दिल्याची नोंद आहे. पण पोहरेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील श्‍यामल दादाराव गायकवाड यांच्याकडील उस्मानाबादी शेळीने सात सशक्त करडांना जन्म दिला. 

शेळीने एकाच वेळी सात करडांना जन्म देण्याचे हे रेकॉर्ड आहे. त्यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने ही शेळी आणि रेतनासाठी वापरलेल्या बोकडाचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन करण्याची गरज आहे. या संशोधनाचा फायदा जातीचा अनुवंशिक विकासासाठी होईल, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.  

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकातील शेतकऱ्यांच्याकडून पहिली पसंती उस्मानाबादी शेळीला असते. काटकपणा, जुळी करडं देण्याची क्षमता आणि चवदार मटणामुळे या शेळीला राज्यभर मागणी आहे. पोहरेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील शामल दादाराव गायकवाड यांचा शेळीपालन हा पारंपरिक व्यवसाय. आज त्यांच्याकडे १५ शेळ्या, एक बोकड आणि २७ करडं आहेत. उस्मानाबादी शेळीपालनावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातून त्यांना वार्षिक ८० ते ९० हजार रुपये उत्पन्न मिळते.

रविवारी (ता. ९) त्यांच्या दोन शेळ्या व्यायल्या. यात एका शेळीने तीन अाणि दुसऱ्या शेळीने तब्बल सात करडांना जन्म दिला. या सात करडांपैकी तीन नर आणि चार मादी करडं आहेत. सात करडे देणारी शेळी ही चौथ्या वेळी व्यालेली आहे. यापूर्वी तीन वेळेस या शेळीने तीन तर एका वेळेस पाच करडांना जन्म दिला होता. यावेळेस शेळीने सात करडांना जन्म दिला. उस्मानाबादी शेळीने आतापर्यंत चार ते पाच करडांना जन्म दिल्याची पशुसंवर्धन विभागाकडे नोंद आहे. पण या शेळीने एकाच वेळी सात करडांना जन्म दिल्याने हे वेगळेच रेकॉर्ड  झाले. रेतनासाठी गायकवाड यांनी त्यांच्याकडील उस्मानाबादी बोकडाचा वापर केला. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने ही शेळी आणि बोकडाच्या अनुवंशिक गुणवैशिष्ट्यांचे विशेष संशोधन केले तर शेतकरी, शेतमजुरांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यास मदतच होणार आहे.

गायकवाड यांनी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने शेळी आणि बोकडाचे आरोग्य व्यवस्थापन चांगले ठेवले आहे. त्यामुळे ही शेळी सशक्त आहे. उस्मानाबादी बोकड वाटप कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाकडून त्यांना नर बोकडाचे वाटप करण्यात आले होते. गेल्या रविवारी त्यांच्या शेळीने सात करडांना जन्म दिला. हे रेकॉर्ड आहे. सातही करडांची  प्रकृती चांगली आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनसत्वे दिली जात आहेत. 
- डॉ. योगेशसिंह बायस, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, भोकरंबा, जि. लातूर.

शेळीपालन आमचा पारंपरिक व्यवसाय. यातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. आमच्याकडील शेळीने यापूर्वी तीन वेळेस तीन, तर एका वेळेस पाच करडांना जन्म दिला आहे. यावेळेस मात्र या शेळीने सात करडांना जन्म दिला. ही शेळी आणि करडांचे आम्ही चांगले संगोपन करणार आहोत.
- शामल दादाराव गायकवाड, शेळीपालक, (पोहरेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर)

अधिक करडांना जन्म देण्याची क्षमता हा उस्मानाबादी शेळीचा अनुवंशिक गुणधर्म आहे. शामल गायकवाड यांच्याकडील शेळीने एकाच वेळी सात करडांना जन्म दिला आहे. सध्या या करडांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चीक आणि पुरेसे दूध पाजणे गरजेचे आहे. या शेळीच्या आनुवंशिक गुणधर्माच्या संशोधनासाठी केंद्रीय शेळी संशोधन संस्था, मखदूम (उत्तर प्रदेश) येथे रक्ताचे नमुने पाठवून त्यातील अधिक करडं देण्याची क्षमता असणारी जनुके निश्चित करता येतील. आम्ही ही शेळी आणि बोकडाची अनुवंशिक तपासणी करण्यासाठी रक्त नमुने गोळा करीत आहोत.
- डॉ. नितीन मार्कंडेय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी.