शेतीतील उत्पन्न बॅंक हप्ते, व्याजातच जातंय

मंदार मुंडले 
शुक्रवार, 21 जुलै 2017

समस्यांच्या गर्तेत प्रगतिशील शेतकरी ढवळे पुरते जायबंदी

पुणे - बैलचलित बटाटा लावणी यंत्र तयार केले होते. आता बटाटा शेतीच सोडून दिली. उरी वेदना झेलत नव्या पीक पद्धतीचा शोध घेत आज तेरा एकरांवर डाळिंब आणि थोड्या-थोड्या गुंठ्यात २१ प्रकारचा भाजीपाला ते घेत आहेत. खर्च कमी करायचा म्हणून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. तिथंही दहा लाख रुपये नुसता गोठा उभारायला गेले. आठ देशी गायी घेतल्या.

समस्यांच्या गर्तेत प्रगतिशील शेतकरी ढवळे पुरते जायबंदी

पुणे - बैलचलित बटाटा लावणी यंत्र तयार केले होते. आता बटाटा शेतीच सोडून दिली. उरी वेदना झेलत नव्या पीक पद्धतीचा शोध घेत आज तेरा एकरांवर डाळिंब आणि थोड्या-थोड्या गुंठ्यात २१ प्रकारचा भाजीपाला ते घेत आहेत. खर्च कमी करायचा म्हणून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. तिथंही दहा लाख रुपये नुसता गोठा उभारायला गेले. आठ देशी गायी घेतल्या.

त्यासाठी चार लाख रुपये मोजले. धान्य, शिक्षण, किराणा, दवाखाना असा विविध कारणांसाठी घरचा वार्षिक खर्च ८ ते ९ लाख रुपये आहे. शेतीतलं उत्पन्न बॅंकांचे हप्ते, व्याज यातच निघून जातं. शासनाच्या कर्जमाफीचाही काहीच उपयोग झालेला नाही, असे ढवळे खिन्नपणे म्हणतात.

जिल्ह्यातील भावडी (जि. आंबेगाव) येथील रामदास ढवळे यांनी शेतीतील प्रयोगांचा ध्यास हेच आपले आयुष्य मानले आहे. सातगाव पठारच्या या भागात पावसाळा संपला की प्यायलाही पाणी नसते. प्रतिकूल परिस्थितीत ढवळे यांनी प्रयोगांची आवड जपली. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. आज प्रतिकूल हवामान, मालाला नसलेले दर, वाढते खर्च, कर्ज या बाबींनी त्यांच्या प्रयोगशील वृत्तीला वेसण बसली आहे. तब्बल ४० लाखांचं कर्ज डोक्यावर घेऊन ते लढाई लढताहेत. स्वतःच्या आणि चुलतभावाच्या मिळून २० एकर शेतीचा भार ढवळे यांच्यावर आहे. डाळिंबाचा मागील बहार खराब हवामानात पूर्ण फेल गेला. केलेला चार लाख रुपये खर्च पाण्यात गेला. आशा ठेवून पुढचा बहार पकडला; पण उत्पादन सुरू होऊन पैसे हाती येण्यापर्यंतचा कालावधी किमान दीड वर्षाचा. तेवढ्या काळात घरखर्चाचं काय? मन घट्ट करून इकडून तिकडून पैसा गोळा करावा लागला. आई-वडील, मुलगा, सून असा पाच जणांचा संसार आज चालवायचा आहे. 

प्रयोगांसाठी पैसा हवा
ढवळे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शेतकरी सदस्यही आहेत. ते म्हणतात, की कुठलाही नवा प्रयोग करायचा तर त्यासाठी पैसा हवा. मग उत्पादन सुरू होणार आणि उत्पन्न मिळणार. तेही दर चांगले मिळाले तर! काही वर्षांपूर्वीच तीन मोठी शेततळी, ड्रीप, मल्चिंग आदींच्या माध्यमातून प्रयोग सुरू केले. यशस्वीही झाले. पाॅलिहाउसमध्ये जरबेरा घेतला. गुजरातला दंगल झाली. मार्केट पडलं. बॅंकेचे तीन लाख रुपये अंगावर आले. दरांनी ग्रीनहाउसमधील डच गुलाबाच्या प्रयोगावर पाणी फिरवलं. गुजरातमधून सुधारित बटाटा लावणी यंत्र आणलं. प्रगतीसाठी अजून काय काय करायचं, असे कापऱ्या स्वरात ढवळे सांगत होते.

उद्याची चिंता कायम 
वीस एकरवाला शेतकरी झाला तरी त्याचे खर्चही तेवढेच अधिक असतात. दररोज बारा मजूर दिमतीला, प्रत्येकाची तीनशे रुपये रोजची मजुरी. रोज रात्री झोपताना उद्याची जोडणी काय? या विचारानं शांत झोप लागत नाही; पण प्रत्येक दिवस आशेची पहाट घेऊन येतो, म्हणून वेदना हलक्या होतात, हाच विश्वास उरी बाळगत ढवळेंची वाटचाल सुरू आहे.   

संकटांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील
शेतीत विविध प्रयोग करत पंचक्रोशीत पथदर्शक ठरलेले रामदास ढवळे (भावडी, जि. पुणे) समस्यांच्या गर्तेत पुरते जायबंदी झाले आहेत; पण संकटे एकापाठोपाठ निर्दयपणे जाळे टाकीत निघाल्याने त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग अधू झाले आहेत. तरीही आकाशाला कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी दृढ मनीषा बाळगूनच ढवळे यांची वाटचाल सुरू आहे. 

हमीभाव द्या, मग सांगाल ते पिकवू 
बिकट परिस्थिती असूनही ढवळे यांची नवीन प्रयोगांची आस सुटत नाही. डाळिंब बागेत ‘ग्रास कटर’ आणून त्याचं मल्चिंग करायचं आहे. देशी गायीचं दूध पुण्यात विकलं तर लिटरला शंभर रुपये मिळू शकतील; पण ५० लिटर दूध पुण्यात दररोज नेणं परवडत नाही. उपाय म्हणून दररोज एक किलो तूप बनवतात. किलोला अडीच हजार ते तीन हजार रुपये दरानं विकायचा प्रयत्नही सुरू आहे. जनावरं जगवणं सोपं नाही. चारा, मूरघास तयार करणं आलं. पैसे सगळे त्यातच जिरतात. छोटा ट्रॅक्टर घ्यायचा आहे; पण मोठ्या ट्रॅक्टरवरचं कर्ज सुरू असल्याने त्यासाठी कर्जही मिळत नाही. खर्च थांबवून चालत नाही. कारण, तो थांबला तर पुढची शेती थांबली, उत्पन्न थांबलं. पहाटे चार वाजता उठून कष्टांना सुरवात होते. रात्री नऊला थकला भागला जीव जमिनीवर अंग टाकतो. अपेक्षा एवढीच असते, की राबल्याचं चांगलं फळ शासन पदरात टाकेल. तुम्ही हमीभाव द्या, मग सांगाल ते आणि तसं पिकवू आम्ही! ढवळे म्हणतात. 
 

खर्च संपता संपेना
ढवळे यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणात कसलीही कमतरता ठेवली नाही. एक एमए, तर दुसरी एमसीए झाली. दोघींच्या लग्नाला पंधरा लाख रुपये खर्च आला. बहीण आर्थिकदृष्ट्या कमजोर म्हणून भाच्याच्या शिक्षणाचाही खर्च ढवळेंनी उचलला. सगळ्यांच्या शिक्षणासाठी वर्षाला चार-पाच लाख रुपये लागायचे. आले पिकाच्या प्रयोगात २६ लाख रुपये आले; पण शेततळ्यासाठी बॅंकेचं कर्ज होतं. व्याजावरच पैसे गेले. भाच्याचे, मुलाचे लग्नही केले. भाऊ अनेक दिवस आजारी होता. त्याचा दवाखान्याचा खर्च पेलला. आज तो हयात नाही. त्याच्या दोन मुलांची जबाबदारी अंगावर आहे.