पेरणी ते काढणी यंत्राद्वारे ८० एकर शेतीचे नियोजन

सुमारे ८० एकरांत यांत्रिकीकरण केलेले नामदेव वैद्य.
सुमारे ८० एकरांत यांत्रिकीकरण केलेले नामदेव वैद्य.

गरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगावरेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव व वासुदेव आनंदराव वैद्य या दोघा भावंडांनी पेरणी ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. एकूण ८० एकर शेती सांभाळताना विविध यंत्रे वापरत श्रम, वेळ व पैसे यात बचत केलीच. शिवाय स्वतःच्या शेतीतील गरजेनुसार स्वसंशोधन करत काही यंत्रेही विकसित केली. 
 

अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बोडखा (ता. धामनगावरेल्वे) येथील नामदेव वैद्य यांची घरची ५० एकर शेती आहे. भाऊ वासुदेवराव यांच्यासोबत ते ही शेती पाहतात. दोघे भाऊ, मुले व आईवडील असे हे कुटुंब आहे. आज एकत्रित कुटुंबपद्धतीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे; परंतु वैद्य कुटुंब त्याला अपवाद ठरले आहे. नामदेव घरची शेती सांभाळतात, तर वासुदेव मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हणून धामनगाव या तालुक्‍याच्या ठिकाणी राहतात; परंतु आजही कुटुंबाचे व्यवहार एकत्रित आहेत. 

नामदेव यांचे शेतीतील करिअर 
नामदेव यांनी १९९० ते १९९२ या सुमारास आयटीआयमधून ‘पेंटर’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरवातीला मुंबईला ३० रुपये प्रति दिन पाठ्यवृत्तीवर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम केले. पुढे घरची परिस्थिती बेताचीच असल्याने अवघ्या २०० रुपये रोजगारावर काही खासगी नामवंत कंपन्यांत काम करत राहिले. मात्र घरची ५० एकर शेती त्यांना सतत खुणावत होती. त्यातच आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असा ध्यास घेऊन नोकरीचा राजीनामा दिला. ते गावी परतले. 

शेतीचा विस्तार 
वैद्य कुटुंबाची सुरवातीला अवघी चार एकर होती. त्यानंतर १५  एकरांपर्यंत क्षेत्र वाढवले. टप्प्याटप्याने ते ५० एकरांवर दोन्ही भावंडांनी नेले. आज घरची ५० एकर शेती ते कसतातच. शिवाय मित्राची ३० एकर शेती गेल्या ३५ वर्षांपासून कसत अाहेत. 

शेतकरी उत्पादक कंपनी
नामदेव यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या सहकार्याने ‘कास्तकार सोया प्रोड्यूसर कंपनी’ची उभारणी केली आहे. सुनील बोरकर अध्यक्ष, नामदेव उपाध्यक्ष, तर सचिव योगेश चौबे आहेत. या माध्यमातून कडधान्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठीचे यंत्र पंजाबातून आणले आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे गणेश जगदाळे यांनी प्रकल्पाला अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. 

यांत्रिकीकरणातील वैद्य 
सुमारे ८० एकरांवर चार विहिरी 
पाण्याचा नियोजनबद्ध वापर व्हावा, यासाठी ५० एकरांवर तुषार सिंचन
पन्नास एकरांवर सोयाबीन, यातील १५ एकरांत तुरीचे आंतरपीक, तर उर्वरित ३० एकरांत कपाशी 
या सर्व ८० एकरांवर मजूर उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण होते. ती पाहता १५ वर्षांपूर्वी तीन लाख रुपयांत ट्रॅक्‍टर खरेदी केला. त्यासोबतच पेरणी यंत्रही मिळाले. 
गरज वाढल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये दुसरा ट्रॅक्‍टर खरेदी केला. ट्रॅक्‍टरच्या वरील बाजूचा टप काढून दोन्ही बाजूंना २५ लिटर क्षमतेचे चिनी बनावटीचे पंप बांधून तुरीवर फवारणी करण्याचा प्रयोग गेल्या वर्षी केला. 
वैद्य यांच्याकडील अन्य अवजारे
नऊ दात्याचे कल्टिव्हेटर, ट्रॅक्‍टरचलीत वखरपास, पंजी, तीन पानांची ट्रॅक्‍टरचलीत तिरी (तूर शेंगा अवस्थेत आल्यावर या यंत्राचा वापर होतो. ते जमिनीत खोल जाते. त्यामुळे माती वर येते, तणकटे काढता येतात.) ट्रॅक्‍टरचलीत यंत्रांचा वापर वाढल्याने यातील काही अवजारांचा वापर आता होत नाही. 

यंत्रांच्या वापराविषयी काही...
कटर मशिन- कपाशीची काढणी झाल्यानंतर त्याची तोडणी करून त्याचे अवशेष शेतातच पसरविले जातात. त्यासाठी ‘कटर मशिन’चा वापर करतात. यात एक ते दोन इंचाचे अवशेष तयार होतात. कल्टिव्हेटर वापरून ते मातीत मिसळून घेतले जातात. पाऊस पडल्यानंतर ते कुजतात. त्याचे खत तयार होते. यंत्राची किंमत सुमारे सव्वादोन लाख रुपये आहे.  

कपाशीला खत देणे- कपाशीला खत देताना एका एकरासाठी दोन मजुरांची गरज भासते. त्यानुसार प्रतिमजूर २०० रुपये खर्च होतो. त्याला पर्याय म्हणून नामदेव यांनी आपल्या कल्पनेतून खत देण्यासाठी यंत्र विकसित केले. स्थानिक ‘वर्कशॉप’मध्ये ते तयार केले. एक बैलजोडी आणि एक मजूर असल्यास दिवसभरात सहा ते आठ एकर खत देणे शक्‍य होते. हेच काम यंत्राविना म्हणजे मजुरांमार्फत केल्यास आठ जणांची गरज भासते. त्यावर सुमारे १६०० रुपयांचा खर्च होतो. दोन फुटांचा डवरा, त्याला दोन्ही बाजूस तिफनीचे दाते, तीन रॉडद्वारे घमेले जमिनीपासून तीन फुटांवर आहे. त्याला व्हॉल्वज बसविले आहेत. त्या माध्यमातून खतांचे प्रमाण नियंत्रित होते.  

मळणीकरिता स्वतःचे थ्रेशर- क्षेत्र मोठे असल्याने विविध पिकांची मळणी करण्यावर मोठा पैसा खर्च होत होता. त्यामुळे एक लाख ३५ हजार रुपयांना चार वर्षांपूर्वी मळणीयंत्र खरेदी केले. सोयाबीन, हरभरा, तूर, गहू यांच्यासाठी त्याचा वापर होतो. सुमारे ६० ते ७० क्‍विंटल मालाची एका दिवसात मळणी होते. यात सहा ते सात माणसांची गरज भासते. बाहेर मळणी करून घेतल्यास १५० रुपये प्रतिक्‍विंटल याप्रमाणे मळणीवर खर्च होतो. यात १० हजार रुपयांत होणारे काम अवघ्या त्याच्या निम्म्याहून कमी खर्चात होते.  

फवारणीकरिता बैलचलीत यंत्र- सोयाबीन पिकासाठी पूर्वी ३६ हजार रुपयांचे बैलचलीत यंत्र खरेदी केले. याद्वारे २५ एकर क्षेत्र दिवसभरात फवारून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com