जिद्द, संघर्षातून फुलवले शेत, सावरले घर

रमेश चिल्ले
शुक्रवार, 30 जून 2017

सर्व उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून. सात एकर शेती. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून शेतीतील नफा अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने अोमप्रकाश निकम (वानवडा, जि. लातूर) यांनी पीकपद्धतीची हुशारीने रचना केली आहे. पाच एकरांत पारंपरिक तर दोन एकरांत विविध भाजीपाला व तोही सेंद्रिय पद्धतीने ते पिकवतात. अत्यंत संघर्षातून पुढे जाण्याची वृत्ती, अहोरात्र कष्ट, वेळेचे नियोजन, मार्केटिंगचे  कमावलेले कौशल्य ही त्यांची काही गुणवैशिष्ट्ये सांगता येतील.  

सर्व उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून. सात एकर शेती. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून शेतीतील नफा अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने अोमप्रकाश निकम (वानवडा, जि. लातूर) यांनी पीकपद्धतीची हुशारीने रचना केली आहे. पाच एकरांत पारंपरिक तर दोन एकरांत विविध भाजीपाला व तोही सेंद्रिय पद्धतीने ते पिकवतात. अत्यंत संघर्षातून पुढे जाण्याची वृत्ती, अहोरात्र कष्ट, वेळेचे नियोजन, मार्केटिंगचे  कमावलेले कौशल्य ही त्यांची काही गुणवैशिष्ट्ये सांगता येतील.  

पिके घेताना आपण त्याचे नियोजन कसे करतो? किती वेळ शेतीला देतो? अडतीवर विकण्याऐवजी स्वतः मार्केटिंग करतो का? असे सगळे घटक शेती परवडण्याला कारणीभूत असतात. भूकंपग्रस्त व सततच्या दुष्काळी औसा तालुक्यातील (जि. लातूर) जेमतेम हजार-बाराशे लोकवस्तीच्या वानवडा येथील ओमप्रकाश लक्ष्मण निकम या चाळीस वर्षीय युवकाने आपल्या उत्तम शेती नियोजनातून मोडलेल्या घराला माणसात आणले.

संघर्षाचा काळ 
पूर्वापार सात एकर कोरडवाहू शेतीतून पूर्वी कुटुंबाला पुरेल एवढेही उत्पादन मिळत नव्हते.

शेती वडिलांनी बटईने दिली होती. एकुलत्या एक ओमप्रकाशला मामा शहाजीराव यादव यांनी बोरफळला शिकायला ठेवले. तो लहानाचा मोठा तिथेच झाला. त्यानंतर अोमप्रकाश व बहिणींची लग्ने मामानेच लावून दिली. शेतीतून घरखर्चापुरतेही पिकत नसल्याने आई दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीला जाई. ओमप्रकाशने उदरनिर्वाहासाठी पुणे येथे कंपनी, हॉटेल, दुकानातून कामे केली. मात्र पगारात भागत नसल्याने अखेर गावी परतावे लागले. तिथेही आईसोबत मोलमजुरी केली, रोजगार हमीवर कामे केली. दोन वर्षे दुसऱ्यांच्या शेतावर सालगडी म्हणून नोकरी केली.  

घरच्या शेतीची आस 
घरची शेती सक्षम केल्याशिवाय काही बरे दिवस येणार नव्हते. कर्ज काढून बैल घेतला. आई, वडील, बायको सर्वचसह शेतीत राबत होते. त्यातून चार पैसे गाठीला जमले. जुनी वीस फूट विहीर दोनेक वर्षांत चाळीस फूट खोल केली. पाणी बरे लागले. कोरडवाहू पिकांतून फार काही हाती लागत नव्हते म्हणून दोन एकर ऊस केला. त्यातून दोन वर्षे चांगले उत्पादन घेतले. पुढे दुष्काळात ऊसही मोडावा लागला. वडील दुसऱ्यांच्या शेतावर नोकरी करून मुलाला मदत करीत होते.  

प्रगतीचे दरवाजे खुले  
पारंपरिक सोयाबीन, ज्वारी, तूर, मुगातून फारसे पैसे शिल्लक रहात नव्हते. मग मित्र दीपक कदम यांच्याडून भाजीपाला शेतीची  प्रेरणा मिळाली. त्यातून ताजा पैसा दररोज घरी येऊ लागला. शेतीत मेळ बसला. सोन्यासारखी दोन मुलं अाशिष व अभिषेक यांना औसा या तालुका ठिकाणी चांगल्या शाळेत घातले. लहानपणचे छपराचे घर. पाऊस पडताना आई डालग्याखाली पोतं झाकून मुलांना झोपवी. त्या ठिकाणी चारेक वर्षांपूर्वी चांगले सिमेंट-विटांचे पण पत्रे टाकून एक लाख रुपये खर्चून मोठे घर बांधले. गावात पूर्वी बियाणे, खते, दवाखान्याला कुणाकडून शंभर-दोनशे रुपये उधार मिळत नसत. ओमप्रकाश दिसले की पैसे मागेल म्हणून लोक भेट टाळीत. व्याजानंही कोणी हजार-पाचशे देत नसत. कारण परतफेड होईल अशी परिस्थिती त्या वेळी नव्हती. पण आज चित्र पालटले आहे. 

स्वतःच्या मालाची स्वतः विक्री 
पूर्वी बस, जीप, टमटमने भाजीपाला विक्रीसाठी न्यावा लागे. त्यात अख्खा दिवस जायचा. मग थोडे थोडे पैसे साठवून जुनी मोटारसायकल घेतली. सकाळी तोडणी केलेला भाजीपाला घेऊन दुपारी एक वाजता सास्तूर, लामजना, औसा, माकणी असे पाच आठवडी बाजार अोमप्रकाश करू लागले. स्वतः बाजारात बसून ग्राहकांना माल विकू लागले. अशा पद्धतीत एकच भाजी असून चालत नाही. मग उन्हाळ्यात दोन एकरांत थोड्या थोड्या क्षेत्रात कारले, दोडका, भेंडी, चवळी तर मेमध्ये चवळी, टोमॅटो, वरणा वा हंगामनिहाय मिरची, कांदा अशी पिके ते घेऊ लागले. आज हीच पद्धत कायम ठेवली आहे.  

सेंद्रिय शेतीवर भर 
पूर्वी रासायनिक शेतीत खर्च भरपूर व्हायचा. सर्व मेहनत करूनही पन्नास टक्क्यापेक्षा कमी पैसे शिल्लक राहात. मागील दोन वर्षांपासून लातूरच्या आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक सी. डी. पाटील, तंत्ररज्ञान व्यवस्थापक विनायक गायकवाड व सचिन हिंदोळे यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन सुरू केले. त्यातून गावातील पन्नास शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीचा गट तयार करून प्रशिक्षण दिले. वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्षेत्रावर त्यांना सहलीला पाठवले. त्यातून आत्मविश्वास निर्माण झाला. आज ओमप्रकाश यांनी रासायनिक शेती कमी करून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. सेंद्रिय शेतीला आवश्यक म्हणून दोन देशी गायी घेतल्या आहेत. शेणस्लरी, दशपर्णी अर्क, जीवामृत, गांडूळ खत, बायोडायनॅमिक खत यांचा वापर सुरू केला आहे. त्यातून गुणवत्तापूर्व उत्पादन घेतले जाते. दोन एकरांत सेंद्रीय शेतीतून २५ टक्के खर्च कमी करण्यात अोमप्रकाश यशस्वी झाले आहेत.

- ओमप्रकाश निकम, ८७८८५१८९०१
(लेखक लातूर कृषी विभागात अधिकारी असून शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

नियोजनातील वैशिष्ट्ये 
बाजारात भाज्यांची कमी आवक असते त्या वेळी बाजारात त्या आणून उत्पन्न वाढवण्याचे नियोजन
थेट विक्री केल्याने दीडपट ते दुप्पट दर मिळून नफ्याचे मार्जीन वाढते. 
मिळणारा दर रु. (प्रति किलो) (प्रातिनिधीक) 

अर्थकारण सुधारले 
अोमप्रकाश यांना आई कमलबाई, पत्नी मीराबाई यांची मोठी मदत होते. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे कामे होतात. दोन्ही शाळकरी मुले वेळ मिळेल तसे मदत करतात. पंधरा वर्षांपूर्वी शेतीसाठीचे ४० हजारांचे कर्जही फेडले आहे. जे लोक पडत्या काळात भेट टाळीत ते ओमप्रकाश यांना आदराने काकासाहेब म्हणून बोलावतात. त्यांच्या शेतीतील प्रयोगांची माहिती घेतात. पाहुण्या-रावळ्यातही मान वाढला आहे. पहाटे पाच वाजता सुरू झालेला दिवस रात्री १० च्या दरम्यान संपतो. कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणाच्या जोरावर अोमप्रकाश यांनी आपली प्रगती साधली आहे. एक मुलगा दहावीतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. सेंद्रिय गटातील शेतकरी त्यांचे अनुकरण करताहेत हेदेखील विशेष आहे.