देशी कोंबड्यांसाठी इस्लामपूरचा प्रसिद्ध बाजार

देशी कोंबड्यांसाठी इस्लामपूरचा प्रसिद्ध बाजार

इस्लामपूर (ता. वाळवा, जि, सांगली) येथील देशी कोंबड्यांचा बाजार प्रसिद्ध आहे. सुमारे ५० वर्षांपासून दर गुरुवारी व रविवारी नियमित भरणाऱ्या या बाजारात तालुक्यातील देशी कोंबड्यांची रेलचेल पाहण्यास मिळते. परसबागेतील कोंबडीपालनाला आजही चांगली संधी असून देशी कोंबड्यांना मोठी मागणी असल्याचे चित्र या बाजाराच्या अनुषंगाने पाहण्यास मिळते. 

सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या सानिध्यात वसलेला वाळवा हा तसा बागायती व सधन तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील आणि जिल्ह्याचे महत्वाचे शहर असलेल्या इस्लामपूर येथील देशी कोंबड्यांचा प्रसिध्द बाजार आहे. तसे पाहायला गेल्यास अलिकडील वर्षांत पोल्ट्री उद्योग करार शेतीद्वारे चांगलाच विकसित झाला. या क्षेत्रातील कंपन्या आपल्या संशोधन आणि विकास विभागात विकसित कोंबड्यांचे ‘ब्रीड’ शेतकऱ्यांना देऊ लागल्या. मात्र देशी कोंबड्यांचे महत्व अजूनही कमी झालेले नाही. पूर्वी घरोघरी कोंबड्या पाळल्या जायच्या. आर्थिक दृष्ट्या गरिबांना घरातील मीठ मिरचीला या कोंबड्या संगोपनाचा मोठा आधार होता. घर आणि सभोवतालची जागा कोंबड्यांना फिरण्यासाठी हक्काचे ठिकाण असायचे. काळानुसार जागा कमी होत गेली तशी कोंबड्यांची संख्या कमी होऊ लागली. परंतु बदलत्या युगातही अनेकांनी परसातील कोंबडीपालन सुरू ठेवले. किंबहुना त्याकडे व्यवसाय म्हणून लक्ष केंद्रित केले. इस्लामपूर येथील बाजाराचे महत्व त्यादृष्टीने जोखता येते. 

इस्लामपूर बाजाराला मोठी परंपरा 
इस्लामपूर बाजार समितीच्या आवाराजवळ दुतर्फा कोंबड्यांचा बाजार भरतो. आठवड्यातून दोन वेळा म्हणजे गुरूवार व रविवारी सकाळी सात ते दहा ही बाजाराची वेळ असते. या बाजाराला पन्नास वर्षांहून अधिक काळची परंपरा आहे. ग्राहक व विक्रेता यांच्या परस्पर संबंधावर हा बाजार इतकी वर्षे सुरू आहे. तालुक्यातील विविध गावांतील कुटुंबे प्रामुख्याने कोंबडीपालन करतात. व्यापारी त्यांच्याकडून व परिसरात फिरून पक्षी संकलित करतात. काही तरुणांनी ग्रामीण भागात स्वतंत्रपणे देशी कोंबडी पालनाचा स्वतंत्र व्यवसायही सुरू केला आहे. नगांवर पक्षांची विक्री केली जाते.

असा चालतो बाजार 
खाजगी विक्रेत्यांबरोबर व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात या बाजारात हजेरी लावतात. इथे आलेला ग्राहक कोंबडा उचलून त्याच्या वजनाचा अंदाज घेतो. त्यावरून त्याच्या दरांची मागणी. व्यवहाराच्या बोली ठरतात. कोंबड्याचा सशक्तपणा किंवा वजन ही बाजारातील मुख्य बाब असते. 

आखाडीला मोठी मागणी 
श्रावण महिना सुरू होण्याआधी म्हणजे आषाढ महिन्यात आखाडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या काळात देशी कोंबड्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे या दिवसांत साधारणपणे वजनानुसार दोनशे ते पाचशे रुपये प्रति नग असे त्यांचे दर असतात. खरेदी नगांवर होते. 

गटारी अमावात्स्येला झाली मोठी उलाढाल 
रविवारी २३ जुलै रोजी म्हणजे गटारी अमावस्येच्या पार्श्‍वभूमीवर इस्लामपूर कोंबडी बाजारात तब्बल दोनहजार कोंबड्यांची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. प्रति नग ३०० ते ४०० रुपये असा दर राहिला. आषाढातील शेवटचा रविवार असल्याने बाजारात ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. 
 
गावोगाव फिरून होते खरेदी
देशी कोंबड्यांचे प्रमाण ग्रामीण भागात टिकून असले तरी पूर्वीच्या तुलनेत अलीकडील काळात ते कमी झाले अाहे. ग्राहकांनाही संकरित कोंबड्यांचे दर परडवतात. त्यामुळे त्यांच्याकडून खरेदी होते. कोंबड्यांची गावोगावी जाऊन खरेदी करणारे व्यापारी जुबेर भादी म्हणाले, की इस्लामपूर बाजारात अन्य  दिवशी ६०० ते ७०० नगांची विक्री होते. आषाढ महिन्यात ती वाढते. श्रावण, मार्गशीर्ष हे दोन महिने व नवरात्रीचे नऊ दिवस हा बाजार जवळपास बंदच असतो. इतर वेळी मात्र पक्ष्यांना चांगली मागणी राहते. गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात नोटाबंदीमुळे काही दिवसांसाठी बाजारावर परिणाम झाला. आता तो स्थिर झाला आहे. देशी वाणांच्या संगोपनाला मात्र चालना मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भादी यांनी व्यक्त केली. 
- जुबेर भादी, ९८५००१३५८६

माझ्याकडे सद्यस्थितीत २० ते २५ कोंबड्या आहेत. देशी पक्षी आकाराने मोठे नसतात. परंतु त्यांचे  मांस अत्यंच चविष्ट असल्याने ग्राहकांकडून त्यास पहिली पसंती असते. पक्षांची संख्या जास्त झाल्यास मी त्या बाजारात विक्रीसाठी आणतो. 
- अशोक बाबर, तुजारपूर, ता. वाळवा

 देशी कोंबडी संगोपनातून आर्थिक फायदा
जुनेखेड (ता.वाळवा) येथील संताजी पाटील म्हणाले की पूर्वी एका कंपनीसाठी ‘विमा पॉलीर्सी संदर्भातील काम करीत होतो. काही कारणाने ते बंद पडले. पुढे काय करायचे हा माझ्यापुढे प्रश्‍न होता. नागठाणे (ता. पलूस) येथे एका स्नेहींकडे देशी कोंबडी पालनाचा उद्योग पाहिला. तो आश्वासक वाटून करण्याचा निर्धार केला. त्यासाठी जनावरांच्या रिकाम्या शेडचा वापर केला. सुरुवातीला जळगावहून सातपुडा जातीचे सुमारे एकहजार पक्षी मागवले. त्यांचे चांगले संगोपन केले. दोन महिने सांभाळल्यानंतर पक्षी विक्रीस तयार होतात. यामध्ये नर दीड किलो तर मादीचे सव्वा किलोच्या आसपास वजन भरते. सुरूवातीला अनुभव नव्हता. जास्त पक्षांचा ‘लॉट’ आणल्याने एकदम विक्री निघाली. त्यामुळे अडचण आली. पुढे त्यात सुधारणा केली. दर दोन महिन्याला २०० पक्षांची बॅच असे नियोजन केले. त्यामध्ये देशी वाणांना प्राधान्य दिले. मी दर आठवड्याला इस्लामपूर, पलूस, कासेगाव यासह अनेक आठवडा बाजार फिरतो. नगांवर विक्री होते. प्रति नग २०० रूपयांपासून ४५० रुपयांपर्यंत दर मिळतो. देशी पक्षांना आजही बाजारात चांगली मागणी आहे. पाटील पुढे म्हणाले की एक दिवसाचा पक्षी विकत घेताना तो २३ रूपयांना पडतो. त्याचे योग्य लसीकरणही केले जाते. दोन महिने पक्षी सांभाळताना प्रती पक्षी ११० ते १२० रुपये खर्च येतो. हा व्यवसाय मला फायदेशीर ठरला आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात हा उद्योग विस्तारण्याचा विचार आहे. 
- संताजी पाटील, ८८८८८४८२४३ 

 इस्लामपूर कोंबडी बाजाराची वैशिष्ट्ये 
 बाजारात दर बाजारादिवशी ५० हजारांपासून ते दोन लाख 
 रूपयांपर्यंत उलाढाल होते.
 देशी वाणाला मागणी असल्याने आजही ग्राहक टिकून 
 काळ्या रंगाच्या पक्षांना आखाडीत मोठी मागणी 
 साधारण तीन तासांत संपतो बाजार

मी इस्लामपूरसह जत, आटपाडी, पलूस या ठिकाणांहून पक्षी खरेदी करतो. विशाळगड, वैभववाडी, लांजा व कोल्हापूर जिल्हा परिसरात विक्री करतो. प्रामुख्याने आखाडीच्या वेळी मोठी मागणी असते.  इस्लामपूर बाजार त्या दृष्टीने खरेदी विक्रीसाठी चांगले ठिकाण आहे. 
- जुबेर औटी, कोंबडी व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com