जलसंधारणासह शेती, ग्रामविकासात केंदूरची आघाडी

गणेश कोरे 
गुरुवार, 29 जून 2017

पुणे जिल्ह्यातील केंदूर हे वाड्यावस्तीचे गाव एकेकाळी पिण्याचे व शेतीसाठी अशा दोन्ही दृष्टीने पाणीटंचाई ग्रस्त होते. परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, आमदार, खासदार निधी आदींच्या माध्यमातून झालेल्या विविध जलसंधारण आणि विकासकामांमुळे गावाचे रुपडे पालटू लागले आहे. आराेग्य, शेती, शिक्षण, डेअरी आदी क्षेत्रांतही गावाने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

पुणे जिल्ह्यातील केंदूर हे वाड्यावस्तीचे गाव एकेकाळी पिण्याचे व शेतीसाठी अशा दोन्ही दृष्टीने पाणीटंचाई ग्रस्त होते. परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, आमदार, खासदार निधी आदींच्या माध्यमातून झालेल्या विविध जलसंधारण आणि विकासकामांमुळे गावाचे रुपडे पालटू लागले आहे. आराेग्य, शेती, शिक्षण, डेअरी आदी क्षेत्रांतही गावाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील केंदूर हे (ता. शिरूर) सुमारे १२ वाड्यावस्त्यांचे  पर्जन्यछायेखालील गाव. वर्षानुवर्षे पाण्याच्या समस्येमुळे गावाचा विकास खुंटला हाेता. अत्यल्प पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी देखील पाण्याची वानवा भासायची. ज्वारी, बाजरी अशी मर्यादित पिके घेतली जायची. मात्र ही परिस्थिती बदलायचे स्थानिक प्रशासनाचे मनावर घेतले. ग्रामस्थांची साथ लाभली. हळूहळू गावाने विकासाकडे मार्गक्रमण सुरू केले. 

निधीतून विकासकामांना वेग
विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) गावची सुमारे ८०० एकर जमीन सरकारने अधिग्रहित केली आहे. यामुळे विविध उद्याेग परिसरात उभारत आहेत. उद्याेगांच्या सामाजिक दायित्वातून सुमारे १५ लाखांचा निधी संकलित झाला. त्यातून जिल्हा परिषदेच्या केंदूर, सुक्रेवाडी आणि ठाकरवाडी अशा तीन शाळांसाठी तीन अत्याधुनिक स्वच्छतागृहांची बांधणी करण्यात आली. गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार या याेजनेतून एका कंपनीने जेसीबी यंत्रणा उपलब्ध करून दिली. यंत्र चालविण्यासाठी डिझेलचा खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा असून, कामाचा प्रारंभ नुकताच झाला आहे. 

पाणीपुरवठा याेजना
दहा टक्के लाेकवर्गणीतून २५ लाख रुपये भरून सव्वा दाेन काेटी रुपयांच्या जर्मन अर्थसाह्य याेजनेतून संपूर्ण गाव आणि वाड्या वस्त्यांसाठी पाणीपुरवठा याेजना राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने हे काम हाेत असून याेजना प्रगतिपथावर अाहे. लवकरच संपूर्ण गावाला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा हाेणार आहे.    

गावाला ‘क‘ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा
केंदूरचे ग्रामदैवत केंद्राई माता मंदिर आणि संत कान्हूराज महाराज मंदिराबराेबर गावात श्रीराम, मारुती आणि शंकर यांची मंदिरे आहेत. गावाला अाध्यात्मिक, धार्मिक आणि वारकऱ्यांची परंपरा लाभली आहे. गेल्या ४८ वर्षांपासून संत कान्हूराज महाराजांचा पालखी साेहळा आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला वारी करतो. गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आमदार दिलीप वळसे पाटील, विद्यमान पालकमंत्री गिरीष बापट आणि आमदार बाबूराव पाचर्णे यांनी प्रयत्न केले. त्यातून गावाला २०१६ मध्ये पर्यटन क्षेत्राचा ‘क‘ दर्जा मिळाला. साहजिकच पर्यटन विकासाबराेबर तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये कान्हूराज महाराज मंदिर परिसर सुशाेभीकरण, भक्तनिवास, सभागृह यांची बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या वर्षी १५ लाख तर यंदाच्या वर्षी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.   

वेळ नदीवर १७ बंधारे 
गावच्या हद्दीतील वेळ नदीपात्रात विविध ठिकाणी काेल्हापूर पद्धतीचे १७ बंधारे घालण्यात आले आहेत. यामुळे काेरडवाहू शेतीला पाणी मिळू लागले. तर विहिरींनादेखील पाणी टिकू लागले अाहे. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. ज्वारी, बाजरीसारख्या पारंपरिक पिकांची जागा आता कांदा, बटाटा, भाजीपाला आणि फळबागांबराेबच दुग्ध व्यवसायाने घेतली आहे. 

जलसंधारणासह शेतीचा विकास  
पुणेस्थित अफार्म या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने एका कंपनीच्या सहकार्याने ‘सुनहरा कल’ प्रकल्पांतर्गत गावात जलसंधारणाच्या कामांना २०१३ पासून सुरवात झाली. विविध कामांसाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला हाेता. यामध्ये लाेकसहभागातून सुमारे एक हजार हेक्टरवर जलसंधारणाबराेबर शेतीच्या विकासासाठी प्रयत्न झाले. शेती सुधारणांमध्ये मातीचा पाेत सुधारण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प, हिरवळीच्या खतांच्या वापराची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. जलसंधारणाच्या कामांमुळे गावातील आेढ्या- नाल्यांना सात-आठ महिने पाणी उपलब्ध हाेऊ लागले. विहिरींची पाणीपातळी चार मीटरने वाढली. भाेसुरस्थळ, जांभळा, थिटेमळा आणि पऱ्हाडमळा येथील सुमारे २७५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली तर १७६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. सुमारे ८९ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. 

पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामस्थ या सर्वांच्या प्रयत्नांतून गावातील विकासकामांना चालना मिळाली आहे. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत पर्यटन विकासासाठीही विविध कामे मार्गी लागत आहेत. महिला, बाल, शिक्षण, आराेग्यसेवेबराेबरच शेती आणि पशुसंवर्धनाच्या विविध याेजनांचा लाभ गावातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जलसंधारणाठी विविध कामे झाल्याने पीकपद्धतीतही बदल हाेऊ लागला आहे. 
-  सविता मंगेश गावडे, सरपंच, केंदूर, ९७६३६९०६९९   
 

आमची तीन भावांची सामाईक ५० एकर शेती आहे. आमच्या शिवारात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाच्या वाया जाणाऱ्या पाण्याची साठवणूक झाली. कांदा, बटाटा यासारखी पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले. आमचे कुटुंब दुग्ध व्यवसायात आहे. सुमारे १५ गाई व दोन म्हशी आहेत. दररोज १७० लिटर दूध डेअरीला जाते. पाण्याच्या उपलब्धतेमुळे १५ एकर सीताफळ, सात एकर ऊस, व पाच एकरांवर चारा पिके घेताे. एक शेततळे अाहे. मला कात्रज दूध संघाचा २००६ चा आदर्श दूध उत्पादक, २००८ चा आदर्श गाेपालक पुरस्कार, तर २००८ चा कृषिनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे.     
- बाळासाहेब साकाेरे, ८८८८९०१२९०

जलसंधारण आणि पाणलाेट क्षेत्र विकासकामांमुळे गावातील सिंचनाची व्यवस्था झाली. परिणामी पारंपरिक ज्वारी, बाजरी पिके घेणारे शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले. शेती वर्षातील आठ महिने पिकांखाली येऊ लागली. शेतीमालाला मार्केटिंग आणि प्रक्रियेची जाेड देण्यासाठी गाव आणि वाड्या- वस्त्यांवरील ४५० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २०१५ मध्ये कंपनी स्थापन केली. केंद्राईमाता ॲग्राे प्राेड्यूसर कंपनी असे तिचे नाव आहे. कंपनीकडे सभासदांचे साडेचार लाखांचे समभाग अाहेत. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत १३ लाख ५० हजार रुपयांचे साह्य मिळाले आहे. त्यातून कांदा आणि शेतीमाल प्रतवारी यंत्र, धान्य स्वच्छता यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. कंपनीने नुकताच बंगळूर येथील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने ३५० टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति किलाे एक रुपये अधिकचा दर मिळाला. वाहतूक आणि पॅकिंगचाही खर्च वाचला आहे. कंपनीच्या वतीने कृषी सेवा केंद्र आणि प्रक्रिया उद्याेग उभारण्याचे नियाेजन असल्याचे कंपनीचे अध्यक्ष मंगेश गावडे यांनी सांगितले.  
- मंगेश गावडे- ९८५०७५४३९४