पावसाची भुरभुर...तरी हाती धुपाटणंच

सुदर्शन सुतार
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा विचार करून दोन तालुक्‍यांसाठी एक याप्रमाणे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. कृषी विद्यापीठ, महसूल, विमा कंपनी यांच्या प्रतिनिधीसोबत पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. हा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल.
- शिरीष जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील खरिपाची स्थिती; पाहिजे तेव्हा नाही, आता मात्र पावसाची हजेरी

उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात अगदी सुरवातीलाच पाऊस पडला. मोठ्या जोमात शेतकऱ्यांनी पेरण्याही उरकल्या. तब्बल ९८ टक्‍क्‍यांपर्यंत पेरणी झाली; पण त्यानंतर पावसाने जी पाठ फिरवली. ती आजतागायत कायम राहिली. गेल्या दोन-तीन दिवसांत मात्र पावसाने पुन्हा भुरभुर सुरू केली आहे. पण त्या आधीच करपलेलं सोयाबीन, उडीद, मूग बांधाला पोचलंय. त्यामुळं या पावसाचा उपयोग काय? पुन्हा एकदा आमच्या हाती धुपाटणंच हाय, अशा शब्दांत शेतकरी आपली व्यथा मांडतात.

उस्मानाबाद जिल्ह्यात खरिपामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, मटकी अशी पिके घेतली जातात. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील खरीप अडचणीत आहे. सलगचा दुष्काळ, गारपीट यांसारख्या आपत्तीमुळे ही दोन-तीन वर्षे शेतीच्या दृष्टीने कठीण गेली. पण यंदा पावसाने चांगली सुरवात केल्याने शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला. यंदा काही तरी पिकंल आणि विकंल, या आशेने सोयाबीन, उडीद, मुगाच्या पेरण्या झटक्‍यात उरकल्या. उसनंपासनं, पावणंरावळं करत पेरणीचा मेळ बसवला. पण कसलं काय? पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे पावसाने दडी मारली. तब्बल दोन-अडीच महिने पाऊस गायब झाल्याने पिके करपून गेली. सोयाबीन, उडदाच्या शेंगा पोकळ भरल्या, काही ठिकाणी सोयाबीनची झाडे नुसती हिरवीगार, पण पाण्याअभावी माना टाकलेल्या, तर काही ठिकाणी उडीद, मूग, काळवंडून गेलेलं. जिल्ह्यातील भूम, वाशी, कळंब या तालुक्‍यातील चित्र तर फारच बिकट झाल्याचे दिसते.

कळंब, भूम, वाशी तालुक्‍यात फिरल्यानंतर हेच लक्षात येते. सोयाबीन, उडीद पार करपून गेलं आहे. मुगामध्ये शेंगाच भरल्या नाहीत. बार्शीहून कळंबकडे जाणाऱ्या महामार्गावर येरमाळ्यात रस्त्याकडेला नवनाथ देशमुख आपला मुलगा संदीपसह करपलेला मूग काढत होते. देशमुख यांना स्वतःची केवळ १० गुंठे शेती आहे. त्यामुळे गावातीलच दत्तात्रय बोधले यांची १६ एकर शेती ते बटईने करतात. तब्बल २५ वर्षे ते ही शेती करतात. पण एक-दोनदा तो काय तो फायदा झालेला. त्यानंतर आजतागायत हातात काहीच नाही. यंदाही १० एकर सोयाबीन, एक एकर उडीद, अर्धा एकर मूग केला आहे. सोयाबीनने मान टाकली आहे. उडीद आणि मूगात शेंगाच नाहीत. ते मूग काढत होते, पण केवळ ४ ते ५ शेरापर्यंत मूगाच्या शेंगा त्यांच्य हातात पडल्या. कळंब तालुक्‍यातील येरमाळा, मस्सा, परतापुर, आंदोरा हा सगळा भाग आणि शिवार पुरतं काळवंडून गेले.

८० हजारांचा खर्च निघणार कसा?
सोयाबीनला आतापर्यत खत, फवारणी असा ६०-७० हजाराचा खर्च झाला. उडीद, मूग हा सगळा खर्च धरल्यास ८० हजारांच्या घरात जातोय, सोयाबीन, उडीद तर केव्हाच गेलंच, एका पाव्हण्याकडंनं थोडं पैसं आणल्यात, त्यांचं कसं फेडायचं? असा प्रश्‍न नवनाथ देशमुख करतात.

नवरा, बायको मजुरीवर
कळंबमधून वाशी आणि पुढे पार्डीमार्गे भूम तालुक्‍याकडे जाताना हाडोंग्री हे छोटंस गाव लागतं. डोंगराळ, माळरान परिसर सगळा घाटमाथ्याचा. घाटातील अवघड रस्ते पार करून हाडोग्रीमध्ये प्रवेश केला. गावाच्या अलीकडेच लक्ष्मण वाघमारे हे शेतकरी आपल्या जळालेल्या सोयाबीन, उडदाच्या शेताकडे बघत बसल्याचे चित्र दिसले. त्यांना बोलतं केलं. लक्ष्मण वाघमारे यांना एक मुलगा, दोन मुली आहेत. मुली दिल्या घरी गेल्या, मुलगा शिकतोय. लक्ष्मण हे पत्नीसह शेतात राबतात. साडेसहा एकर शेतीत तीन एकरवर सोयाबीन, दोन एकरवर उडीद केलं आहे. सोयाबीन नुसतंच हिरवं दिसतंय, पण त्यात काही जीव राहिला नाही. उडीद तर पुरतं काळवंडून गेलं आहे. ते म्हणाले, ‘‘कि दरवर्षी हे असंच चाललंय, आम्ही जगायचं कसं, हाच प्रश्‍न हाय, स्टेट बॅंकेचं ३० हजाराचं कर्ज हाय. आता त्या कर्जमाफीचा अर्ज भरलाय, पण काय होतंय कुणास ठाऊक? आवंदा पायली-दोन पायलीही धान व्हणार न्हाई. मग मी इकणार काय आणि घरचं भागणार काय? सध्या मिळंल तिथं आम्ही नवरा-बायको मजुरीवर जातोय, मग अधे-मध्ये येऊन शेताकडं बघत बसतु. काय करणार?’’ असं सांगून ते थांबतात. करपलेल्या सोयाबीन, उडदाप्रमाणेच माणसाचे चेहरेही आता कावरीबावरी झालेली दिसतायेत, रोज ढगाकडे बघतायेत. 

पावसाची भुरभुर, पण...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल झालेला आहे. शनिवारी (ता.१९) रात्रीपासून सुरू झालेली पावसाची भुरभुर रविवारी (ता.२०) सकाळपर्यंत सुरूच होती. तयात फारसा जोर नव्हता, पण या एकाच रात्रीत उस्मानाबाद जिल्ह्यात ६५.१० मिलिमीटर इतका पाऊस झाला. पण आता पाऊस पडून खरिपाला काहीच उपयोग नाही. या आधीच सगळी पिके करपून, काळवंडून गेली आहेत.

प्यायला पाणी नाही, शेताला कुठणं आणणार
शेतकरी पोपट चव्हाण यांचीही स्थिती याहून वेगळी नाही. त्यांच्याकडेही ४ एकर क्षेत्रापैकी २ एकरवर सोयाबीन आहे. सोयाबीनने पंधरवडयापूर्वीच माना टाकल्या आहेत. आता ना शेंगा, ना टरफलं, सगळं जळून गेलं आहे. अहो, प्यायला पाणी नाही, शेताला कुठलं देऊ, शेतात येऊन तर काय करु. पण बघितल्याशिवाय बी राहवत नाही, असं शेतीवरचं प्रेम दाखवताना आर्थिक चणचण कशी चालू आहे, हे त्यांनी मांडलं.

हाटेलात कामाला जावं म्हणतोय...
नवनाथ यांचा मुलगा संदीप हा टेलरिंगचं काम करतो. शेती बघत आपला व्यवसाय सांभाळतो. दरवर्षी निसर्ग असं करतोय, आम्ही काय करावं कळंतच नाही, यंदा तर खर्च अफाट केला. आता हे पैसं फेडायचं, आता हाटेलात कामाला जावं म्हणतोय, अशी व्यथा संदीप सांगतात.