नियोजनबद्ध पीकपद्धतीच्या प्रयोगातून सक्षम उत्पन्न

डॉ. टी. एस. मोटे
बुधवार, 21 जून 2017

नांदेड जिल्ह्यात बितनाळ येथील गंगाधर मुकदमे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. पाण्याची उपलब्धता चांगली असली, की विविध प्रयोगांना चालना मिळते. मागील वर्षी त्यांनी खरिपात सोयाबीन, रब्बीत धना व उन्हाळ्यात कलिंगड अशी पिके ३८ गुंठ्यांत घेतली. तीनही पिकांचे पद्धतशीर नियोजन व व्यवस्थापन केल्यामुळे उत्पादन चांगले घेता आलेच, शिवाय अर्थकारणही सक्षम करता आले. 
 

नांदेड जिल्ह्यात बितनाळ येथील गंगाधर मुकदमे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. पाण्याची उपलब्धता चांगली असली, की विविध प्रयोगांना चालना मिळते. मागील वर्षी त्यांनी खरिपात सोयाबीन, रब्बीत धना व उन्हाळ्यात कलिंगड अशी पिके ३८ गुंठ्यांत घेतली. तीनही पिकांचे पद्धतशीर नियोजन व व्यवस्थापन केल्यामुळे उत्पादन चांगले घेता आलेच, शिवाय अर्थकारणही सक्षम करता आले. 
 

नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातील बितनाळ (जि. नांदेड) येथील गंगाधर दत्तराम मुकदमे यांची एकत्रित कुटुंबाची २३ एकर शेती आहे. ते जबाबदारीने ही शेती पाहतात. त्यांची दोन मुले देखील त्यांना शेतीत मदत करतात. पाऊस चांगला असेल तर २३ एकरांपैकी १८ एकर शेती दोन कूपनलिकांवर बारमाही भिजते. अलीकडील काळात दुष्काळाशी देखील त्यांना सामना करावा लागला आहे. गंगाधर कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके घेतात. मात्र पाणी चांगल्या प्रकारे असेल तरच विविध पिकांचे प्रयोग करणे त्यांना शक्य होते. मागील वर्षी ३८ गुंठ्यांत त्यांनी वर्षभरात तीन वेगवेगळ्या पिकांचे म्हणजे खरिपात सोयाबीन, रब्बीत धना व उन्हाळ्यात कलिंगड असे पद्धतशीर नियोजन केले व ते यशस्वी देखील केले. 

पीक पद्धतीचे नियोजन

खरिपात सोयाबीन
मागील वर्षी जूनमध्ये जेएस ३३५ या सोयाबीन वाणाची पेरणी 
केली. ३८ गुंठ्यांत ३० किलो बियाणे पेरले. त्या वेळी १०-२६-२६ हे ५० किलो, युरिया २० किलो व गंधक ५ किलो अशी खतांची मात्रा दिली. पेरणीनंतर १८ व्या दिवशी तणनाशक फवारले. त्यानंतर दोन कोळपण्या करून तणनियंत्रण केले. एकूण खर्च १२ हजार ८६० रुपये आला. 

३८ गुंठ्यांतून १४ क्विंटल सोयाबीन मिळाले, ते २६०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विकले. त्यापासून खर्च वजा जाता २३ हजार ५४० रुपये हाती पडले. 

रब्बीत धना 
खरिपातील सोयाबीन काढल्यानंतर हरभरा पिकाचा पर्याय होता. मात्र, त्या वर्षी पाऊस चांगला होता. हरभरा जास्त होऊन दर कदाचित कमी होतील असे वाटले. त्यामुळे कमी क्षेत्रात घेतले जाणारे धना पीक निवडले. त्याच ३८ गुंठ्यांत ऑक्टोबरमध्ये धना लावला. सोयाबीन काढल्यानंतर कडक झालेले रान प्रथम तिफणीने फणून घेतले. एक मोगडणी केली व दुसऱ्या दिवशी पेरणी केली. 

पेरणीवेळी जमिनीत भरपूर ओल असावी लागते. मागील वर्षी ती निश्चित होती. पेरणीअाधी बियाणे कपड्यात बांधून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी धने बांधलेला कपडा बाहेर काढून पाणी निथळू दिले. त्यानंतर सावलीत सुकवले. कार्बेन्डाझीमची बीजप्रक्रिया करून पेरणी केली. १० किलो बियाणे लागले. पेरणीनंतर ३८ व्या दिवशी पाण्याची पाळी दिली. पेरणीनंतर १० व्या दिवशी वाढवर्धक, तसेच बुरशीनाशकाची फवारणी केली. त्यानंतरही वाढीसाठी व किडी- रोग नियंत्रणासाठी गरजेनुसार रसायनांचा वापर केला.  धने पक्व झाल्यानंतर ९० व्या दिवशी काढणी केली. काढलेले धने शेतातच दोन दिवस सुकवले. त्यानंतर ट्रॅक्टरचलित मळणी यंत्राद्वारे मळणी केली. ३८ गुंठ्यांत ८४० किलो उत्पादन मिळाले. प्रतिक्विंटल ६२५० रुपये दरानुसार साडे ५२ हजार रुपये उत्पन्न मिळाले. खर्च ८८४५ रुपये आला. निव्वळ उत्पन्न ४३ हजार ६५५ रुपये मिळाले. 

उन्हाळ्यात कलिंगड 
धना पिकाची काढणी झाल्यानंतर २० फेब्रुवारी २०१७ च्या दरम्यान कलिंगडाची (टरबूज) लागवड केली. जमिनीची चांगली मशागत करून प्रत्येकी पाच फुटांवर बेड घेतले. बेडवर ठिबक लॅटरल अंथरण्यात आल्या. बेडवर त्यानंतर २० मजुरांच्या साहाय्याने पॉलिमल्चिंग अंथरले. साडेसहा बंडल पेपर लागला. बेड तयार करताना २०० किलो सेंद्रिय खत वापरले. 
पॉली ट्रे व कोकोपीटच्या मदतीने सुमारे ६५०० रोपे तयार केली. ती १० दिवसांची झाल्यानंतर दोन रोपांमध्ये सव्वा फुटाचे अंतर ठेवून झिगझॅग  पद्धतीने लागवड केली. चार पायल्या चुरमुरे व गूळ यांचे द्रावण करून त्यात कीटकनाशक मिसळण्यात आले. अशा २५ ते ३० लाह्या प्रत्येक रोपाजवळ टाकण्यात आल्या. ठिबकद्वारे खत व्यवस्थापन केले.

समाधानकारक उत्पादन 
एकूण उत्पादन खर्च ५१ हजार १३५ रुपये आला. लागवडीच्या सुमारे ६२ दिवसांनी काढणी केली. ३८ गुंठ्यांत विक्रीयोग्य २४ टन उत्पादन मिळाले. त्यास किलोला साडेआठ रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता एक लाख ५२ हजार ८६५ रुपये उत्पन्न मिळाले.

आश्वासक प्रयोग 
अशा रीतीने मागील वर्षी ३८ गुंठे क्षेत्रात एका वर्षात तीन पिके गंगाधर यांनी नियोजनपूर्वक घेतली.
त्यातून समाधानकारक नफा मिळवला. सोयाबीन, धने व कलिंगड अशा पिकांसाठी त्यांना अनुक्रमे १००, ९० व ६० दिवस असे एकूण २४० दिवस लागले. पाण्याचे नियोजनही चांगल्या प्रकारे झाले हे विशेष.

प्रयोगशील शेतकरी आले एकत्र   
आपली शेती अधिकाधिक प्रगतिशील व्हावी यादृष्टीने उमरी तालुक्यातील काही शेतकरी एकत्र आले. त्यांनी हायटेक शेतकरी गटाची स्थापना केली आहे. त्यात १७ सदस्य आहेत. गंगाधरदेखील गटात सामील आहेत. अत्यंत अभ्यासू असलेले हे शेतकरी शास्रीय दृष्टिकोन समोर ठेवून नेहमी शेती करीत असतात. एक एकर क्षेत्रावर त्यांनी कृषी विभागाच्या साह्याने शेडनेटही घेतले आहे. त्यात काकडीचे पीक घेतले आहे. पिकांच्या वेगवेगळ्या जाती, विविध कीडनाशके, खते, त्यांचा वापर याबाबत त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान आहे. उमरी तालुक्यातील अनेक शेतकरी गटातील सदस्यांचा सल्ला घेतात. प्रत्येक पिकाला किती खर्च आला, कोणकोणती कामे कोणत्या वेळी केली याचे टिपण ते नियमित ठेवतात. त्यामुळे फायदा झाला की तोटा, हे ते छातीठोकपणे सांगू शकतात.

पाणी नियोजन 
सुमारे २० एकरांवर गंगाधर यांनी सिंचनाची चांगली सोय केली आहे. मात्र दुष्काळ, उन्हाचे चटके सोसावे लागतातच. तरीही दोन- चार एकरांना तरी पुरेसे होईल इतक्या पाण्याची सोय अधिक चांगल्या प्रकारे केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी दोन कूपनलिका घेतल्या. त्यांना चांगले पाणी लागले आहे.  

मार्गदर्शकाच्या भूमिकेत गंगाधर
नांदेड आकाशवाणी केंद्राच्या शेतीविषयक कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी गंगाधर यांना आमंत्रित करण्यात आले होते. शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात.