सोयाबीन, हरभऱ्यात मर्यादित भाववाढीचे संकेत

सुरेश मंत्री 
सोमवार, 17 जुलै 2017

सोयाबीन आणि हरभरा या दोन्ही शेतमालांचे दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असली तरी खूप मोठ्या तेजीची अपेक्षा नाही. त्यामुळे अपेक्षित भावपातळी आली की माल विकून मोकळे होणे, हा निर्णय योग्य ठरेल. 

सोयाबीन आणि हरभरा या दोन्ही शेतमालांचे दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असली तरी खूप मोठ्या तेजीची अपेक्षा नाही. त्यामुळे अपेक्षित भावपातळी आली की माल विकून मोकळे होणे, हा निर्णय योग्य ठरेल. 

सोयाबीन
सोयाबीनमध्ये सध्या दर स्थिर आहेत. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३००० रुपये क्विंटल या पातळीवर व्यवहार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये हवामान काही प्रमाणात प्रतिकूल झाले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या किमतीला थोडा आधार मिळण्याची शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. येत्या आठवड्यात त्यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलावरील आयातशुल्क वाढले तर आयातीवर परिणाम होऊन सोयातेलाची मागणी वाढेल आणि सोयाबीनचे दर वाढण्यास त्याची मदत होईल. पण अमेरिकेतील हवामान आणि खाद्यतेल आयातशुल्कात वाढ हे दोन्ही घटक गृहित धरले तरी सोयाबीनचे बाजारभाव १०० ते १५० रुपयांपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता अंधुक आहे. त्यामुळे अपेक्षित भावपातळीला मार्केट आले की सोयाबीनचा साठा विक्रीस काढणे फायद्याचे ठरेल. 

हरभरा
वायदे बाजारात हरभऱ्याच्या व्यवहारांवर घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय झाल्यामुळे वायदे सुरू झाले आहेत. या वायद्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ९१ कोटींची उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. सुमारे ४७ शेतकरी उत्पादक संघांच्या माध्यमातून एकूण ४३ हजार शेतकरी वायद्यांमध्ये सहभागी झाले.

हरभऱ्याच्या वायदे बाजारावर गेल्या वर्षी बंदी येण्यापूर्वी मध्य प्रदेशातील सुमारे २५०० शेतकऱ्यांनी वायद्यांमध्ये व्यवहार केले होते. यंदा हरभरा उत्पादनात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर वायदे बाजार पुन्हा सुरू झाल्यामुळे भावातील घसरणीस काही प्रमाणात ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तसेच यंदा देशात तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर भाव कोसळल्यामुळे सगळ्याच कडधान्यांच्या आयातीवर बंधने घालण्याची आणि निर्यातीवरची बंदी उठवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. कडधान्यांच्या आयातीचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय झाला आणि निर्यात सुरू झाली तर हरभऱ्यासकट सर्वच कडधान्यांचे दर वाढतील. सध्या अकोला मार्केटला हरभऱ्याचा दर ५३०० रुपये क्विंटल आहे. तर दिल्ली मार्केटला ५४०० ते ५४५० रुपये क्विंटलने व्यवहार सुरू आहेत. सध्याची परिस्थिती पाहता २०० ते २५० रुपयांनी बाजार वाढू शकतो, परंतु मोठ्या तेजीची सध्या तरी चिन्हे नाहीत.           
(लेखक शेतमाल बाजार विश्लेषक आहेत.)