जलसंधारणाच्या कामांतून बोहाळीचा कायापालट

जलसंधारणाच्या कामांतून बोहाळीचा कायापालट

शासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमाला लोकसहभाग व सहकारी संस्थेचे पाठबळ मिळाले तर गावचे चित्र पालटले जाते. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्‍यातील बोहाळी गावाला भेट दिल्यानंतर त्याची प्रचिती येते. येथील गाव ओढ्यावरील १३ बंधाऱ्यांच्या कामांमुळे आज हजारो एकर क्षेत्रावरील डाळिंब, ॲपल बेर आणि उसाची शेती बहरली आहे. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून असणारे हे गाव आता बंधाऱ्यातील संरक्षित पाण्यामुळे स्वावलंबी झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी येऊ लागली आहे. परिणामी गावच्या विकासाचे चित्रच पालटून गेले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मिरज लोहमार्गालगत पंढरपूरपासून सुमारे बारा किलोमीटरवर दक्षिणेस बोहाळी हे गाव आहे. साधारण तीन हजार लोकसंख्येच्या या गावचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. अलीकडे सततच्या दुष्काळामुळे शेतीचे अर्थकारण तोट्यात आले आहे. त्याची कारणे ग्रामस्थ, स्थानिक सहकारी संस्था, कृषी विभाग आदींच्या माध्यमातून शोधण्यात आली. शेती व्यवसायाला कलाटणी देऊ शकणाऱ्या पाणलोट विकास कार्यक्रमाची आखणी करण्याचे त्यातून ठरले. 

सात किलोमीटरच्या ओढ्यावर १३ बंधारे 
बोहाळीच्या ग्रामस्थांनी प्रामुख्याने पाणलोट विकास कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याचबरोबर श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. गावच्या मध्यावरून छोटासा ओढा गेला आहे. त्यातून पावसाळ्यातील पाणी वाहून जात होते. याच ओढ्यावर पाणलोट प्रकल्प व पांडुरंग साखर कारखाना यांच्या माध्यमातून बंधारे बांधण्याची योजना राबवली गेली. तत्कालीन सरपंच लक्ष्मण कसगावडे यांनी ग्रामस्थांना यात सोबत घेतले. सन २०१३ मध्ये १३ बंधाऱ्यांतील गाळ काढून सात किलोमीटर अंतर ओढ्याचे खोली व रुंदीकरणाचे काम झाले. त्यानंतर शेतीचा पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत झाली. बंधाऱ्यातील पाण्यामुळे गावचा शिवार हिरवागार झाला. ऊस क्षेत्रात वाढ झाली. त्याचा फायदा कारखान्यालादेखील झाला. 

डाळिंब, ॲपल बोरला फायदा 
बोहाळी गावचे एकूण सुमारे एक हजार ४५२ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी आजमितीस ८०० हेक्‍टर क्षेत्रावर डाळिंबाचे पीक असावे. शिवाय ॲपल बोर पिकाची लागवडही चांगली झाली आहे. सुमारे १०० हेक्‍टर क्षेत्रावर ऊस घेतला जातो. याशिवाय पाणी उपलब्धतेनुसार अन्य पिके घेतली जातात. तीन वर्षांपूर्वी एकूण क्षेत्रापैकी २० ते २५ टक्के क्षेत्रावरच पिके घेतली जायची. बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर आज ७० टक्के क्षेत्र तरी बागायती झाले आहे. त्यामध्ये डाळिंब पिकाचे सर्वाधिक क्षेत्र वाढले आहे.

गावचे उत्पन्न वाढते आहे 
शिवारात पाणी उपलब्ध झाल्यामुळे डाळिंब तसेच ॲपल बेर उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. ऊस उत्पादकांनाही उत्पन्नवाढीची संधी चालून आली आहे. काहींनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादन सुरू केले आहे. चार दूध केंद्रांमधून दररोज तीन हजार लिटर दूध संकलित केले जाते. दूध विक्रीतून गावात दररोज सहा आकडी रक्कम येते. एकूण शेती उत्पन्नातून गावात दरवर्षी काही कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.  

टॅंकरमुक्त गाव..
तीन वर्षांपूर्वी गावात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. आज गाव टॅंकरमुक्त झाले आहे. तीन वर्षांत एकदाही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही गावाने स्वयंपूर्णतः मिळविली.

गाव बदलतेय 
एकत्रित कामांचा परिणाम म्हणून गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीत नवीन साधनांचा वापर सुरू केला आहे. विक्री व्यवस्थापनातही शेतकरी तरबेज झाले आहेत. जुन्या घरांच्या जागी आकर्षक घरे वा बंगले उभे राहिले आहेत. गावकऱ्यांचे राहणीमान उंचावत आहे. येथील मुले इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात. लोकसहभागातून साधलेला विकास पाहण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह तसेच अन्य काही तज्ज्ञांनी गावाला भेट देत कामांचे कौतुक केले आहे.

हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार
लोकसहभागातून पाणलोट विकास कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर येथील गावकऱ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर लोकसहभागातून अनेक कामे झाली. यामध्ये ग्रामदैवत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार झाला. लोकवर्गणीतून सुमारे दहा लाख रुपये जमा करून भव्य हनुमान मंदिर उभारण्यात आले. मंदिरात भजन, प्रवचन असे कार्यक्रम होतात. त्याद्वारे तरुणांमधील व्यसनाधीनता कमी होण्यास मदत झाली आहे. 

विहिरींच्या पाणीपातळीत वाढ
बंधाऱ्याच्या कामामुळे तीन किलोमीटर अंतर परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्याचा संपूर्ण बोहाळी ग्रामस्थांना फायदा झाला. या वर्षी या भागात जेमतेम पाऊस झाला. मात्र पावसाचे पाणी बंधाऱ्यात अडवल्यामुळे शेतीची परिस्थिती समाधानकारक राहिली. आजही परिसरातील विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी समाधानकारक आहे.  

बोहाळी गाव विकासातील वैशिष्ट्ये 
    विकासाच्या वाटेवर असलेल्या बोहाळीच्या गावकऱ्यांनी शेतीबरोबरच गावच्या विकासाकडेदेखील लक्ष दिले आहे. 
    मुलांना चांगल्या दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी लोकसहभागातून ई-लर्निंग स्कूलचा उपक्रम 
    संगणक खरेदी करून शाळेला भेट दिले. शाळेचे सुशोभीकरण झाले. 
    गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची सुविधा. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत
    ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे. 
    बंधाऱ्यातील गाळ काढून खोली-रुंदीकरण केल्याने शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न सुटला. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या येथील शेतकऱ्यांना मार्च-एप्रिलपर्यंत पुरेल इतके पाणी बंधाऱ्यात शिल्लक आहे. 
    गावाने दुष्काळमुक्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल अनेकांसाठी आश्‍वासक  

शासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कारखान्याने जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च केला. सलग दोन महिने काम करून १३ बंधारे गाळमुक्त केले. बोहाळीप्रमाणेच कारखान्याच्या माध्यमातून बाभूळगाव, शेवती व खर्डी येथेही अशाच प्रकारचे काम केले आहे. चारही गावांत पाणीटंचाईची समस्या कमी झाली आहे. 
- यशवंत कुलकर्णी, ९९२३९१६१०० कार्यकारी संचालक, पांडुरंग साखर कारखाना, श्रीपूर 

साखर कारखाना, कृषी विभाग, जिल्हा परिषद व ग्रामस्थ यांच्या एकीतून पाणलोटाची कामे यशस्वी झाली. तीन वर्षांपासून गाव टॅंकरमुक्त झाले आहे. 
- कलावती कुसुमडे, ८२७५०२५२२, सरपंच, बोहाळी  

येथील शेतकरी कायम दुष्काळाशी सामना करीत शेती व्यवसाय करीत होते. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. सर्व बंधारे गाळमुक्त केल्यानंतर गाव दुष्काळमुक्त झाले आहे. शेतीला पाणी उपलब्ध झाल्यापासून गावच्या शेती उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. त्यातून गावच्या विकासाला चालना मिळाली आहे.
- सुधाकर कसगावडे, ९९२१८२२२८३, सदस्य, ग्रामपंचायत 

गावात बंधारे होण्यापूर्वी रब्बी पीक घ्यायचो. शेतीतून फारसे उत्पन्न हाती येत नसल्याने कर्ज वाढले होते. पाणलोट विकास कार्यक्रमानंतर माझ्या दहा एकर शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे. आजदेखील बंधाऱ्यात पाणी असल्यामुळे डाळिंब, बोर आणि ऊस घेत आहे. दोन वर्षांपासून शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. 
- नितीन कुसुमडे, शेतकरी, बोहाळी 

तीन एकर शेतीत डाळिंबाचे पीक आहे. पूर्वी शेती पडीक होती. उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळू लागल्यापासून डाळिंब बागेतून दरवर्षी एकरी सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. हातात पैसे आल्यामुळे प्रगतीला वाव मिळाला आहे. मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करणे शक्‍य झाले. 
- शिवाजी कुसुमडे, शेतकरी, बोहाळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com