पाणीपुरवठा, शिक्षण, पर्यावरणावर भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मी शिर्डी येथे झालेल्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत सहभागी झालो होतो. ही महापरिषद ग्रामविकासाची प्रेरणा आणि दिशा देणारीच ठरली.

मी शिर्डी येथे झालेल्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत सहभागी झालो होतो. ही महापरिषद ग्रामविकासाची प्रेरणा आणि दिशा देणारीच ठरली.

महापरिषदेत राज्यभरातील अनेक चांगल्या उपक्रमशील सरपंचांची ओळख झाली. ग्रामविकासासंदर्भातील कल्पनांची देवाणघेवाण झाली. विकासाच्या संदर्भातील अनेक शंकांचे निरसन झाले. परिषदेनंतर गावात आल्यानंतर विकासाचा नीट आराखडा केला. त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली.
सरपंच महापरिषदेतून मी माझ्या गावाचा पर्यावरण समतोल साधण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात सुमारे ५०० विविध जातींच्या झाडांची लागवड केली. यामध्ये प्रामुख्याने विविध फळझाडांचा समावेश आहे. आंब्याच्या केसर, राजापुरी या जातीची कलमे लावली आहेत. 

गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न महत्त्वाचा होता. ही समस्या सोडविण्यासाठी  ग्रामपंचायत सदस्यांच्या सहभागाने जलशुद्धीकरण प्रकल्प तयार केला. ना नफा ना तोटा या तत्त्वावर नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून  शंभर टक्के लाभार्थींना शौचालये बांधून दिली. प्रत्येक घरात आता शौचालय आहे. गावांतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या मदतीने गावाच्या सर्व भागात एलईडी बल्ब बसविले.  गावातील अनुसूचित जाती जमातींच्या लोकांसाठी पंतप्रधान घरकुल योजना राबवून अनेक लोकांना योजनेचा लाभ करून दिला. गावातील दिव्यांग लोकांसाठी श्रवण यंत्रे, टेबल, खुर्ची, सायकल, काठी, चष्मे आदी साहित्यांचे वितरण केले. 

गावाचे ग्रामदैवत हनुमान मंदिर, लक्ष्मीमाता मंदिराचे काम पूर्ण झाले असून सावता महाराज मंदिराचे काम प्रगतिपथावर आहे. गावातील व्यायामशाळेत अद्ययावत साहित्य उपलब्ध करून दिले. गावाला अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गाव तळे तयार केले. 

गावात नशाबंदी मंच स्थापन केला. त्यामुळे गावात गुटखाबंदी, दारूबंदी करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिवाररस्ते तयार करून घेतले. ‘स्मार्ट व्हिलेज`च्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकले आहे. त्यासाठी सरपंच महापरिषदेतील मार्गदर्शनाचा चांगला उपयोग झाला. ग्रामविकासाच्या नवनवीन कल्पनांची शिदोरी मला मिळाली.

शाळा झाली डिजिटल 
गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा लोकसहभागातून 
डिजिटल केली. शाळेची रंगरंगोटी, बगीचा, सुसज्ज क्रीडांगण, आमदार निधीतून संगणक, जिल्हा परिषदेच्या निधीतून शाळेच्या अंगणात पेव्हर ब्लॉक बसविले. शाळेतील गरीब मुलांना दप्तर, गणवेश व शालेय साहित्याचे वाटप केले. ग्रामीण भागातील विविध सुविधा पुरविणारी 
शाळा ठरल्याने आएएसओ-२००० मानांकनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. 

स्मशानभूमीत तयार केला बगीचा 
गावातील स्मशानभूमीभोवतीच्या एक एकराच्या परिसरात पहिल्यांदा 
झाडे लावण्याचा मी निर्णय घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने अॅपल बोर, पेरू यासारखी फळझाडे लावली. मागील वर्षी ॲपल बेरला बहर येऊन चांगली फळधारणा झाली. या फळांची बाजारात विक्री करण्यात आली. त्या उत्पन्नातून पुन्हा स्मशानभूमीचे बांधकाम व देखरेख करण्यासाठी खर्च करण्यात आला.