कापसाला जीवदान मिळेल का?

मनीष डागा
सोमवार, 17 जुलै 2017

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार पश्चिम-मध्य भारतात येत्या ३-४ दिवसांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. कापसाच्या पिकासाठी ते जीवदान ठरेल. कारण देशातील ७० टक्के कापसाची लागवड याच भागांत होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगना, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील अनेक भागांत १० जून ते १० जुलै या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. त्यामुळे पेरण्या अडचणीत आल्या आहेत. परंतु, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर पिकांना असणारा धोका टळणार आहे. 

देशात कापसाची स्थानिक बाजारपेठ स्थिर आहे. गोदामांतील चांगल्या प्रतीच्या मालाला मागणी टिकून आहे. निर्यातदार तूर्तास शांत आहेत. मिल्स आपल्या गरजेच्या हिशोबाने खरेदी करत आहेत. टी. टी. लिमिटेड मिलचे व्यवस्थापकीय संचालक संजय जैन यांच्या म्हणण्यानुसार स्पिनिंग मिल्सची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ``मार्चनंतर सूत भाव सातत्याने घटत आहेत. त्यातच जीएसटी लागू झाल्यानंतर दरात आणखी घसरण झाली आहे. दुसऱ्या बाजूला कापसाचे भाव मात्र त्या प्रमाणात कमी झाले नाहीत. चांगल्या गुणवत्तेचा कापूस अजूनही महागच आहे. अशा परिस्थितीत उत्पादनात कपात करण्याखेरीज दुसरा पर्याय दिसत नाही.``

हजर बाजारात गुजरात शंकर-६ वाणाचा कापूस ४१,३०० ते ४३,२०० रुपयांना विकला जात आहे. महाराष्ट्रात ४२,००० ते ४४,५०० इतका दर आहे. तेलंगनात ४४,००० ते ४४,५०० इतकी भावपातळी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याकडील बहुतांश माल विकला आहे. चांगल्या-वाईट गुणवत्तेचा सगळा मिळून २० ते २५ लाख गाठी कापूस स्टॉक असल्याचा अंदाज आहे. इतका कमी स्टॉक स्पिनिंग मिलसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.   

जागतिक कापूस बाजारात नरमाई आहे. अमेरिकी आयसीई वायदेबाजारात दर आणखी खालावण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानात यंदाच्या वर्षी कापूस लागवडीत घट आली आहे. यंदा तेथे ६७ ते ७८ लाख एकरांत कापसाचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षी ७६.८ लाख एकरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा लागवड घटल्यामुळे १४० लाख काठी कापूस उत्पादनाचे लक्ष्य गाठणे पाकिस्तानसाठी अवघड ठरणार आहे. पाकिस्तानकडून मागणी वाढली, तर भारतातील कापूस निर्यातीसाठी ती सकारात्मक बाब ठरेल.

(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून `कॉटन गुरू`चे प्रमुख आहेत.)