...तर मग आम्ही न्याय कोठे मागायचा?

विनोद इंगोले
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

राजानं मारलं अन् पावसानं झोडपलं तर दाद कुठी मागायची, असंच आमचं झालं पाहा! गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ भोगला अन् या वर्षी चांगल्या हंगामाची अपेक्षा असताना कीड-रोगानं पीक खाल्लं. तुम्हीच सांगा आम्ही कायच्या भरवशावर जगावं मंग?, असा मन सन्न करणारा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर येथील बिकट परिस्थितीची दाहकता डोळ्यांसमोर येते. पाऊस आणि कीड-रोगांच्या विळख्यात यवतमाळ जिल्ह्यातील खरीप अडकला आहे.

सोयाबीनला पोखरले कीड- रोगाने
खोडमाशी, उंटअळी, चक्रीभुंगा, तंबाखू पाने खाणारी अळी अशा अनेक प्रकारच्या किडींनी जिल्ह्यातील सोयाबीन पोखरला आहे. २००९-१० मध्येदेखील तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सर्वदूर झाला होता. लष्करी अळी ही धान (भात) पिकावर येते. परंतु लष्करी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर होतो, असे सांगितले जाते. हा समज चुकीचा असल्याची माहिती कृषी विद्यापीठ तज्ज्ञांकडून देण्यात आली. पाण्याचा ताण बसल्यामुळे फुलाचे रूपांतर शेंगांमध्ये होऊ शकले नाही. परिणामी या वर्षीचा संपूर्ण हंगामच गेल्यात जमा आहे.

सोयाबीन निघाले वांझोटे
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेल्या २५ ते ४८ टक्‍केच सोयबीन बियाण्यात उगवणशक्‍ती असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे. शेतकऱ्यांनी त्यानंतर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे नुकसानभरपाईची मागणी केली; परंतु महाबीजकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस त्रस्त शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. सुरवातीला उगवण न झाल्यामुळे दुबार पेरणीवर करावा लागलेला खर्च आणि त्यानंतर आता न्यायालयीन कामावर होणारा खर्च अशी दुहेरी मार आम्हाला दुष्काळी वर्षात सोसावी लागत असल्याची प्रतिक्रिया कलगाव (ता. दिग्रस) येथील जाकिर सौदागर या शेतकऱ्यांने दिली. कलगाव, महागाव या गावातील ५३ शेतकऱ्यांनी बियाण्याच्या उगवणशक्‍तीविषयक तक्रारी केल्या आहेत.  

पांढरकवडा परिसरात राबविले कॅम्पेन
खोडमाशीच्या नियंत्रणासाठी गेल्या पंधरवाड्यापूर्वी कृषी विभागाच्या वतीने पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुुते यांच्या मार्गदर्शनात जागरूकता मोहीम राबविण्यात आली. शेतकऱ्यांना कीड-रोगांच्या नियंत्रणासाठीचे उपचार या वेळी सांगण्यात आले. परंतु त्यानंतर पावसाने खंड दिल्याने परिस्थिती शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेल्याचे सांगितले जाते. 

मंगी येथेही बियाण्यात फसवणूक
मंगी (ता. पांढरकवडा) येथील शेतकऱ्यांनी पुण्यातील एका कंपनीद्वारे उत्पादित सोयाबीन बियाण्याची लागवड केली. कंपनीद्वारे हे रिसर्च वाण विदर्भात प्रसारित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला फूलधारणाच झाली नाही. परिणामी या शेतकऱ्यांनी बियाण्याविषयक सुरवातीला तालुका आणि त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडे तक्रारी केल्या. शेतकऱ्यांच्या या तक्रारीची दखल घेत उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. सी. यू. पाटील, केव्हीके तज्ज्ञांनी सोमवारी (ता. ४ ऑगस्ट) या प्रक्षेत्राला भेट देत पिकाची पाहणी केली. या वेळी या सोयाबीनला फूल आणि शेंगधारणाच झाली नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले. पाहणीअंती सर्व तज्ज्ञांशी चर्चा करून अहवाल शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचे समिती सदस्यांकडून सांगण्यात आले.

कापूस, सोयाबीनचे क्षेत्र घटले 
जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात सोयाबीन क्षेत्र २ लाख ६० हजार ३७० हेक्‍टर होते. त्यात या वर्षी पाच हजार हेक्‍टरची घट झाली आहे. २ लाख ५४ हजार ५११ हेक्‍टरवरच सोयाबीन क्षेत्र मर्यादित राहिले. कापूस पीक २०१५-१६ या वर्षात ४ लाख ७२ हजार ००२ हेक्‍टर होते. या वर्षी कापूस लागवड क्षेत्रात १ हजार ६८७ हेक्‍टरची कमी नोंदविण्यात आली आहे. ४ लाख ७० हजार ३१५ हेक्‍टर क्षेत्रावर या वर्षी कापूस आहे. 

कर्जमाफीचे अर्ज भरताना अनेक अडचणी
कर्जमाफी प्रकरणाचे अर्ज भरण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. १५ सप्टेंबर त्याकरिता मुदत ठरवून देण्यात आली असताना अनेक ठिकाणी लिंक नसल्याचे तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगत शेतकऱ्यांना परत पाठविण्याचे काम होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला, इतकी अल्प कर्जमाफी देण्याचीदेखील शासनाची नियत नसल्याचा आरोप मुडाणा (ता. महागाव) येथील परसराम भगाजी वानखडे या शेतकऱ्याने केला. गेले दोन दिवस त्यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी बॅंकेचे खेटे घातले. युनियन बॅंकेची शाखा येथे असून, या बॅंकेशी तब्बल १८ ते २० खेडी जुळलेली आहेत. इतक्‍या गावांचा व्यवहार असणाऱ्या या बॅंकेचे व्यवस्थापकाचे पद रिक्‍त आहे. त्यामुळे ग्राहकांच्या समस्यांचे समाधान कर्मचाऱ्यांकरवी योग्य पद्धतीने केले जात नाही, असाही आरोप परसराम वानखेडे यांनी केला. दहा हजार रुपयांचे तत्काळ कर्जदेखील त्यांना गेल्या महिनाभरापासून दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले. 

सोयाबीन, कपाशीला कीड-रोगाने पोखरले आहे. त्याच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने जागरूकपणे प्रयत्न केले पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही ही खेदाची बाब आहे.  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. आम्हाला त्यापोटी अद्याप मदत मिळाली नाही. दुहेरी पेरणीची मार सोसल्यानंतरही कृषी विभाग व कृषी विद्यापीठाची यंत्रणा मार्गदर्शनासाठी अद्यापही बांधावर पोचली नाही.
- मनीष जाधव, वागद, ता. महागाव

आम्ही जगावं कसं आणि कशासाठी हाच प्रश्‍न सोयाबीनची अवस्था पाहून येतो. सरकार उत्पन्न दुप्पट करायला निघाले आणि इकडं लागवडीचा खर्चबी निघेनासा झाला. कर्जमाफीसाठी सतराशे छप्पन कागद आणि काम. अशा धोरणांनी आम्हाचं जगणं मुश्‍किल केलं. आम्हाला आधार देणारंच कोणी उरलं नाही. 
- गोपाल चव्हाण, वागद, ता. महागाव.