शेती, दुग्ध व्यवसायातून भराडीची धवल प्रगती

 डी. के. वळसे पाटील 
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

धरण, पाणीपुरवठा योजना, शेती, दुग्ध व्यवसाय, विविध योजना प्रकल्पांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील भराडी गावाच्या प्रगतीची वाट उजळली आहे. नोकरीसाठी गावातून होणारे स्थलांतर थांबले आहे. बाहेरील गावातील मजुरांना गावात काम मिळाले आहे. गावची एकजूट व त्यातून काम करण्याची इच्छाशक्ती यांचाच हा विजय झाला अाहे, असे म्हणता येईल.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्‍यात येणाऱ्या भराडी गावची लोकसंख्या आहे सुमारे दोन हजारांपर्यंत. गावात ३२६ कुटुंबे राहतात. घोडनदीच्या काठावर खरे तर गाव आहे. पण धरण उशाला व कोरड घशाला अशी गावची एकेकाळची अवस्था होती. दिवाळीनंतर येथील गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. शेतीची अवस्था बिकट होती. पण ठरवले तर काहीही होऊ शकते याचा प्रत्यय भराडीच्या गावकऱ्यांनी दिला. त्याला साथ दिली शासकीय यंत्रणांनी.

विकासाकडे वाटचाल  
हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) गावाला वरदान ठरले. आदर्शगाव योजनेतही गावचा समावेश झाला. सुमारे ४० शेती पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून ७०० हेक्‍टर कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली आणले.  

निसर्गाने नटलेले गाव 
वारकरी संप्रदायाचा गावावर पगडा आहे. लोकसहभाग व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असून गाव ते प्रवेशद्‌वार दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नारळ, आंब्याची बाग लक्ष वेधून घेत आहे. वाड्यावस्त्यांवरही वृक्षांची लागवड आहे. त्यामुळे निसर्गाने नटलेले अशी गावाची प्रतिमा दिसून येते.

डिंभे धरणाचा फायदा     
मंचरच्या पूर्वेला सोळा किलोमीटवर भराडी आहे. बाजरी, भुईमूग, मटकी, हुलगा आदी पिके शेतकरी खरीपात घ्यायचे. रब्बी हंगामात पाण्याअभावी जमीन रिकामी ठेवावी लागे. गावातील ५५ कुटुंबे रोजगारासाठी अन्य गावांत स्थलांतरित झाली होती. घोडनदीवर सिमेंट बंधाऱ्याची मागणी गावकऱ्यांनी केली. माजी आमदार (कै) दत्तात्रेय वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे बंधाऱ्याचे काम झाले. पण नदीचे पाणी आटल्यानंतर पुन्हा पाणी समस्येला तोंड द्यावे लागे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून डिंभे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भराडीचा कायापालट सुरू झाला. धरणातून घोडनदीत उन्हाळ्यात वेळोवेळी पाणी सोडले जाते. त्याचा फायदा भागातील शेतकऱ्यांना झाला. पाच ते सहा शेतकरी कुटुंबांनी एकत्र येऊन एक ते तीन किलोमीटर अंतराच्या शेती पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या.

शेतीचा झाला विकास  
शाश्‍वत पाणी मिळू लागल्याने नगदी पैसे मिळवून देणारी भाजीपाला पिके घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली. जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय सुरू केला. गावात घरोघरी गोठे आहेत. दररोज गावातून दहा हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते. गायीच्या दुधाला सरासरी २४ ते २५ रुपये प्रतिलिटर दर मिळतो. दर महिन्याला दुधापासून काही लाखांचे उत्पन्न गावाला मिळते. काही शेतकऱ्यांनी ऊस पीकही घेतले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर ते करतात. ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर वाढला आहे. टॉमेटो, बीट, कांदा उत्पादनातही गाव अग्रेसर आहे. काहींनी फळबागा घेतल्या आहेत. परगावी स्थलांतरित झालेली कुटुंबे गावी स्थिरावत आहेत. सध्या अन्य गावातील दीडशेहून अधिक मजूर येथे काम करतात. रोजगार निर्मितीलाही गावाने हातभार लावला आहे. 

विविध योजनांची अंमलबजावणी 
महात्मा गांधी तंटामुक्ती योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेचे पुरस्कार गावाने पटकाविले आहेत. हागणदारीमुक्त गाव झाले आहे. भराडमाऊली सामुदायिक विवाह मंडळामार्फत दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत ४२५ जोडपी सामुदायिक सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत. गावात सुमारे २५ अभियंते, तीन डॉक्‍टर, तीन वकील घडले. पाच तरुण परदेशात नोकरी व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत. चराई व कुऱ्हाड बंदी, दारू बंदी, व्यसनमुक्ती आदींची अंमलबजावणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. गावठाणात व वाड्यावस्त्यांवर एकूण दहा मंदिरे असून येथे एकूण तीन अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी होतात. 

लोकसहभाग वाढला 
सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुदाम खिलारी, उद्योजक गोविंद खिलारी, खरेदी विक्रीसंघाचे संचालक रमेश खिलारी, सरपंच शिल्पा दीपक कुरकुटे, उपसरपंच मनोहर शंकर अरगडे, भराडमाउली विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शांताराम कुरकुटे, उपाध्यक्ष दत्तात्रेय गावडे यांच्या नेतृत्वाखाली गावाने प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. महिलांचाही प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो. ग्रामविकास अधिकारी ऊर्मिला चासकर यांनी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. बाळशिराम गजाभाऊ खिलारी व गोविंद खिलारी यांनी गावच्या दोन स्वतंत्र प्रवेशद्‌वारांचे बांधकाम करून दिले आहे. गोविंद खिलारी यांच्या मदतीमुळे स्मशानभूमी परिसराचा कायापालट झाला. 

पत्र्याची अद्ययावत शेड उभारून परिसर सुशोभित झाला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता. आता अर्धा किलोमीटर अंतराचे डांबरीकरणही झाले आहे. गावातच मुलांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे म्हणून वर्ग सुरू झाले आहेत.  भराड माऊली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने दोन लाख ८९ हजार रुपये कर्ज देऊन शुद्ध पाणीनिर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. नागरिकांना मागणीनुसार दररोज ५० पैसे प्रती लिटर बाजारभावाने पाण्याची विक्री केली जाते. ही रक्कम विविध कार्यकारी सोसायटीकडे जमा झाली आहे. लवकरच हा प्रकल्प कर्जमुक्त होईल. यंदाच्या मार्चअखेरीस सोसायटीला तेरा लाख रुपये नफा झाला अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष शांताराम महादेव कुरकुटे यांनी दिली.

फळबागा होताहेत विकसित  
वृक्ष लागवड व ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावात जनजागृती झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली तेरा हेक्‍टर पडीक जमीन गावकऱ्यांनी विकसित केली. त्यासाठी पर्यावरण संतुलित समृद्ध योजनेतून व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबागेसाठी साडेनऊ लाख रुपये खर्च करण्यात आला. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली. आंबा, नारळ व लिंबू अशी सुमारे पंधराशेहून अधिक झाडे येथे आहेत. फळांपासून उत्पन सुरू झाल्यानंतर गावाला किमान दहा लाख रुपये उत्पन अपेक्षित आहे. या पैशांचा उपयोग गावविकासासाठी केला जाईल अशी माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुदाम खिलारी यांनी दिली. 

एकूण ७५७ हेक्‍टर जमिनीपैकी २५ हेक्‍टर जमीन वनखात्याची व तेरा हेक्‍टर जमीन गायरान आहे. फूलशेती, फळबागा, ऊस, भाजीपाल्याच्या मळ्यांनी परिसर हिरवागार झाला आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. घरोघरी दुचाकी वाहने असून काही कुटुंबाकडे चारचाकी वाहने आली आहेत. कौलारू घरांचे रूपांतर बंगल्यांमध्ये होऊ लागले आहे. गावठाणात सीसीटीव्ही बसवले आहेत. 
- शिल्पा दीपक कुरकुटे, सरपंच

पूर्वी गावात सुमारे ५०० लिटर दुधाचे संकलन व्हायचे. संकरित गायींसाठी मुबलक प्रमाणात मका, गवत आदी हिरवा चारा उपलब्ध झाल्याने दुग्ध व्यवसाय भरभराटीस आला आहे. प्रत्येक कुटुंबांकडे दोन ते तीन संकरित गायी आहेत. 
-रमेश खिलारी, माजी सरपंच

अॅग्रो

अमेरिकेच्या मध्य पूर्व विभागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनवरील तांबेरा (रस्ट) हा रोगाचा फारसा अनुभव नसला तरी...

09.54 AM

गोठ्यातील सूक्ष्म निरीक्षणाद्वारे व्यवस्थापनामध्ये सुधारणा करता येतात, आजार टाळता येतात, उत्पादनातील घट टाळता येते. म्हणून दररोज...

09.48 AM

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल...

09.48 AM