चॉकी कीटक संगोपनातून शाश्‍वत उत्पन्न

विकास जाधव
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

सातारा शहरानजीक सत्त्वशीलनगर येथील तरुण शेतकरी संदीप सुरेश केसकर यांनी शेतीत विविध पिकांचे प्रयोग केले. रेशीम शेतीद्वारे कोषांचे चांगले उत्पादन व विक्रीही केली. आज मात्र शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून चॉकी कीटकांच्या (बाल्यावस्थेतील रेशीम अळ्या) संगोपनावरच भर दिला आहे. जिल्ह्यातील ५० ते ६० शेतकरी त्यांच्याकडून या अळ्यांची खरेदी करतात व उत्तम प्रकारे रेशीम शेती करतात. 

सातारा शहरालगत सत्त्वशीलनगर येथील संदीप सुरेश केसकर हे तरुण शेतकरी. केसकर कुटुंब हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अाहे. मात्र वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने साताऱ्यात स्थायिक झाले.

सुरवातीचे प्रयत्न 
संदीप यांनी बीएसस्सी पदवी घेतल्यानंतर काही काळ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र शेतीचीच अधिक आवड. त्यातून १९९२ मध्ये दोन एकर शेती भागीदारी (घाणवट) स्वरूपात घेतली. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करीत ती दहा एकर केली. 
 सन २००० मध्ये निगडी (ता. जि. सातारा) येथे सव्वा दोन एकर शेती खरेदी केली. पाण्यासाठी विहीर घेतली. मात्र कमी पाणी लागले. या क्षेत्रात ऊस, त्यानंतर आले पिकाचा प्रयोग केला. मात्र ऊस हा पाणीटंचाईमुळे तर आले अतिपावसात वाया गेले. यादरम्यान विविध पिके व आंतरपिके घेण्याचेही प्रयोग केले. न खचता सातत्याने नवीन काही करण्याची जिद्द ठेऊन पुढे चालले. 

रेशीम शेतीला सुरवात 
 सन २००१ पासून रेशीम शेतीचा विचार सुरू केला. कमी पाण्यात चांगला व्यवसाय उभा करता येईल ही आशा होती. कृषी प्रदर्शन तसेच कंरजे येथे केलेल्या रेशीम शेतीची पाहणी उपयोगी ठरली. हा व्यवसाय आपण करू शकतो हा आत्मविश्वास आला. 

कोषनिर्मितीसाठी रेशीम शेती  
 सन २००६ मध्ये निगडी येथे सव्वा दोन एकरांत तुतीची बाग उभारली. २००७ मध्ये शेड उभारणी करून रेशीम अळ्यांचे संगोपन सुरू केले. सुरवातीच्या काळात पाल्याचे प्रमाण कमी असल्याने पहिली बॅच ५० अंडीपुजांची घेतली. यातून ३५ किलो कोषउत्पादन मिळाले. या काळात कोषांची खरेदी शासनाकडून व्हायची. झा़डे मोठी होईल तसा पाला वाढू लागल्याने अंडीपुजांच्या संख्येत वाढ केली. 

वर्षाकाठी १२०० ते १५०० अंडीपूजांचे संगोपन होऊ लागले. सरासरी १०० किलोमागे ७० किलोप्रमाणे एकूण ८०० ते ८५० किलो कोषउत्पादन मिळू लागले. कर्नाटकातील रामनगर येथील बाजारपेठ उपलब्ध झाली. यातून दीड ते पावणेदोन लाख रुपयांच्या दरम्यान उत्पन्न मिळू लागले.     

चॉकी कीटक संगोपनावर अधिक लक्ष
रेशीम शेतीतील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे चॉकी अर्थात बाल्यावस्थेतील अळीचे संगोपन. या अवस्थेतील व्यवस्थापन जमत नसल्यामुळे अनेकांना तोटा सहन करावा लागत होता.संदीप यांनी नेमक्या याच गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रीत केले. आज त्यांनी कोषनिर्मितीपेक्षा चाॅकी कीटक संगोपन हाच मुख्य व्यवसाय बनविला आहे. 

असा आहे चॉकी कीटक संगोपन व्यवसाय
घरीच दोनशे चौरस मीटर क्षेत्रफळात व्यवसाय  
वाई येथील रेशीम विभागामार्फत मिळतात अंडीपूंज 
प्रति बॅच सुमारे २५०० ते ३००० अंडीपूंज क्षमता
हॅचिंग झाल्यानंतर नऊ ते १० दिवस बाल्यावस्थेतील अळ्यांचे संगोपन
बायव्होल्टाईन रेशीम कीटक
गुंतवणूक- एक लाख- पैकी अनुदान- ७० हजार रुपये. 

व्यवसायातील ठळक बाबी
संदीप म्हणतात की शाश्वत व स्थिर उत्पन्नासाठी हा व्यवसाय चांगला 
या व्यवसायात लागते कौशल्य व अत्यंत दक्षवृत्ती. बाल्यावस्थेतील अळ्याचे संगोपन घेताना काळजी घेतली नाही तर अळ्यांची मर वाढून शेतकऱ्यांना तोटा होऊन निराशा येण्याची शक्यता असते. संदीप यांनी शेतकऱ्यांचा हा धोका कमी केला आहे. चांगल्या दर्जाच्या अळ्या मिळू लागलाने रेशीम उत्पादकांचा फायदा होत आहे. त्यामुळे रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला अाहे. 

व्यवस्थापन 
सुमारे ५०० चॉकी ट्रे
सुमारे दोन एकरांत तुतीची लागवड 
चॉकी संगोपनाबरोबर ७० ते ७५ अंडीपुजांची बॅचही कोषनिर्मितीसाठी
संगोपन केंद्र परिसरात स्वच्छता, ट्रे प्रत्येक बॅच सुरू होण्याआधी निर्जंतूक केले जातात.
केंद्रात २५ ते ३० अंश तापमान तर आर्द्रता ८० ते ९० टक्के 
आर्द्रतामापीचा वापर. हिवाळ्यात हिटर व जास्त क्षमतेच्या बल्बचा वापर 
मर होऊ नये यासाठी नाजूक पद्धतीने अळ्यांची हाताळणी  
कटरच्या सहायाने तुतीचा पाला लहान करून दिवसातून दोनवेळा अळ्यांना दिला जातो.
अळ्यांनी कात टाकल्यावर पाला चुना टाकून सुकवला जातो.

ग्राहक 
जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० रेशीम उत्पादक संदीप यांच्याकडून घेतात चॉकी कीटक
 त्याचा दर- १२०० रुपये प्रति १०० अंडीपूंज

नफा 
महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नात ४० टक्के खर्च तर ६० टक्के नफा मिळतो.
मदत आणि मार्गदर्शन
रेशीम शेतीत पत्नी मयूरा संदीप यांच्याबरोबरीने राबतात. त्यामुळे भार हलका झाला आहे. 
जिल्हा रेशीम अधिकारी विनित पवार, वरिष्ठ तांत्रिक सहायक रमेश भोसले यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळते. येत्या काळात व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याची संदीप यांची इच्छा आहे. 

व्यवसायातील  काही पायऱ्या 
म्हैसूर येथे दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याने चॉकी संगोपनासाठी आत्मविश्वास आला. सन २०१० पासून मोजक्या शेतकऱ्यांना चॉकी संगोपन करून देण्यास सुरवात  
सातत्याने कामाच्या दर्जात सुधारणा होत गेल्याने शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. 

संदीप केसकर,८२०८८५७६७३, ९४२३७७०८७८