‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा

‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा

अहिंसक, समता, न्याय, शाश्‍वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन'  शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीची गरज आहे याबाबत समिती गठीत झाली. या समितीने बुनियादी शिक्षणाचा (नई तालीम) अहवाल तयार केला. हिंदुस्तानी तालिमी संघाने दोन महिन्यात चौदा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला. त्यावेळच्या प्रांतीय सरकारने आपापल्या राज्यात शाळा सुरू केल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आहे. या शाळांची संख्या ४८ हजारावर होती. बुनियादी शिक्षणाचा अहवाल तयार करण्यात योगदान देणारा डॉ. इ.डब्लू. आर्यनायकम आणि आशादेवी यांचा मुलगा आनंद याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रशिक्षण शाळेला आनंद निकेतन असे नाव देण्यात आले.

उद्योगमूलक शिक्षणपद्धती 
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून आणि त्यानंतर दुसऱ्या भाषा टप्याटप्याने शिकविल्या पाहिजे. शरीर, मन आणि आत्मा या तीन बाबींचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. आरोग्य, आपल्या कामाला सन्मान  मिळत असेल तर परिपूर्ण शिक्षण मिळते, असे मानले जाते. बुनियादी शिक्षणाला प्राथमिक तर उत्तम बुनियादी म्हणजे बारावीपर्यंतचे शिक्षण होय. उद्योगाभिमूख नाही तर उद्योगमुलक शिक्षण (मध्यवर्ती उद्योगाला धरुन त्यावर आधारीत शिक्षण) देण्यावर या शिक्षणपध्दतीचा भर आहे. आज भारतात केवळ ५०० शाळाच नई तालीम पध्दतीच्या उरल्या असल्याची माहिती संस्थेचे समन्वयक प्रभाकर पुसदकर यांनी दिली.

आनंद निकेतनचा प्रवास 
आनंद निकेतन ही शाळा १९३८ मध्ये  सुरू झाली. परंतु काही कारणास्तव १९७० मध्ये बंद झाली. भुदान आंदोलन सुरू झाल्याने विनोबांनी हे आंदोलन म्हणजेच  नई तालीम म्हणत या आंदोलनात सहभागाचे आवाहन केले. या आवाहनानंतर देखील येथे शिक्षण घेण्यास कोणी पुढाकार घेतला नाही. त्यानंतर अनेक वर्ष ही शाळा बंद राहिली. नई तालीमच्या पुनर्जीवनाच्या चर्चा झाल्या आणि २००५ मध्ये पुन्हा शाळा सुुरू झाली. त्यानंतर आजवर ही शाळा सुरू आहे. या शाळेतून बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते, अशी माहिती प्रभाकर पुसदकर यांनी दिली.

शेती व्यवस्थापन शिक्षण 
आनंद निकेतन शाळेत शेतकरी, शेतमजूर तसेच सामान्य कुटुंबातील मुले  शिकतात. शालेय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाचा असला तरी श्रमाधारीत अनुभवातील शिक्षण देण्यावर येथील शिक्षणपद्धतीचा भर आहे.  विद्यार्थ्यांना शेतीचे व्यवस्थापन कळावे, त्यासोबतच शेतमाल विक्रीचाही अनुभव यावा याकरिता परसबाग उपक्रम शाळा राबविते. परसबागेतील पिकांच्या व्यवस्थापनासाठी छोट्या अवजारांचा वापर केला       जातो. 

शाळेची वेळ सकाळी दहाची असली तरी मुले त्यापूर्वीच शाळेत पोचतात. परसबागेतील आपल्या वाफ्यात जाऊन पीक व्यवस्थापनाची कामे नित्यनियमाने करतात. यासाठी स्वयंशिस्त जपण्यात आली आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंतचे धडे ही शाळा देते.  विद्यार्थी  परसबागेतील भाजीपाला विक्रीसाठी बाहेर नेतात. यातून मिळणारा पैसा वर्ग कोशात जमा केला जातो. यातून भाजीपाला बियाणे खरेदी आणि  गरजू मुलांना लागणाऱ्या शालेय वस्तुंची खरेदी होते. 
 : प्रभाकर पुसदकर,  ९७६३२२३६७०

दरवर्षी ठरतो नवा उपक्रम
कचरा व्यवस्थापन हा यंदाच्या वर्षीचा उपक्रम शाळेने ठरविला आहे. या विषयावर विद्यार्थी वर्षभर काम करतात. गेल्यावर्षी पाणी हा अभ्यासाचा उपक्रम होता. जिल्ह्यात पडणारा पाऊस, वाहून जाणारे पाणी असा आराखडा विद्यार्थ्यांनी तयार केला होता. बंगळूर येथील एका संस्थेने या प्रकल्पाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला होता.  नई तालीम ज्ञान रचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्य विकसित करत त्यांचा आत्मविश्‍वास वाढविणारी आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षक, पालकांनी ही शाळा बघायला हवी.  

ग्रामविकासात योगदान
     सेवाग्राम परिसरातील गावांमध्ये स्वच्छता, आरोग्याबाबत जनजागृती.
     जल, मृदसंधारण, पुनर्भरण तंत्रज्ञानाबाबत प्रसार, प्रात्यक्षिके.
     पिकांच्या विविध जातींच्या संवर्धनाबाबत पुढाकार, सेंद्रिय शेतीबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन.
     वर्धा जिल्ह्यातील ५० शाळांच्यामध्ये नई तालीम उपक्रमाची सुरवात.


अनुभवाधारित शिक्षण 
 विद्यार्थ्यांना विविध भाज्या, कापूस, मूग, तूर, बाजरी, ज्वारी, मका यांची लागवड करायला शिकवले जाते. विद्यार्थी वाफ्यांमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यासारख्या भाज्यांची लागवड करतात. परसबागेत काम करीत असताना जमीन मोजमाप व परिमीती काढणे, बागेचा नकाशा काढणे, जमिनीवर भौमितीक आकृत्यांचा उपयोग करीत बागेची रचना आदी गोष्टीही विद्यार्थी  शिकतात. 
 विविध हंगामामधील कमाल-किमान तापमान, आर्द्रता, विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप, नोंदी, आलेख काढणे ही सर्व कामे विद्यार्थी करतात. गांडूळखत, कंपोस्ट खत निर्मिती, द्रवरुप खत निर्मिती, कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय कीडनाशक तयार करुन फवारणी, मित्र किडी- शत्रुकिडींची ओळख, मधमाशा व किटकांचे निसर्गातील स्थान समजूण घेणे, अहिंसक पद्धतीने मध काढण्याच्या पध्दती, अळिंबीची शेती अशी माहिती विद्यार्थांना दिली जाते. 
 प्रत्येक मुलाला महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची संधी मिळते. यातून पाकशास्त्र, रसायनशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छता शास्त्र आदींचे धडे  विद्यार्थी शिकतात. 
 सेवाग्राम परिसरातील हातमाग, शिलाई, चित्रकारिता व इतर हस्तकलांची माहिती विद्यार्थांना व्हावी, याकरिता शाळा विविध उपक्रम राबविते. शाळेत हस्तशिल्प तयार होत नसेल तर संबंधित संस्थेला भेट दिली जाते; त्या ठिकाणी हस्तशिल्प कशी तयार केली जातात याची माहिती विद्यार्थांना दिली जाते. 
 विद्यार्थांचे साहित्य, संगीत, नृत्य, हस्तकला अशा व्यक्तिमत्त्व विकासाच्या बाबींवर लक्ष दिले जाते. विद्यार्थांचे  आरोग्य चांगले रहाण्यासाठी कबड्डी, मल्लखांब अशा खेळांवर शाळेने भर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com