स्वच्छ ऊर्जेसाठी बायोगॅस उभारणीची चळवळ व्हावी 

स्वच्छ ऊर्जेसाठी बायोगॅस उभारणीची चळवळ व्हावी 

अनेक वेळा शेतकऱ्याचे घर आणि गोठा यामध्ये अंतर असते. त्यामुळे घरगुती तसेच गावपातळीवर बायोगॅस वापरण्यात अडचणी येतात. त्यावर काही मार्ग काढणे शक्‍य आहे का?

: इच्छाशक्ती असल्यास ही अंतराची समस्या सहजपणे सोडवता येते. बारामतीमध्ये एका ठिकाणी बायोगॅस आणि घर यामध्ये दीड किलोमीटरचे अंतर आहे. तरिही तिथे गोठ्याजवळ तयार झालेला बायोगॅस बंद पाइपलाइनद्वारे घरापर्यंत आणला आहे. त्यासाठी केवळ पाइपलाइन आणि ब्लोअर यांचा खर्च वाढतो. घर आणि तेरा लेबर क्वार्टर यांच्यापर्यंत चोविस तास गॅसपुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे ठिकेकर वाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील ५५ घरासाठी ३.५ किलोमीटर अंतरापर्यंत पाइपलाइन करून सकाळी आणि संध्याकाळी असा दोन तास गॅसपुरवठा केला जातो. सर्व सार्जनिक दिवे त्यावर लावले जातात. हा चार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सुमारे ४५ लाखांपर्यंत खर्च आला. राज्य, केंद्र आणि जिल्हा परिषद यांच्याकडून एकूण ४० टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान उपलब्ध झाले. प्रतिदिन एक टन फॉस्फेटयुक्त घनखत उपलब्ध होते. त्याची विक्री ८ रुपये किलो दराने होते. तर दोन टन शेण स्लरीचीही २ रुपये प्रति किलो या दराने विक्री होते. त्यातून ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी महसूल मिळत आहे. घरगुती पातळीबरोबरच गावपातळीवरही चळवळ स्वरुपामध्ये बायोगॅस ऊर्जा निर्मिती संयंत्राच्या उभारणी होत गेली पाहिजे. त्यातून स्वच्छ भारत, स्वच्छ ऊर्जा संकल्पनेला चालना मिळणार आहे.  

लहान शेतकऱ्यांसाठी बायोगॅसपासून विजेची उपलब्धता शक्‍य आहे का?
: अनेक ग्रामीण भागामध्ये भारनियमनांच्या काळातही बायोगॅसवर स्वतःची चार ते पाच तास वीज व ऊर्जा उपलब्ध होऊ शकते. त्याचे फायदे प्रचंड आहेत. १० ते २५ गाई असलेल्या शेतकऱ्यांसाठी १० ते २५ घनमीटर क्षमतेचे संयंत्र उभारावे लागते. त्यांच्यासाठी एका कंपनीने बायोगॅसवर चालणारा खास २.५ किलो वॉट क्षमतेचा जनरेटर तयार केला आहे. त्यातून या जनावरांसाठी दूध काढणी यंत्र, चाफ कटर व २ एचपी क्षमतेचा पंप यासाठी ऊर्जा उपलब्ध होऊ शकते. त्याच प्रमाणे लेअर पोल्ट्री फार्म पक्ष्यांची विष्ठा ही माश्‍या आणि दुर्गंध यामुळे आजूबाजूंच्या रहिवाश्‍यांसाठी त्रासदायक ठरतात. मात्र, त्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प केल्यास या दोन्हीतून मुक्ततेबरोबरच वीजही मिळू शकते. ५००० पक्ष्यांच्या लेअर पोल्ट्रीवर १५ घनमीटर क्षमतेचे बायोगॅस संयंत्र चालू शकते. त्यावर  २.५ किलोवॉट जनरेटर सहा तासांपर्यंत चालते.  

बायोगॅससाठी अनुदान व अन्य सवलतींचे स्वरूप कसे आहे? 
: एक ते दोन गाई असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन घनमीटर क्षमतेच्या घरगुती बायोगॅस संयंत्रासाठी साधारणतः ३२ हजारांपर्यंत खर्च येतो. त्यावर सुमारे ९००० रुपये इतके अनुदान मिळते. त्यानंतर एकदम २५ घनमीटर क्षमतेच्या संयंत्रासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने २.४ लाख इतके अनुदान मिळते. या संयंत्रासाठी सात लाखांपर्यंत खर्च येतो. मात्र, राज्यामध्ये १० ते २५ गाई असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी अंदाजे सात लाख खर्च करणे थोडेसे अडचणीचे ठरते. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदानासाठी काही धोरणात्मक बदल करण्याची आवश्‍यकता आहे. त्याचा मोठा फायदा स्वच्छ ऊर्जा निर्मितीला होऊ शकतो. 

शहरी भागामध्ये घनकचरा व्यवस्थापन ही समस्या झाली आहे, त्यासाठी बायोगॅस हे कितपत उत्तर होऊ शकते?
: १ ऑक्‍टोबर २०१७ पासून पुणे व मुंबईसारख्या महानगरपालिका सोसायट्यामधून १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा उचलणे बंद करणार आहेत. त्यामुळे सोसायट्यांना आपले घनकचरा व्यवस्थापन स्वतःला करावे लागणार आहे. त्यामुळे बायोगॅस संयंत्र उभारून, त्यावर वीजनिर्मिती करता येते. हे संयंत्र जमिनीवर किंवा जमिनीखाली अशा दोन्ही पद्धतीने उभारता येते.  वानवडी (पुणे) येथील सेक्रेड हर्ट टाऊनशीपमध्ये ६०० फ्लॅट असून, सुमारे ६०० किलो ओला कचरा तयार होतो. तिथे ५० घ. मी. क्षमतेचा प्रकल्प उभारला असून, त्यातून प्रतिदिन (पाच ते सहा तास) १० किलो वॉट इतकी वीज मिळते. पर्यायाने सोसायटीच्या वीजबिलात बचत झाली असून, प्रॉपर्टी टॅक्‍समध्येही ५ टक्के सवलत मिळते.      

परिचय
गजानन पाटील हे रसायन अभियंता असून, इंग्लंडमध्ये पर्यावरण स्वच्छ तंत्रज्ञान (क्‍लिन टेक्‍नॉलॉजी) या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर लंडन महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम केले. २००६ मध्ये भारतात परत आल्यानंतर ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि. ची स्थापना करून, त्यातून बायोगॅसवर आधारित स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. आजवर महाराष्ट्रामध्ये हजारपेक्षा अधिक छोटी मोठी युनिट उभारली आहे. त्यातून राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना मिळत आहे.  

गजानन पाटील, ९९७००५८३७२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com