कापूस, भाजीपाला तोडणी करताना वापरा वेचणी कोट 

कापूस, भाजीपाला तोडणी करताना वापरा वेचणी कोट 

कापूस वेचणीच्या काळात महिला ७ ते ८ तास शेतामध्येच असतात. कापूस वेचणी करताना महिला जुन्या साडीचा तुकडा किंवा कपडा कंबरेभोवती गुंडाळून ओटी तयार करतात किंवा आपल्या साडीच्या पदराच्या ओच्याचा उपयोग वेचलेला कापूस गोळा करण्यासाठी करतात. या कापूस वेचणी कार्यामध्ये साधारणत: दोन्ही हाताच्या हालचाली वारंवार होत असतात. ओटी भरली की शेताच्या बांधावर रिकामी करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. ओटी सोडून रिकामी करून परत बांधावी लागते, यामध्ये बराचसा वेळ जातो. 

कापूस वेचणी करताना कापसाची वाळलेली बोंडे बोटांना दुखापत करतात, शेतातून फिरताना कापसाच्या पऱ्हाट्यामुळे हाताच्या त्वचेवर ओरखडे उठतात. 

जेव्हा कापूस जास्त प्रमाणात ओटीत भरला जातो, तेव्हा ओटी गुडघ्याच्या खाली येते आणि चालताना पायात अडकते. त्यामुळे वेचणी करताना त्रास होतो. 

    ओटीसह चालताना, ओटी पायावर व मांड्यावर सारखी आदळल्याने चालण्याची गती कमी होते. ओटी कंबरेला काचते व यामुळे त्वचेला खाज सुटते. उष्णतेमुळे डोके दुखणे, डोळ्यांची आग होणे, ऊन लागणे, पायाला गोळे येणे, कंबर दुखणे अशा महिलांच्या तक्रारी आहेत.

    कापूस वेचणी करताना तो स्वच्छ असणे महत्त्वाचे असते. ओटीमधून कापूस जमिनीवर पडला की त्याबरोबर काडी, कचरा चिकटतो, त्यामुळे कापसाची प्रत खालावते. 

    काही भागात ओटी पाठीवर बांधली जाते. ओटी पाठीवर बांधल्यानंतर दोन्ही हातांनी कापूस वेचून हात वळवून शरीराच्या मागच्या बाजूला असलेल्या ओटीमध्ये कापूस गोळा केला जातो. यामुळे हातांच्या स्नायूंना पीळ बसतो. स्नायू अनैसर्गिक स्थितीमध्ये जातात. याचा परिणाम कामाच्या गतीवर होतो. 

कापूस वेचणी कोट फायदेशीर 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृह विज्ञान महाविद्यालयाच्या कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन या विभागातील डॉ. जयश्री झेंड आणि मंजूषा रेवणवार यांनी शेतकरी महिलांना कापूस वेचताना कोणताही त्रास होऊ नये आणि कापूसदेखील जास्त वेचता यावा या उद्देशाने कापूस वेचणी कोट तयार केला आहे.

   हा कोट जाड कॉटनच्या कपड्याचा असल्यामुळे ऊन लागत नाही. घाम आला तर शोषला जातो.

    लांब बाह्यांमुळे कापसाच्या बोंडाचे ओरखाडे त्वचेवर पडत नाहीत. पूर्ण शरीर झाकले जाते. 

    कापूस जमा करण्यासाठी झोळी मोठी असल्यामुळे त्यात ५ ते ६ किलो पर्यंत कापूस मावतो. 

    कापसाने भरलेल्या झोळीचे ओझे पोट, कमरेवर न पडता खांद्यावर पडते. यामुळे महिलांना त्रास कमी जाणवतो. 

    झोळीतून कापूस सहज बाहेर काढण्यासाठी झोळीच्या दोन्ही बाजूस बंद दिले आहेत ते बंद सोडले की, कापूस लवकर बाहेर काढून टाकता येतो. 

    हा कोट भाजीपाला, फळे तोडतानादेखील वापरता येतो. 

माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४   
 : ०२४६५-२२७७५७ 
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com